मृत्युपत्राचा अंमल कधी सुरु होतो ? - ॲड. रोहित एरंडे. ©

सर, माझ्या वडिलांनी माझ्या नवे मृत्यूपत्र करून ठेवले आहे आणि त्या योगे सोसायटीमधील  फ्लॅट माझ्या नावावर  केला आहे. वडील  अजून हयात आहेत. हे मृत्यूपत्र घेऊन मी सोसायटीमध्ये माझे नाव शेअर सर्टिफिकेटवर लावावे म्हणून अर्ज केला, तर मला आधी प्रोबेट आणायला सांगितले. तर प्रोबेटची गरज पुण्यात आहे का ?

एक वाचक, पुणे. 

 कायद्याचे अज्ञान किती  ' कमाल ' आहे ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे. (कमाल हा शब्द सर्व अर्थांनी घ्यावा !) आपल्याला मी धन्यवाद देतो कारण असे कमालीचे गैरसमज समाजात अनेक ठिकाणी आढळतात, ते १ टक्का दूर झाले तरी मी माझे नशीब समजेन... 

सर्व प्रथम तुमच्या प्रश्नाच्या पहिल्या भागाकडे येतो. 

*मृत्युपत्राचा अंमल कधी सुरु होतो ?*

मृत्यूपत्र हे मृत्युपत्र करणारा बोलायचा थांबला कि बोलायचे थांबते म्हणजेच मृत्युपत्र करणारा मयत झाल्यावरच मृत्युपत्र अस्तितीवर येतो किंवा त्याचा अंमल सुरु होतो. मृत्युपत्र करणारा हयात असेस्तोवपर्यंत मृत्यूपत्र म्हणजे एक साधा कागद असतो !! मृत्युपत्र करणारा मृत्युपत्र कितीही वेळा बदलू शकतो किंवा त्याच्या हयातीमध्ये ती मिळकत तो विकून टाकू शकतो किंवा अन्य मार्गाने तबदील करू शकतो. मृत्युपत्र करणारा मयत झाल्यानंतर जेवढी मिळकत त्यावेळी अस्तित्वात असेल तेवढीच ती मृत्युपत्रातील लाभार्थ्यांना मिळू शकते. आपल्या केसमध्ये आपले वडील सुदैवाने अजून हयात असल्यामुळे मृत्युपत्राचा अंमल अजून सुरु झालेला नाही आणि त्यामुळे तो फक्त एक कागद आहे ह्यापलीकडे काहीही नाही. आपले तीर्थरूप त्यांना वाटले तर अजूनही त्यांचे मृत्यूपत्र बदलू शकतात किंवा तो फ्लॅट विकूही शकतात. त्यामुळे तुम्ही ते मृत्युपत्र घेऊन सोसायटीकडे जाण्याचे काहीही प्रयोजन नाही आणि त्याचा काहीही उपयोग नाहीकारण तुम्हाला त्या फ्लॅटमध्ये कोणताही अधिकार मिळालेला नाही. 

कर्मधर्मसंयोगाने नुकताच ह्याच प्रश्नावर मागील महिन्यात मा. सर्वोच्च न्यायालयाने घनश्याम वि. योगेंद्र राठी (सिव्हिल अपील क्र. ७५२७ आणि २८/२०१२) या याचिकेवर  निकाल देताना हे स्पष्टपणे नमूद केले आहे कि Will(Before Death Of Testator) Or General Power Of Attorney(GPA) Cannot Confer Title In Immovable Property" . 

*पॉवर ऑफ ऍटर्नी बद्दल येथे लक्षात घ्यावे कि केवळ तुम्ही कोणाला पॉवर ऑफ ऍटर्नी लिहून दिली म्हणजे त्या मिळकती मधील मालकी हक्क लिहून दिला असे होत नाही, मिळकतीमधील मालकी हक्क हा एखाद्या व्यक्तीच्या हयातीमध्ये नोंदणीकृत  खरेदीखत , बक्षीस पत्र , हक्क सोडपत्र अश्या दस्तांनीच तबदील होतो*

*मृत्युपत्र काय केले आहे हे शक्यतो लाभार्थ्यांना न दाखविण्याचा अलिखित संकेत असतो, तो येथे पाळला गेलेला दिसून येत नाही* . आपण केलेल्या ह्या कृत्याची आपल्या तीर्थरूपांना माहिती आहे का नाही हे समजून येत नाही. असो. 

