वजन कमी करण्याच्या ऑपरेशन मुळे डायबेटीसवर नियंत्रण मिळवता येतेच असे नाही.- ऍड. रोहित एरंडे

वजन कमी (ओबेसिटी)  करण्याच्या ऑपरेशन मुळे डायबेटीसवर नियंत्रण मिळवता येतेच असे नाही.

ऍड. रोहित एरंडे ©


मध्यंतरी सोशल मिडीयावर एक चित्र पाहण्यात आले. ज्यामध्ये  माणसाचा आकार आणि टी. व्ही. चा आकार ह्यांचे बदललेले व्यस्त प्रमाण  समर्पक पद्धतीने दाखविले होते. पूर्वी माणूस "फ्लॅट" होता तर टी..व्ही. मोठा आणि आता "टी .व्ही. फ्लॅट झाला आहे आणि माणसाचे पोट  वाढले आहे, असे ते चित्र होते. ह्यातील गंमतीचा भाग सोडला, तर सध्याच्या ह्या धकाधकीच्या काळात स्थूलत्व आणि डायबेटीस ह्यांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींचे प्रमाण भारतामध्ये प्रचंड वाढले आहे. त्यामागे विचित्र लाईफ स्टाईल, व्यायामाचा अभाव, व्यसनांचे वाढलेले प्रमाण, स्ट्रेस अशी काही प्रमुख कारणे सांगितली जातात.

असे प्रचंड वाढलेले वजन कमी करण्यासाठी काही वेळा वेगवेगळ्या शस्त्रक्रियांचाही (सर्जरी)सल्ला दिला जातो. " गॅस्ट्रिक बायपास सर्जरी " हि त्यापैकीच एक सर्जरी आहे. मात्र अश्या सर्जरीमुळे डायबेटीस देखील नियंत्रणात येतो का असा नाविन्यपूर्ण प्रश्न एका केसच्या निमित्ताने राष्ट्रीय ग्राहक मंचापुढे उपस्थित झाला. (श्रीमती हरजीत कौर विरुद्ध कुलर हॉस्पिटल, पंजाब : अपील क्र . ७९९/२०१७).

ह्या केसची थोडक्यात हकिकत बघू या.   हि घटना आहे नोव्हेंबर २०१३ मधील. ९५ किलो वजन असलेल्या  कै.सतींदर ह्यांना उच्च रक्तदाब आणि डायबेटिसचा त्रास असतो. डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर त्यांना वजन कमी करण्यासाठी "गॅस्ट्रिक बायपास सर्जरी " करण्याचा सल्ला देतात आणि त्याप्रमाणे सर्जरी देखील केली जाते.   परंतु हळू हळू पेशंटला बरे वाटेल असं भरवसा डॉक्टरांनी देऊन सुद्धा ४ दिवस झाले तरी पेशंटला बरे वाटले नाही आणि अस्वस्थता कमी होत नाही. अश्यातच जानेवारी-२०१४ च्या सुमारास पेशंटला डायबेटिक फूट आणि डीप बर्न म्हणजेच पायाला लवकर भरून ना येणाऱ्या जखमा होतात. मात्र वेळोवेळी नीट ड्रेसिंग करून सुद्धा त्या जखमा भरून येत नाही आणि त्यामुळे अखेर दुर्दैवाने ऑगस्ट-२०१५ च्या सुमारास  पेशंटचा पाय कापावा लागतो आणि सप्टेंबर-२०१५ च्या सुमारास पेशंटचा मृत्यु होतो. त्यामुळे .कै. सतींदर पाल सिंग ह्यांचा डायबेटीस सदरील सर्जरीमुळे कमी झाला नाही आणि उलट इतर गुंतागुंत वाढून त्यातच त्यांचा मृत्यू झाला म्हणून वैद्यकीय निष्काळजीपणापोटी नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्यांची विधवा पत्नी श्रीमती हरजीत कौर पंजाब राज्य ग्राहक मंचापुढे डिसेंबर २०१६ मध्ये तक्रार  दाखल करतात.
.
डॉक्टर आणि हॉस्पिटल निष्काळजीपणाचे  सर्व आरोप फेटाळताना नमूद करतात की  मूळ तक्रारच २ वर्षांच्या विहित मुदतीमध्ये दाखल न केल्यामुळे रद्द होण्यास पात्र आहे. " गॅस्ट्रिक बायपास सर्जरी आणि पेशंटच्या पायाला झालेल्या जखमा आणि त्यामुळे कापावा लागलेला पाय, ह्यांचा काहिही संबंध नाही, असेही डॉक्टरांमार्फ़त प्रतिपादन करण्यात आले. मात्र सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून राज्य ग्राहक मंच तक्रार फेटाळून लावते आणि म्हणून प्रकरण राष्ट्रीय ग्राहक मंचापुढे पोहोचते.
तिथे श्रीमती. कौर ह्यांच्या वतीने असा युक्तिवाद केला जातो की " गॅस्ट्रिक बायपास सर्जरी" करताना डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला आहे आणि वैद्यकीय पुस्तकातील दाखल्यांवरूनही  असे दिसून येते कि " गॅस्ट्रिक बायपास सर्जरी" झाल्यानंतर वजन कमी होते त्यामुळे आपोआप डायबेटीस देखील नियंत्रणात येतो आणि ह्याबाबतीत नेमके हेच घडले नाही आणि त्यामुळे कै . सतींदर ह्यांचा डायबेटीस प्रमाणाबाहेर वाढून त्यांचा पाय कापावा लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यूही झाला.

सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून आणि वैद्यकीय पुस्तकातील दाखल्यांचे अवलोकन करून मा. न्या. डॉ. एस.एम. कांटीकर ह्यांनी अपील रद्दबातल ठरविले. एकतर विहित मुदत उलटून गेल्यानंतर तब्बल १० महिन्यांनी तक्रार दाखल केली आहे आणि विलंब माफीसाठी कुठलीहि सबळ करणेही तक्रारदार देऊ शकली नाही आणि म्हणून ह्याच कारणास्तव तक्रार रद्द होण्यास प्राप्त आहे. तसेच कै .  सतींदर ह्यांना १० वर्षे डायबेटीस असतो आणि त्यांची रँडम ब्लड-शुगर देखील ३६१ एमजी /डी एल (नॉर्मल प्रमाण ७०-१४०) एवढी तर ट्रायग्लिसरीड्स लेव्हल देखील १२१७ (नॉर्मल प्रमाण ५०-२००)एवढी प्रचंड वाढलेली असते, ह्या मेडिकल रिपोर्ट्स वर देखील कोर्टाने जोर दिला. कोर्टाने हे नमूद केले पेशंटच्या किडन्या देखील काम करेनाश्या  झाल्या होत्या. त्यातच  डायबेटिक फूट आणि बर्न्स ह्यामुळे सेप्टीसेमिया (एक प्रकारचा जंतू संसर्ग ) होऊन पेशंटचा मृत्यू होतो. तसेच "गॅस्ट्रिक बायपास सर्जरी" चा उद्देश अतिरिक्त वाढलेले वजन कमी करणे हा आहे, अश्या सर्जरीचा उद्देश  डायबेटिस नियंत्रण करण्यासाठी आहे  असे कुठेही नमूद  केलेलं नाही त्यामुळे पेशंट च्या मृत्यूस डॉक्टरांना जबाबदार धरणे योग्य होणार नाही कोर्टाने नमूद केले. निष्काळजीपणा आणि त्यामुळे निष्काळजीपणानेच डॉक्टरांवर केले जाणारे आरोप ह्या बाबत शेवटी कोर्टाने मा. सर्वोच्च न्यायालयाच्या २००५ सालच्या  जेकॉब म्यॅथु वि. पंजाब सरकार ह्या गाजलेल्या निकालाचा आधार घेतला, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते कि," एखादा पेशंट मरण पावला किंवा काही दुर्घटना होते, त्यावेळी डॉक्टरांना दोष देण्याची मानसिकता आहे. काहीतरी अघटित घडले म्हणजे कोणाच्या तरी माथी  (डॉक्टरांवर) दोषारोप केले पाहिजेत अशी पद्धत पडली आहे. परंतु खूप वेळा सामान्य सोडा, अत्यंत कुशल अश्या तज्ज्ञ व्यक्तींना देखील अपयशाचा सामना करावा लागतो. एखादा वकील प्रत्येक केस जिंकेलच असे नाही आणि त्याने हजर राहून केस चालवून सुद्धा केवळ एखादी केस तो  हरला म्हणून अश्या वकीलास  शिक्षा करता येणार नाही".

पेशंट आणि डॉक्टर यांच्यासाठी अतिशय महत्वाचा असा हा निकाल आहे. भारताला तर डायबेटिसचे माहेरघर म्हटले जाते, घरटी एक तरी व्यक्ती डायबेटीसग्रस्त आढळते. तसेच वर नमुद केल्याप्रमाणे बदलत्या आणि चुकीच्या जीवन शैलीमुळे स्थूल लोंकांचीही संख्या खूप वाढली आहे. जेव्हा व्यायाम आणि योग्य आहार ह्यांनी देखील वजन आटोक्यात येत नाही किंवा काही अनुवांशिक आजार असतील तर अश्या वेळी वरील प्रमाणे सर्जरी करणायचा सल्ला दिला जातो. मात्र ह्या साठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे क्रमप्राप्त आहे आणि तज्ञ्  डॉक्टरांचा सल्ला हाच अंतिम मानला पाहिजे.  अश्या उपचारांचे , सर्जरीचे फायदे-तोटे समजावून घेण्याचा पेशंटचा हक्क आहे, तर तसे सांगण्याचे डॉक्टरांचे कर्तव्य आहे  ,ज्यालाच  "इनफॉर्म्ड कन्सेंट" म्हणतात आणि कायद्यामध्ये ह्याला खूप महत्त्व आहे.  अश्या कागदपत्रांचे' योग्य पद्धतीने रेकॉर्ड ठेवले पाहिजे, जेणेकरून पुढे जाऊन कोणालाच त्रास होणार नाही. शेवटी स्वामी विवेकानंद म्हणायचे "शरीरमादयं खलु धर्म साधनम" म्हणजेच उत्तम निरोगी शरीर राखणे हेच खरे.

ऍड. रोहित एरंडे ©





Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©