मृत्युपत्राचा लाभार्थीच आधी मयत झाला तर ? - ऍड. रोहित एरंडे. ©

मृत्युपत्राचा लाभार्थीच आधी मयत झाला तर ?


माझ्या वडिलांनी स्वतःच मृत्युपत्र लिहून ते नोंदवून ठेवले होते. मृत्युपत्रामध्ये  त्यांच्या मिळकतीचे आम्हा तीन भावंडांमध्ये विभाजन कसे करावे हे लिहून ठेवले होते. मात्र माझ्या एका बहिणीचा मृत्यू माझे वडिलांच्या हयातीतच झाला आणि त्यानंतर सुमारे १ वर्षाने आमच्या वडिलांचे निधन झाले. आता  जी बहीण वडिलांच्या हयातीमध्येच मयत झाली आहे,  तिचे यजमान आणि मुले (दोन मुली आणि एक मुलगा)  तिला दिलेल्या  मिळकतीमध्ये हक्क सांगत आहेत. तर असा त्यांना हक्क आहे का  ? का आम्हा उरलेल्या २ भावांचाच फक्त हक्क आहे  ?  

एक वाचक, पुणे. 

मृत्युपत्र हा खूप महत्वाचा दस्तऐवज आहे जेणेकरून आपल्या मृत्युनंतर आपल्या मिळकतीचे विभाजन विना-वाद व्हावे आणि यासाठी मृत्यूपत्र  हे तज्ञ वकीलांकडून करून घेणे का गरजेचे आहे हे आपल्याला समजून येईल.    आता तुमच्या प्रश्नाकडे वळू या. मृत्युपत्रासंबंधीच्या   तरतुदी किती सविस्तरपणे केल्या आहे हे भारतीय वारसा कायदा १९२५ पाहिल्यावर लक्षात येईल. आपल्या प्रश्नाचे उत्तर  कलम -१०९ मध्ये आहे . या तरतुदीप्रमाणे जर का मृत्यूपत्र करणाऱ्याने त्याची मिळकत लाभार्थी म्हणून त्याच्या मुला -मुलींना (child ) किंवा रेषीय वंशज (lineal descendant ) म्हणजेच नातू, पणतू इ. यांना दिली असेल आणि जर का मृत्यूपत्र करणाऱ्याच्या हयातीमध्येच अश्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाला तर अशी मिळकत हि त्या मयत व्यक्तीच्या रेषीय वंशजांना मिळेल. इथे ब्रिटिशांनी  पुढे असे नमूद केले आहे कि  अन्य विरुध्द तरतूद केलेली नसेल, तर अशी लाभार्थी व्यक्ती ही मृत्यूपत्र करणाऱ्याच्या नंतरच मयत झाली असे गृहीत धरले जाईल. 


आपल्या वडिलांच्या मृत्युपत्रामध्ये जर का लाभार्थी आधीच मयत झाला तर अशी मिळकत कोणाला जाईल हे नमूद केले नसेल असे गृहीत धरून  तुमच्या बहिणीला जी मिळकत मृत्युपत्राने मिळाली असती, ती तिच्या मुलांना -रेषीय वंशज म्हणून  समानरित्या मिळेल, मात्र तिच्या नवऱ्याला (वैवाहिक जोडीदाराला) आणि तुम्हा भावंडाना देखील काहीही हक्क मिळणार नाही. इथे अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि रेषीय वंशंज हि संकल्पना फक्त पुरुषांसाठी मर्यादित नसून इतर सर्व रेषीय वारस म्हणजेच मुलींचा देखील समावेश होईल असा महत्वपूर्ण निर्णय "भिमनाथ मिस्सीर विरुध्द तारा दाई या केसमध्ये प्रिव्ही कौन्सिलने - म्हणजेच ब्रिटिशकालीन सर्वोच्च न्यायालय म्हणता येईल अश्या कोर्टाने १९२१ मध्येच दिला आहे.  

 प्रॅक्टिसमध्ये असा अनुभव  येतो कि  जेव्हा एखादी व्यक्ती  मृत्युपत्राने  मिळकत मुला-मुलीला देतो, तेव्हा समजा मुलगा / मुलगी तुमच्या आधीच मयत झाले तर काय? असा प्रश्न विचारल्यावर पक्षकारांना हा प्रश्न अनपेक्षित असतो आणि आवडत नाही आणि असे कसे होईल ? आमचे वय झाले आहे, मुले तर अजून लहान आहेत अशी स्वाभाविक प्रतिक्रिया त्यांची येते. परंतु आयुष्यात कधी काय घडेल याचा नेम नसतो आणि  अशी घटना घडण्याची शक्यता सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अजिबातच नाकारता येत नाही आणि दुर्दैवाने या  केसमध्ये अगदी तसेच घडले आहे . सबब आपल्या मृत्युपश्चात मिळकतीचे विभाजन करताना समजा लाभार्थीच आधी मयत झाला तर अशी मिळकत कोणाला जाईल हेही लिहून ठेवणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून असे प्रश्न निर्माण होणार नाहीत आणि म्हणूनच तज्ञ व्यक्तींमधून मृत्युपत्र करून घेणे कायमच श्रेयस्कर राहते. मृत्युपत्रासारखी महत्वाची गोष्ट जी आपल्या लाखो रुपयांच्या मिळकतीशी संबंधित असते तिथे मिळकतीच्या किंमतीपुढे  थोडेसे पैसे वाचविण्यासाठी  दुसऱ्याचे मृत्युपत्र कॉपी करून किंवा गूगल वरील अर्धवट माहितीच्या आधारे  मृत्युपत्र केल्यास  याचे त्रासदायक  परिणाम पुढची पिढी भोगू शकते.


ऍड. रोहित एरंडे. ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©