*प्रोबेट*  :

जे मृत्युपत्र अजून अंमलातही आलेले नाही त्याचे प्रोबेट सोसायटीने आणायला सांगणे हा अजून एक कहर आहे आणि जे पूर्णपणे चुकीचे आहे.  कोर्टाने प्रोबेट सर्टिफिकेट  देणे म्हणजे संबंधित मृत्यूपत्र हे अस्सल आहे आणि कायदेशीरपणे अंमलात आणलेले आहे अशी पुष्टी देणे . असे सक्षम कोर्टाने दिलेले प्रोबेट हे "भारतामधील सर्वांवर" बंधनकारक असते. प्रोबेट मिळविल्यावर मृत्युपत्राची अंमलबजावणी व्यस्थापकाला करता येते. 

*प्रोबेट घेणे कुठे अनिवार्य*  ?

भारतीय वारसा कायदा १९२५ च्या कलम  ५७ अन्वये  मृत्युपत्राचे प्रोबेट घेणे हे फक्त मुंबई, चेन्नई  आणि कोलकोता ह्या मेट्रोपॉलिटिन शहरांमध्येच गरजेचे आहे. इतर ठिकाणी  प्रोबेट घेण्याची सक्ती करता येत नाही. "पुण्यात मृत्यूपत्र केले असल्यास आणि मिळकत देखील पुण्यात असल्यास प्रोबेट ची गरज नाही असे मुंबई उच्च  न्यायालायने  श्री. भगवानजी राठोड विरुद्ध सुरजमल मेहता (AIR  २००३ बॉम . ३८७) ह्या निकालात नमूद केले आहे. जिथे मृत्यूपत्राबद्दल वादच  निर्माण झाला असेल, अश्या वेळी  प्रोबेट आणायला सांगणे समजू शकतो. सबब ज्या ठिकाणी प्रोबेटची तरतुद  कायद्यानेच लागत नाही तिथे त्याची सक्ती करणे  चुकीचे आहे. त्यामुळे आपल्या केसमध्ये मृत्युपत्र अंमलात येण्याआधीच प्रोबेट आणायला सांगणे हे तर साफ चुकीचे आहे आणि जेव्हा कधी हे मृत्युपत्र अंमलात येईल तेव्हा देखील प्रोबेटची सक्ती करता येणार नाही, एवढीच काय ती जमेची बाजू आहे. 

आपले प्रश्न वाचून कायद्याचे अज्ञान  दूर  होण्यासाठी कोणाला साकडे घालावे ह्याचे कोडे पडले आहे ! 

ऍड. रोहित एरंडे ©

Comments

  1. सर, मी माझा मुंबईतील फ्लॅट मृत्यूपत्रात मुलाला द्यायचे नमूद केले (त्यातील 25% बक्षीस पत्राद्वारे मी आधीच त्याचे नावे मालकी हक्क केला आहे ) तर त्याला माझ्या पश्चात माझ्या उर्वरित 75% हिश्याच्या रकमेवर स्टॅम्प ड्युटी वा कोणतही कर द्यावा लागेल का. तो गेली 6 वर्षे परदेशात आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. उर्वरित ७५% चे तुम्ही मृत्युपत्र केलेत तर कोणताही स्टँम्प पडणार नाही. मात्र फ्लॅट मुंबईत असल्यामुळे मुलाला प्रोबेट घ्यावे लागेल आणि त्याचा कोर्टफिसाठी रु. ७५०००/- इतका खर्च सध्या आहे. बाकी वकील फी. इत्यादी खर्च वेगळा.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©