मृत्यूपत्राची वैधता हि ते नोंदणीकृत आहे किंवा नाही यावर ठरत नाही : ऍड. रोहित एरंडे ©

 मृत्यूपत्राची वैधता हि ते नोंदणीकृत आहे किंवा नाही यावर ठरत नाही

आमच्या सासऱ्यांनी २ मृत्युपत्रे  केली होती.पहिले मृत्युपत्र रजिस्टर्ड होते त्याद्वारे त्यांनी त्यांची सर्व मिळकत त्यांच्या मोठ्या मुलाला -  माझे दीरांना दिली होती. नंतर मृत्युआधी काही महिने त्यांनी दुसरे मृत्युपत्र केले त्याद्वारे त्यांनी त्यांची मिळकत त्यांच्या धाकट्या मुलाला  म्हणजे  माझ्या मिस्टरांना दिली. पण दुसरे मृत्युपत्र  रजिस्टर केले नव्हते. आता कुठले मृत्युपत्र खरे मानायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पहिले मृत्युपत्र रजिस्टर्ड असल्याने तेच ग्राह्य धरले जाईल असे आम्हाला सोसायटीकडून  सांगण्यात आले आहे आणि दुसरे  मृत्यूपत्र असूच शकत नाही  असे दीर म्हणत आहेत.   तरी कृपया मार्गदर्शन करावे.
एक वाचक पुणे.
मृत्युपत्र म्हणजेच WILL या विषयाबद्दल आपल्याकडे भिती  असतेच परंतु त्यापेक्षाहि  गैरसमज किती आहेत हे दिसून येते. आपल्या प्रश्नाच्या निमित्ताने या  संदर्भातील महत्वाच्या कायदेशीर तरतुदींचा थोडक्यात आढावा घेणे गरजेचे आहे.  एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा कुठल्याही २ किंवा अधिक  व्यक्तींच्या हयातीमध्ये  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्ताने मिळू शकतो आणि दस्तनोंदणीनंतरच  तयार होणारा इंडेक्स-२ हा मालकी हक्काचा पुरावा म्हणून वापरला जातो. तसेच  एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने  तबदील होतो.    ता येतो.
मृत्युपत्र कायदेशीर ठरण्यासाठी :
 भारतीय वारसा कायद्याप्रमाणे कोणत्याही सज्ञान आणि ज्याची मानसिक स्थिती सुदृढ आहे अश्या व्यक्तीस स्वतः च्या स्वकष्टार्जित मिळकती संदर्भात मृत्युपत्र / इच्छापत्र म्हणजेच WILL करता येते. तर वडिलोपार्जित मालमत्तेमधील आपला अविभक्त हिस्सा देखील मृत्युपत्राने  देता येतो. मृत्युपत्राचा अंमल मात्र ते करणाऱ्याच्या मृत्युनंतर होतो, म्हणजेच मृत्युपत्र करणारा बोलायचा थांबला कि त्याचे मृत्युपत्र बोलायला लागते असे म्हणतात.  
मृत्यूपत्र कायदेशीर ठरण्यासाठी मृत्यूपत्रावर मृत्यूपत्र करणाऱ्याने आणि कमीतकमी दोन सज्ञान साक्षीदारांनी, एकमेकांसमोर मृत्यूपत्रावर सही करणे गरजेचे आहे. मृत्यूपत्रातील लाभार्थींना मात्र साक्षीदार होता येत नाही. मात्र  दोन्ही  साक्षीदारांनी एकाचवेळी सही केलीच  पाहिजे असे  नाही. त्याच प्रमाणे साक्षीदारांना मृत्युपत्रात काय लिहिले आहे, हेहि माहिती असणे अपेक्षित नाही. मृत्युपत्र सिध्द करण्यासाठी दोन पैकी एका साक्षीदाराची साक्ष घेणे अनिवार्य आहे.
मृत्यूपत्र करणाऱ्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम होती अश्या आशयाचे डॉक्टरचे सर्टिफिकेट असणे कायद्याने सक्तीचे नाही आणि केवळ ते नाही म्हणून मृत्यूपत्र बेकायदेशीर ठरत नाही. पण प्रॅक्टिकली असे सर्टिफिकेट असणे केव्हाही चांगलेच .  
मृत्यूपत्राची नोंदणी अनिवार्य नाही.
मृत्यूपत्रास कोणतीही स्टॅम्प ड्युटी लागत नाही, मृत्युपत्राची नोंदणी (रजिस्ट्रेशन)  करणेही कायद्याने बंधनकारक नाही.  याबाबतीत आपल्याकडे बरेच गैरसमज आहेत. मृत्यूपत्राची वैधता हि ते नोंदणीकृत आहे किंवा नाही यावर ठरत नाही. उदा. मृत्यूपत्राची नोंदणी केली  नसेल तर ते अवैध आहे हा  मोठा गैरसमज आहे आणि अनोंदणीकृत मृत्युपत्र असेल तर विविध परवानग्या मागताना  लोकांची उगाचच अडवणूक केली जाते आणि मग सरसकट   प्रोबेट आणण्याची सक्ती केली जाते, ज्याला वेळ आणि खर्च जास्त येतो. अशा  अडवणुकिविरुद्ध  विरुद्ध कोर्टात जाणे म्हणजे वेळ आणि पैसे खर्च होणार. त्यापॆक्षा   प्रॅक्टिकली आम्ही लोकांना मृत्युपत्र रजिस्टर करायला सांगतो एकतर त्याचा खर्च इतर दस्तांच्या तुलनेने कमी येतो आणि  जेणेकरून पुढचा  त्रास वाचतो.     नोंदणी कायदा, १९०८ प्रमाणे इतर कुठलेही दस्त हे अंमलात (execute )आणल्यानंतर ४ महिन्यापर्यंत  नोंदवावे लागतात, मात्र मृत्युपत्र  हे कधीही नोंदवता येते. त्याचप्रमाणे मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर देखील ते नोंदवता येते.
सर्वात शेवटचेच मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते :
मृत्यूपत्र हा असा  दस्त आहे  कि तो कितीही वेळा बदलता येते आणि सर्वात शेवटचेच मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते. असे वरील  दस्तांच्या बाबतीत होत नाही.   बदलेल्या परिस्थितीमुळे मृत्यूपत्रामध्ये योग्य ते बदल करावे लागू शकतात . तसेच  संपूर्ण मृत्युपत्र न बदलता पुरवणी-मृत्युपत्र (codicil ) देखील करता येते आणि त्यास मृत्युपत्राच्याच  सर्व कायदेशीर तरतुदी लागू होतात. वरील कायदेशीर तरतुदी लक्षात घेता अभ्यास करता आपल्या लक्षात येईल कि शेवटचे मृत्युपत्र ग्राह्य धरले जात असल्याने आणि मृत्युपत्राची नोंदणी करणे अनिवार्य नसल्याने शेवटचे मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते. परंतु  कोणताही कायदा लागू होतो कि नाही हे त्या केसच्या फॅक्टसवर  अवलंबून असते आणि आपल्या केसमध्ये तर   दोघेही आपलेच मृत्युपत्र वैध आहे असा   वाद निर्माण झाल्याचे दिसत असल्याने कोणते मृत्युपत्र वैध धरायचे हे सक्षम कोर्टच ठरवू शकेल.
धन्यवाद,

ऍड. रोहित एरंडे ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©