फ्लॅटमधील फेरबदल कुठले कायदेशीर कुठले बेकायदेशीर. ॲड. रोहित एरंडे. ©

 आमच्या सोसायटीमधील एका  सभासदाने त्याच्या  ३ बीएचके   फ्लॅटचे  नूतनीकरण  सुरु केले आहे आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने योग्य असे  म्हणून घरातील  एक बाथरूम आणि टॉयलेट मोकळे करून तिथे एक खोली बनविली असून दुसऱ्या बेडरूमच्या  काही भागात नव्याने  टॉयलेट आणि बाथरूम केले आहे आणि अश्या नवीन बाथरूम साठी मुळातच ड्रेनेज लाईन नसल्याने नवीन ड्रेनेज लाईन बनवून  ती मुख्य ड्रेनेज लाईनला जोडणार आहे. ह्या कामासाठी त्याने सोसायटीची परवानगी घेतलेली नाही तर  एखाद्या  सभासदाने असे करणे हे कायद्याला धरून आहे का?  

सोसायटी पदाधिकारी, पुणे 

उत्तर : जागेची दुरुस्ती  करणे आणि जागेत फेरबदल करणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण नमूद  केलेले  बदल हे दुरुस्ती मध्ये   मोडणारे नसून फेरबदल किंवा जादा बांधकाम ह्या सदरात मोडतात. सर्वात महत्वाचे म्हणजे असे कुठलेही   फेरबदल हे मंजूर बांधकाम  नकाशाच्या विपरीत  आणि इमारतीला धोका पोहोचतील असे आणि सोसायटीच्या जागेवर अतिक्रमण करणारे  अश्या स्वरूपाचे कायद्याने  असू शकत नाहीत.  उपविधी क्र. ४६ अन्वये सदनिकेच्या जादा   फेरबदलासाठी (additions and  alterations )सोसायटीची पूर्व परवानगी असणे गरजेचे आहे.  ड्रेनेज लाईन इ. परस्पर बदलणे हे कायद्याला अभिप्रेत नाही.  ज्या सभासदाला त्याच्या फ्लॅटमध्ये जादा  बांधकाम किंवा बांधकामात फेरबदल  करायचे असतील त्या सभासदाने  सोसायटीच्या सचिवांकडे जरूर त्या तपशिलासह अलाहिदा  अर्ज करणे गरजेचे आहे.

दुरुस्ती (repairs ) करण्याची असेल तर :

जर का एखाद्या सदस्याला केवळ दुरुस्ती (repairs ) करून घ्यायची असेल तर केलेल्या अर्जाप्रमाणे खरोखरच दुरुस्तीची गरज आहे किंवा कसे ह्याची खात्री करून घेण्यासाठी संबंधित सदस्याने सोसायटी सचिव किंवा कमिटी सदस्य ह्यांना फ्लॅटमध्ये प्रवेश करून देणे गरजेचे आहे. तदनंतर सचिव वा सदस्य हे  कोणत्या दुरुस्त्या संस्थेने स्वखर्चाने  करणे बंधनकारक आहे (उपविधी १५९) आणि कोणत्या दुरुस्त्या  सभासदाने स्वखर्चाने  करणे (उपविधी १५९अ ) गरजेचे ह्याच्या टिपण्णीसह आपला अहवाल कमिटीकडे सादर करतात. 

सगळ्यात महत्वाचे म्हणजे दुरुस्तीचा खर्च सोसायटीने करायचा असो व सभासदाने, दोन्ही प्रकारात सदरील सभासद दुरुस्तीसाठी सोसायटी पदाधिकाऱ्यांना आणि यांचेमार्फत नेमलेल्या आर्किटेक्ट / कामगार ह्यांना फ्लॅटमध्ये प्रवेश नाकारू शकत नाही. बरेचदा फ्लॅटमधून अंतर्गत पाणी गळती दुसऱ्याच्या फ्लॅटमध्ये होत असेल, तेव्हा असे अडवणुकीचे प्रकार घडतात. जर का कोणत्या सभासदाने अशी अडवणूक केली तर संबंधित सभासदाला पूर्वसूचना देऊन  सेक्रेटरी आणि आर्किटेक्ट / कामगार ह्यांना सदरील सभासदाच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करणायचा अधिकार असून संबंधित दुरुस्त्या देखील त्यांना करू नघेता येतात आणि त्याचा खर्च सदरील सभासदाकडून वसूल करता येतो. एक गोष्ट अनुभवाने  येथे नमूद करावीशी वाटते की  "तुटे वाद, संवाद तो हितकारी " हे समर्थ वाचन सोसायटी वादांमध्ये उपयोगी ठरते . उगाचच 'इगो इश्यु'  करून काही फायदा होत नाही कारण कधीतरी आपल्यावरही दुसऱ्याच्या मदतीची वेळ येऊ शक आणि ह्या भांडणांचा शेवट कोर्टाची पायरी चढण्यात होतो आणि मानसिक शांतता भाग होते ती वेगळीच, जी बाजारात विकत मिळत नाही.   ते. असो. 

  तुमच्या केसमध्ये बांधकाम पूर्ण झाले आहे किंवा कसे हे समजून येत नाही. जर का बांधकाम पूर्ण झाले नसेल तर मनाई अर्जासाठी सोसायटीला  सक्षम कोर्टामध्ये   संबंधित सभासदाविरुद्ध दाद मागता येईल तसेच महानगरपालिकेमध्ये देखील मंजूर  नकाशाविरुद्ध जागेमध्ये फेरबदल केले म्हणून  तक्रार करता येईल. अर्थातच हे सगळे वेळ न दवडता करायला पाहिजे. 

ऍड. रोहित एरंडे .

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©