दारू पिणे व उच्च रक्तदाब याचा कर्करोग होण्याशी संबंध विमा कंपनी सिध्द करू शकली नाही . ऍड. रोहित एरंडे ©
विमा कंपनीला उच्च न्यायालयाचा दणका .
दारू पिणे व उच्च रक्तदाब याचा कर्करोग होण्याशी संबंध विमा कंपनी सिध्द करू शकली नाही .
ऍड. रोहित एरंडे ©
वैद्कयीय विमा फेटाळला गेल्यावर विमा कंपनी आणि ग्राहक यांच्यामध्ये नेहमीच वाद होतात आणि विमा कंपनीची कारणे आणि ग्राहकांची स्पष्टीकरणे कधीच एकमेकांना मान्य होत नाहीत आणि मग कोर्टाची दारे ठोठवावी लागतात.
दारू प्यायची सवय आणि उच्च रक्तदाब विमा कंपनीपासून लपवून ठेवली आणि या दोन्ही कारणांनी कॅन्सर (कर्करोग) होतो याचा कोणताही पुरावा न देता विमा क्लेम नाकारल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच विमा लोकपाल आणि विमा कंपनीला चांगलाच दणका दिला. या केसची थोडक्यात हकीकत बघू. विमाधारक - श्री. प्रकाश मेहता यांनी 2003 साली रॉयल सुंदरम या कंपनीकडून वैद्यकीय विमा पॉलिसी घेतली होती. 2021 साली मिळालेल्या सल्ल्याने त्यांनी केअर हेल्थ इन्शुरन्स या कंपनीकडे जुनी पॉलिसी पोर्ट केली आणि रु. 5 लाख रुपयांची नवीन पॉलिसी घेतली आणि कंपनीच्याच सल्ल्यावरून त्यांनी रु. 50 लाख रुपयांची "टॉप-अप" पॉलिसी घेतली आणि या सर्वांचा मिळून ३ वर्षांचा Rs.13,23,634/- एवढा प्रिमिअम देखील भरला.
दुर्दैवाने 2022 साली तपासण्यांती श्री. मेहता यांना Non-Hodgkin’s Lymphoma (cancer) या आजार झाल्याचे निष्पन्न झाले आणि त्याच्या उपचारासाठी त्यांना वेळोवेळी केमो-थेरपी , रेडिएशन इ. उपचार घ्यावे लागले आणि त्यासाठीचा रु. Rs.17,77,151/-, एवढा क्लेम त्यांनी दाखल केला. मात्र त्यांच्या दुर्दैवाने कंपनीने "नॉन - डिस्क्लोजर" या कारणाखाली क्लेम फेटाळताना नमूद केले की श्री. मेहता यांनी त्यांना रोज दारू पिण्याची सवय असल्याचे आणि उच्च रक्तदाबाचा विकार असल्याचे लपवून ठेवले आहे. गंमत म्हणजे ही करणे कंपनीने त्यांना परत पॉलिसी नूतनीकरणाची नोटीस देखील पाठवली ! या विरुद्ध श्री. मेहता यांनी आधी कंपनीकडे पत्रव्यवहार केला,मात्र त्यात काहीही निष्पन्न न झाल्याने त्यांनी विमा लोकपाल यांच्याकडे तक्रार केली , ती देखील "दारू पिण्याची सवय" या कारणास्तव फेटाळली गेली. त्या विरुध्द श्री. मेहता यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. न्या. संदीप मारणे यांनी सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून याचिका मंजूर करताना विमा कंपनीने सदरील केलं रक्कम + 2023 पासून 8% व्याजाने श्री. मेहता यांना द्यावे असा निकाल दिला.
न्या. मारणे यांनी एकूणच विमा लोकपाल आणि इन्शुरन्स कंपनी यांच्या दृष्टिकोनाबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येते. न्यायालयाने नमूद केले की एकतर विमा कंपनीच्या बचावात देखील सातत्य नाही, कधी दारूचे व्यसन आहे असे म्हटले आहे तर कधी "ऑकेजनली" घेतात असे म्हटले आहे तर कधी रक्तदाबाचे कारण दिले आहे, असे कायद्याने चालणार नाही. त्यातच एवढी महत्वाची माहिती लपवून ठेवल्याचा कथित आरोप असणाऱ्या ८२ वर्षीय श्री. मेहता यांना नवीन पॉलिसी देण्यास देखील कंपनी उत्सुक आहे, हे न पटण्यासारखे आहे आणि यामुळेच रक्तदाब आणि दारू प्यायची सवय यामुळे कर्करोग होतो हा कंपनीचा युक्तीवाद न टिकणारा आहे. आणि रक्तदाबामुळे आणि दारूच्या सेवनामुळे संबधित कर्करोग होतो असा कुठलाही पुरावा कंपनीने ना आमच्यापुढे सादर केला ना विमा लोकपाल यांच्यापुढे, तरीही लोकपालांनी क्लेम रद्द केला हेही न पटणारे आहे. त्याचप्रमाणे, " पूर्व-आजाराची माहिती देणे क्रमप्राप्त असले तरीही एकदा का कंपनीने प्रपोजल फॉर्म मान्य करून, प्रिमियम स्वीकारून पॉलिसी जारी केली कि मग मात्र कंपनी पूर्व-आजाराची माहिती ग्राहकाने लपवून ठेवली किंवा प्रपोजल फॉर्म अर्धवट भरला या कारणांकरिता क्लेम नाकारू शकत नाही", या सर्वोच्च न्यायालयाच्या 'मनमोहन नंदा विरुध्द युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कं . या निकालाचाही उच्च न्यायालयाने आधार घेतला.
पॉलिसी धारकांसाठी हा निकाल महत्वाचा आहे. मात्र विम्यासंदर्भातील प्रत्येक तक्रारींची पार्श्वभूमी वेगळी असते हेही लक्षात घ्यावे. रक्तदाब आणि मधुमेह हे आजार नसून नसून जीवनशैलीचे विकार असल्याचे सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय ग्राहक आयोगाने विविध निकालांमधून स्पष्ट केले आहे. तरीही इन्शुरन्स फॉर्म भरताना एजन्ट बरोबरच तुमचेही डोळे उघडे असणे गरजेचे आहे. तसेच हा निकाल मद्यपानाला उत्तेजन देणारा आहे असाही समज संबंधितांनी करून घेऊ नये..
(संदर्भ : प्रकाश मेहता वि . इन्शुरन्स ओम्बड्समन व इतर, रि.पी. क्र. 18745 OF 2024, नि.ता. 9 मे 2025)
ऍड. रोहित एरंडे ©
(लेख कायद्याचे अभ्यासक आहेत)
Comments
Post a Comment