नॉमिनेशनची तरतूद वैयत्तिक सभासदांकरिताच असते. - ऍड. रोहित एरंडे. ©

नॉमिनेशनची तरतूद  वैयत्तिक सभासदांकरिताच असते. 

एका  गृहनिर्माण संस्थेमध्ये आमच्या नोंदणीकृत  धर्मदाय ट्रस्टच्या मालकीची एक सदनिका आहे. या सदनिकेच्या भागधारक दाखल्यासंबंधी नामनिर्देशन (नॉमिनी) अद्याप झालेली नाही. तरी आमची संस्था असलयामुळे नॉमिनी म्हणून कोणाला नेमता येईल ?

एक वाचक. 

आपला प्रश्न वेगळा पण महत्वाचा आहे. सहकारी संस्थेची सभासद कोण "व्यक्ती" बनू शकते याच्या व्याख्येमध्ये २०१९ मधील दुरुस्तीप्रमाणे   मध्ये मोठे बदल करण्यात आले असून त्यामध्ये एकूण १२ प्रकार घातले गेले असून त्यायोगे एखाद्या व्यक्तीप्रमाणेच एखादी भागीदारी संस्था, कंपनी तसेच एखादी ट्रस्ट  ज्याला कायद्याच्या भाषेत "ज्यूरल पर्सन - कायदेशीर व्यक्ती" म्हणतात,  यांना  देखील सोसायटीचे सभासदत्व घेता येते. अश्या "कायदेशीर व्यक्तींचे"  स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते आणि त्यामुळे  वैयत्तिक सभासदांप्रमाणेच बहुतेक सर्व हक्क- अधिकार- कर्तव्ये देखील प्राप्त होतात. अश्या "कायदेशीर व्यक्तींना " मतदानाचा हक्क देखील त्यांच्या अधिकृत /सक्षम अधिकारी /संचालक/भागीदार यांना बजावता येतो. 

मात्र नॉमिनेशन - नामनिर्देशन हि तरतूद फक्त वैयत्तिक सभासदांकरिताच केलेली दिसून येते.  अगदी सध्या शब्दांत नॉमिनेशन करण्यामागचा हेतू सांगायचा झाल्यास  एखादा सभासद जेव्हा "मयत होतो" तेव्हा जो पर्यंत वारस कोण हे ठरत नाही हे ठरेपर्यंत  मिळकतीसंदर्भात पत्रव्यवहार इ. करण्यासाठी सोसायटीकडे काहीतरी दुवा पाहिजे असतो ते नॉमिनीच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतो. अर्थात "नॉमिनी  मालक होत  नाही, ती एक तात्पुरती सोय आहे" हे सर्वोच्च न्यायालायने अनेक निकालांमध्ये उद्धृत केलेले कायदेशीर तत्व लक्षात ठेवणे गरजेचे आहे. असो. 




२०१९ सालच्या  दुरुस्तीप्रमाणे  कलम १५४(बी)१३ मधील नवीन तरतुदीनुसार सदस्याच्या निधनानंतर मृत्युपत्र, वारस हक्क प्रमाणपत्र, कौटुंबिक व्यवस्थापत्र (फॅमिली अरेंजमेंट) , याद्वारे अथवा नॉमिनेशनद्वारे आणि नॉमिनेशन नसल्यास ज्या व्यक्ती वारस असल्याचे दिसून येत असेल त्यांच्या नावे सदस्यत्व देता येते. मात्र आपली धर्मदाय संस्था हि कायदेशीर व्यक्ती असल्यामुळे ती एखाद्या "व्यक्तीप्रमाणे" मरण पावण्याचा आणि नंतर त्या मयत सभासदाचे वारस कोण हे ठरविण्याचा प्रश्न येत नाही आणि विश्वस्त /संचालक हे पद वैयत्तिक असलयामुळे त्यांच्याजागी दुसरे विश्वस्त /संचालक येतात, पण संस्था चालूच असते. त्यांच्या मृत्यूनंतरहि स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेल्या अश्या ट्रस्ट /कंपनी चालूच असतात.      सबब अश्या "कायदेशीर व्यक्तींना" नॉमिनी नेमण्याची   तरतूद केलेली आढळून येत नाही. 


बँका, शेअर इ. ठिकाणी सुध्दा नॉमिनी नेमण्याची तरतूद हि "Individual  account holder  " साठीच असल्याचे दिसून येईल, अश्या संस्थात्मक खातेदारांसाठी नाही . त्यामुळे तुमच्या संस्थेला नॉमिनी नेमण्याची गरज नाही. 


ऍड. रोहित एरंडे. ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©