सोसायटी वा अपार्टमेन्ट : आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही असे वर्तन असावे - ॲड. रोहित एरंडे
आमच्या वरच्या मजल्यावर एक सुशिक्षित कुटुंब राहते. त्यांच्या घरातून जोराचे आवाज सकाळ संध्याकाळ येत असतात. सकाळच्या वेळचे विचारले तर म्हणतात भाकऱ्या थापताना आवाज येणारच आणि संध्याकाळी सारखे फर्निचर इ. हलवत असतात. या सर्व प्रकारचा आम्हाला खालती खूप त्रास होतो. आम्ही जाब विचारल्यावर आमच्याच अंगावर येतात आणि वर परत माझे वडील मोठे सरकारी अधिकारी आहेत, आम्हाला काहीही होणार नाही अशी दुरुत्तरे करतात. सोसायटीकडे तक्रार करूनही काही उपयोग झाला नाही. तर आता यावर मार्ग काय ?
एक त्रस्त कुटुंब.
आपल्यापैकी अनेकांना वाचून आश्चर्य वाटेल, पण असे प्रश्न अनेक सभासदांना भेडसावत असतात आणि अश्या सततच्या आवाजामुळे आपल्या मानसिक शांततेवर विपरीत परिणाम होत असतो. आपल्या प्रश्नामुळे परत एकदा "सिव्हिक सेन्स" - नागरिकशास्त्र शिकणे हे शालेय पेपर मधील १० मार्कांपुरते मर्यादित नसून "आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही असे वर्तन असावे" हे तत्व सोसायटी असो व अपार्टमेन्ट सगळीकडे लागू होते आणि हे विद्यार्थी दशेपासून बिंबवले गेले तर त्याचा फायदा सर्वाना होईल. मुंबई उच्च न्यायालयाने देखील सोसायटीमधील अतिरेकी प्राणीप्रेमाला आवर घालताना हेच तत्त्व नमूद केले आहे (संदर्भ : जिग्नेश ठाकोर विरुद्ध दिलीप शहा, २०१६(६) महा.लॉ जर्नल , पान क्र. ३७४,) . तुमच्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी, दोन गोष्टी – सुशिक्षित व्यक्ती सुसंस्कृत असलेच असे नाही आणि जे वडिलांची ' कीर्ती ' सांगतात, त्यांची काळजी रामदास स्वामींनी फार पूर्वीच घेतली आहे. असो.
तुम्ही म्हटले त्याप्रमाणे सदरील सभासदाचे वर्तन हे आदर्श उपविधी ४८ (अ ) चे सरळ सरळ उल्लंघन आहे . तसेच असे मोठे आवाज ध्वनी प्रदूषण म्हणून गणले जाऊ शकतात आणि त्यामुळे शांततेने जगण्याच्या मूलभूत अधिकाराचेही सरळ सरळ उल्लंघन होते. कुठल्याही सभासदाने आपल्या फ्लॅटमधून अन्य सभासदांना उपद्रव, त्रास, गैरसोय होईल किंवा सभ्यतेच्या प्रचलित मानकांचे उल्लंघन होईल अशी वागणूक /वर्तन करू नये असे स्पष्टपणे उपविधी ४८ (अ ) मध्ये नमूद केले आहे आणि जो सभासद असे वर्तन करीत असेल त्या विरुध्द मॅनेजिंग कमिटीने स्वतःहून किंवा तक्रार आल्यावर असा त्रास थांबविण्यासाठी त्वरित पावले उचलावीत असे उपविधी ४८ (ब ) मध्ये लिहिले आहे. त्यामुळे "थँक-लेस" काम असणाऱ्या मॅनेजिंग कमिटीवर मोठी जबाबदारी आहे.
कायदेशीर कारवाईपूर्वी त्या कुटुंबात त्यातल्या त्यात कोण सूज्ञ तुम्हाला वाटत असेल त्यांच्याशी तुम्ही किंवा इतर सभासदांमार्फत बोलून अश्या वर्तनामागे काही मनोवैज्ञानिक कारण तर नाही ना हे जाणता येईल , जेणेकरून काहीतरी वैद्यकीय मदत घेता येईल. मात्र जर सोसायटीने काही कारवाई केली नाही तर तुम्हाला कोर्टात जावे लागेल आणि या गोष्टी सिध्द कराव्या लागतील. त्यामुळे अश्या आवाजाचे रेकॉर्डिंग करणे, त्याचे डेसिबल किती हे यंत्राच्या साहाय्याने नोंदविणे (आता त्याचे ऍप्स देखील आहेत) तसेच हा आवाज होत असतानाच अन्य सभासदांना / मॅनेजिंग कमिटीला समक्ष बोलवून त्याचे टिपण (Minutes ) करून ठेवल्यासही उपयोगी ठरेल. आपली मती सुन्न करतील अश्या वादांमध्ये डिव्होर्सनंतर दुसऱ्या क्रमांकावर सोसायटी सभासदांचे वाद असतील असे आता म्हणावे वाटते.
ॲड. रोहित एरंडे ©
Comments
Post a Comment