आपण ठरवतो एक आणि घडते दुसरेच.. ऍड. रोहित एरंडे. ©

आपण ठरवतो एक आणि घडते दुसरेच..

ऍड. रोहित एरंडे. ©

आपण ठरवतो एक आणि घडते दुसरेच.. अशी एक सत्यघटनेवर आधारित कथा.

प्रथमेशची लग्न घटिका समीप आली. हो, प्रथमेश म्हणजे आमच्या फॅमिली फ्रेंड असलेल्या बेलसरे काका काकूंचा एकुलता एक मुलगा.. लाडा कोडात वाढलेला. शाळेत, कॉलेज मध्ये हुशार. नंतर अपेक्षेप्रमाणे Uncle Sam च्या देशात (म्हणजेच अमेरिका हो)  उच्च शिक्षणासाठी गेला आणि त्याला पाहिजे तशी नोकरी देखील त्याला मिळाली..

इकडे त्याच्या आई - वडिलांनी मुली कधी बघायच्या असा लकडा प्रथमेश च्या मागे सुरू केला. आधी त्याने टाळले,पण जेव्हा खूपच विचारणा होवू लागली, तेव्हा मात्र त्याने १५ मे ला , त्याच्या वाढ दिवसाच्या दिवशी जुई आणि त्याच्या नात्याबद्दल आई - वडिलांना सांगून टाकले.

बेलसरे  काका काकू खुश झाले कारण एकतर चिरंजीव लग्नासाठी तयार झाले आणि जुई भालेराव तर प्रथमेश ची लहान पणापासूनची मैत्रीण, त्यांच्याच कॉलनीत राहणारी आणि अमेरिकेला पण दोघेही एकत्रच शिकत होते. जुईचेही आई वडील खुश झाली कारण लेक माहितगार आणि चांगल्या कुटुंबात जाणार होती. जुलै महिन्याच्या  पहिल्या आठवड्यात ती दोघे इकडे येणार होते आणि ऑगस्ट मध्ये  लग्न करून लगेचच अमेरिकेला परत जाणार होते आणि मग मात्र २-३- वर्ष ते भारतात परतण्याची शक्यता नव्हती.  त्याप्रमाणे बेलसरे आणि भालेराव काका काकूंनी चित्राव  गुरुजींना विचारून मुहूर्त शोधला आणि ८ ऑगस्ट हि तारीख पक्की केली   गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सर्व तयारी आणि मुहूर्त वगैरे प्रथमेश -जुईला सांगितले. 
 मात्र त्या  दोघांनीही घरच्यांना सांगून टाकले कि  काहीही झाले तरी लग्न रजिस्टर पध्दतीने होइल आणि कुठलेही धार्मिक कार्यक्रम लग्नाआधी वा नंतर करणार नाही आणि एकंदरीत त्यांनी ह्या निमित्ताने धार्मिक प्रथा - परंपरा ह्यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आणि शेवटी गाडी भारताच्या आणि अमेरिकेच्या तुलनेवर आली. 
८ ऑगस्ट नंतर मुहूर्त एकदम डिसेंबर मध्ये होता त्यामुळे दोघांच्याही आई वडिलांनी आधी आपापल्या परीने त्यांना समजवायचा प्रयत्न केला . एकतर  दोघेही एकुलते एक त्यामुळे लग्न थाटा- माटात आणि आपल्या पद्धतीने व्हावे असे वाटत होते. अखेर पोरांपुढे पालकांनी माघार घेतली.   मुलांना मुहूर्त असलेली तारीख देखील नको होती, त्यामुळे ९ ऑगस्ट ची तारीख निवडली गेली आणि कार्यालय बुक केले. 
मुलांच्या आग्रहाप्रमाणे पत्रिका न छापता मोबाईल वर मेसेज आणि तोंडी निमंत्रणे गेली. महिना आधी द्यावी लागणारी रजिस्टर लग्नाची नोटीस दिली. रजिस्ट्रारने  देखील सकाळी ११ च्या सुमारास येईन असे सांगितले. 

पण आपण म्हणतो ना "Man proposes and God Disposes".  लग्नाच्या आधी एक आठवडा कुठल्याश्या  राज्यव्यापी मोर्चाची घोषणा झाली आणि मोर्चाची आणि लग्नाची तारीख नेमकी एकच ठरली. सरकारने देखील खूप खबरदारी घेतली होती आणि अत्यावश्यक सेवा वगळता बाकीच्या सरकारी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु मोर्चामुळे लग्नावर परिणाम होणार नाही असे सर्वांना वाटत होते आणि कार्यालय व्यवस्थापनाने देखील दिलासा दिला.

लग्नाच्या दिवशी सकाळी ८ वाजता बेलसरे  काकांनी आठवणीसाठी रजिस्ट्रार साहेबांना फोन केला आणि त्यांचे उत्तर ऐकून  काका मटकन खालीच बसले. 'मोर्चा असल्यामुळे शासनाचा आदेश आहे की सर्व कामे स्थगित करण्यात आली आहेत '.  इकडे  लग्न जवळ येवून ठेपले होते, शे -  पाचशे लोक  समारंभाला येणार होती आणि रजिस्ट्रारने असे कारण सांगितल्यामुळे यक्ष प्रश्नच पुढे उभा राहिला. काकांनी लगेच भालेराव काका-काकूंना  फोन करून बोलावून घेतले. प्रथमेश -जुईला तर काय करायचे हेच कळेना. एकतर रजिस्ट्रारचे काम हे दुसरे कोणी करू शकत नाही. अखेर बेलसरे काकूंनी प्रस्ताव मांडला कि, "लग्नाची पद्धत वगळता बाकी सर्व  कार्यक्रम ठरला आहे,  , जर चित्राव गुरुजींना विचारून ते वैदिक पद्धतीने लग्न लावून देण्यास तयार असतील तर काय हरकत आहे ? "
 जुई -प्रथमेशची स्थिती तर सांगता हि येत नाही आणि सहन ही होत नाही अशी झाली होती.   इकडे चित्राव गुरुजी सर्व तयारीसह यायला तयार आहेत  म्हणल्यावर बेलसरे - भालेराव काका काकूंनी पोरांना निक्षून सांगितले, आता मात्र लग्न आम्ही सांगू तसेच होईल.   लगेच जवळच्या नातेवाईकांना, मित्र -मंडळींना निरोप गेले आणि लवकर यायला सांगितले. कार्यलयात प्रत्येकाच्या तोंडी हिच चर्चा कि अरे, ठरले काय होते आणि झाले काय ? अखेर हिंदू रिती -रिवाजांप्रमाणे काढीव मुहूर्तावर जुई -प्रथमेशचे लग्न लागले. आणि न करून करता काय ? कारण त्यांच्या आग्रहाखातर  लग्नाची तारीख आणि पद्धत  बदलली होती. झालेल्या सर्व प्रकारात त्यांची काही चूक नव्हती, पण शेवटी काय, जे घडायचे ते घडतेच. सध्या कोरोना मुळे असे प्रसंग आपल्यापैकी काही जणांवर आलेही असतील. पण म्हणतात ना, ' नाईलाज को क्या इलाज '!

(गोष्टीमधील नावे बदलली आहेत. )

धन्यवाद..🙏🙏

ऍड. रोहित एरंडे
©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©