'कचरा जाळणे' अवैध आणि अपायकारकही - ऍड. रोहित एरंडे ©

 'कचरा जाळणे' अवैध आणि अपायकारकही 

ऍड. रोहित एरंडे  ©


आमच्या सोसायटीच्या मागील सोसायटीमध्ये  झाडांचा पालापाचोळा बऱ्यापैकी जमा होतो आणि तेथील व्यक्ती तो पालापाचोळा जाळतात, त्याच्या धुराचा  त्रास आम्हा रहिवाश्यांना खूप होतो. आम्ही त्यांना विनंती करून देखील ते हा प्रकार थांबत नाहीत. तर याबद्दल  कोणती कायदेशीर कारवाई करता येईल ?

त्रस्त सभासद, पुणे 


कचरा किंवा पालापाचोळा जाळणे हे इतके नित्याचे आपण पाहत आलो आहोत कि जणू ते करणे यात काहीच गैर नाही. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. आपल्या प्रश्नामुळे  पर्यावरण आणि प्रदूषण या  खूप गहन पण दुर्लक्षित   महत्वाच्या  विषयाला वाचा फुटेल याबद्दल आपलयाला धन्यवाद. कचरा जाळणे हे बेकायदेशीर तर आहेच पण त्याचबरोबर ते आरोग्याला देखील धोकादायक आहे. कारण अश्या धुरामुळे वायुप्रदूषण तर होतेच आणि त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो.  आपला प्रश्न हा "पर्यावरण" या महत्वाच्या विषयाशी आणि कायद्याशी निगडित आहे. सध्या मानव निर्मित वायु, जल, जमीन, ध्वनी अश्या प्रदूषणाच्या राक्षसाने ह्या पंचमहाभूतांचा    समतोलच बिघवडवून टाकला आहे ज्याचे  परिणाम आपण सर्वजण भोगत आहोत आणि त्यात अश्या प्रकारांनी वाढ होते.    सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रदूषणमुक्त पर्यावरण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असे जेव्हा राज घटना म्हणते    तेव्हा  पर्यावरण प्रदूषणमुक्त ठेवण्याचे घटनात्मक कर्तव्य (कलम ५१-ग) देखील आपल्यावरच ठेवलेले आहे ह्याची जाण  ठेवावी.

आपल्या  राज्य घटनेच्या कलम -२१ - "राइट टू  लाईफ"   या जगण्याचा  मूलभूत हक्क  हक्कामध्येच "प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा" समावेश मा. सर्वोच्च न्यायालयाने केला आहे , जो कोणालाही हिरावून घेता येत नाही.


आपल्याकडे दि एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन ऍक्ट , १९८६ सालीचा पारित करण्यात आला असून त्याखाली  "दि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रुल्स २०१६" चे तयार करण्यात आले आहेत. सॉलिड वेस्ट म्हणजे थोडक्यात रोज जो ओला / सुका कचरा -घनकचरा - निर्माण होतो त्याचे वर्गीकरण कसे करावे, त्याची विल्हेवाट कशी लावावी याबाबत स्पष्ट तरतुदी त्यात दिलेल्या आहेत. त्यामध्ये "वेस्ट जनरेटर" म्हणजेच थोडक्यात  ज्यांच्यामुळे कचरा निर्माण होतो म्हणजेच आपण सर्वजण , यांची जबाबदारी काय आहे हे नियम ४ मध्ये  विस्तृतपणे नमूद केले आहे. त्यामध्ये अश्या प्रकारच्या  कचरा जाळण्यावर  बंदी आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या नियमांचे उल्लंघन  केल्यास एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन ऍक्टच्या तरतुदींप्रमाणे ५ वर्षे कैद आणि/अथवा १ लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. यासाठी आपल्याला पोल्युशन कन्ट्रोल बोर्डाकडे रीतसर लेखी तक्रार करता येईल. त्याचप्रमाणे वरील नियमांप्रमाणे प्रत्येक महानगर पालिकेला घनकचरा व्यवस्थापनेचे स्वतंत्र नियम करण्याची मुभा असून त्याप्रमाणे पुणे महानगर पालिकेने देखील २०१७ मध्ये असे नियम केले आहेत त्याअन्वये आपण संबंधित विभागाकडेहि  लेखी तक्रार करू शकता. हि सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. 


वरील नियम वाचून जेवढे  समाधान होते  त्यापेक्षा जास्त समाधान  त्याची योग्य अंमलबजावणी झाली तर होईल कारण यात प्रत्येकाचा  "प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा"  हक्क अबाधित राहायला मदत होईल  असा कचरा जाळण्याने प्रचंड प्रमाणात वायुप्रदूषण होते आणि त्यामुळे अनेक जीवघेण्या आजारांना निमंत्रण दिल्यासारखे होते आणि जो कचरा जाळतो त्यालाही यातून सुटका नाही ! 


आता  शाळामंधून देखील पर्यावरण हा विषय बंधनकारक केला आहे जेणेकरून  नवीन पिढीला काही गोष्टी लहान वयातच कळल्या तर खूप फायदा होईल.  आहे. असो. अनेकांना कचरा जाळणे अवैध आहे हे माहिती नसेल, तरी त्याची माहिती करीन घ्या. कायद्याचे अज्ञानक कधीही बचाव होऊ शकत नाही. 


ऍड. रोहित एरंडे . ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©