अमर्याद प्राणिप्रेमाला कायद्याची वेसण. - ऍड. रोहित एरंडे. ©

 अमर्याद प्राणिप्रेमाला कायद्याची वेसण.

ॲड . रोहित एरंडे ©

 आमच्या सोसायटीमध्ये एक  सभासद त्यांच्या गॅलरीमध्ये  कबुतरांना   खाण्यासाठी दाणे, चपातीचे तुकडे   आणि पाणी ठेवतात. त्यामुळे  आम्ही खाली राहणाऱ्या सभासदांच्या गॅलरीमध्ये कबुतरांची विष्ठा, पिसे , अन्नाचे कण अश्या गोष्टी सारख्या पडतात आणि याचा आम्हाला खूप त्रास होतो आहे आणि माझ्या वयोवृद्ध आईला श्वासाचे विकार सुरु झाले आहेत. सभासद महाशयांना हे थांबवण्याची विनंती केली तर  तुम्हाला भूतदया नाही, हे पुण्याचे काम आहे आणि त्यामुळे आम्ही काही हे थांबवणार नाही,  त्यामुळे तुम्हाला काय करायचे ते करा अशी धमकी देतात. सोसायटीकडे तक्रार करूनही काही उपयोग झाला नाही. तरी याबद्दल काय करता येईल. 

एक वाचक, पुणे. 

आपल्यासारखाच  प्रश्न काही वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयापुढे उपस्थित झाला होता आणि "आपल्या वर्तणुकीमुळे शेजारच्यांना  त्रास होऊ नये" या  नागरिकशास्त्राच्या    मूलभूत  तत्वाचा पुनरुच्चार करून उच्च न्यायालयाने अशाच एका प्राणिमित्रास कायद्याचा चाप लावला होता. 

मा. मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका निकालात "आपल्या वागणुकीमुळे शेजारच्यांना त्रास होऊ नये ह्या नागरिक शास्त्रातील अतिशय मूलभूत परंतु महत्वाच्या शिकवणुकीवर शिक्का मोर्तब केले आहे.(संदर्भ : पद्मा  ठाकोर विरुद्ध दिलीप सुमालाल शहा , २०१६(६) महा. लॉ  जर्नल , पान क्र. ३७४, मा. न्या. आर. एम . सावंत ).

 या केसमध्ये सुद्धा तक्रारदारांच्या  वर राहत असलेल्या प्रतिवादींनी त्यांच्या गॅलरीमध्ये  पक्ष्यांना दाणा -पाणी देण्यासाठी गैरकायदा लोखंडी ट्रे वजा प्लॅटफॉर्म उभा केला होता  आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात कबुतरांसारखे अनेक पक्षी जमा होऊन त्याची घाण वादींच्या गॅलरीमध्ये पडत असे आणि याही केसमध्ये वादींच्या वयोवृध्द वडिलांना त्रास होत होता. त्या केसमध्येहि  सोसायटीने कुठलीही कारवाई केली नव्हती. नाईलाजाने वादींनी दिवाणी कोर्टात दावा दाखल करून प्रतिवादींनी पक्ष्यांना दाणा -पाणी देऊ नये आणि वादींना त्रास होईल असे वर्तन करु नये ह्या करीता  मनाइचा  दाखल केला आणि तो मंजूर झाला. त्यावर प्रतिवादी यांनी असा दावा फक्त सहकार कोर्टातच चालेल, दिवाणी कोर्टात नाही असे नमूद करताना त्यांच्या त्या कृत्यामुळे कोणालाही त्रास  होत नसल्याचे नमूद केले होते. मात्र उच्च न्यायालयाने नमूद केले कि कोर्टाला अधिकार आहे कि नाही हे नंतर ठरेल, पण वादी हे त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहेत आणि सकृतदर्शनी पुराव्यांवरून हे सिध्द होते कि प्रतिवादींनी पक्षांच्या खाण्या-पिण्याच्यासाठी  उभारलेल्या ट्रे मुळे  वादी आणि इतर सभासदांना पक्षांच्या घाणीचा त्रास होत आहे. कोर्टानेपुढे नमूद केले कि प्राणीप्रेमी असणे गैर नाही मात्र आपल्या प्राणीप्रेमामुळे इतरांना त्रास होता काम नये. अर्थातच सर्व लोकांना एकाच तराजूने तोलणे चुकीचे ठरेल. 

  "जी व्यक्ती स्वतःसाठी अशी कोणतीही गोष्ट / वस्तू बाळगेल  कि जी वस्तू निसटल्यास इतरांना नुकसान होऊ शकते, अशी वस्तू त्या व्यक्तीने स्वतःच्या जबाबदारीवरच ठेवावी आणि त्या व्यक्तीने अशी काळजी न घेतल्यास त्या वस्तुमुळे  इतरांचे जर काही नुकसान झाले तर असे  सर्व नुकसान भरून देण्याची जबाबदारी हि त्या व्यक्तीवरच असेल"  या टॉर्ट कायद्याखालील प्रसिध्द असलेल्या रायलेंड विरुद्ध फ्लेचर या १८६८ सालच्या हाऊस ऑफ लॉर्ड, इंग्लंड  मधील प्रसिध्द  निकालाचा आधार घेतला.  Doctrine of  Strict  Liability च्या या तत्वानुसार प्रतिवादीचा हेतू गैर होता कि नाही आणि त्याने किती काळजी घेतली  हे महत्वाचे नसून त्याच्यामुळे इतरांचे नुकसान झाल्यास ते भरून देण्याची जबाबदारी प्रतिवादींवर असेल. याच तत्वावर आधारित  "कोणीही आपल्या जागेचा वापर हा दुसऱ्यांना त्रास होईल अश्या पद्धतीने करू शकत नाही" या पंजाब उच्च न्यायालयाच्या 'दर्शन राम वि. नजर राम' ह्या १९८९ सालच्या निकालाचाही आधार उच्च न्यायालयाने घेतला आणि   या निकालाचे तत्व  फक्त प्राणिप्रेम नाही तर इतर गोष्टीतही लागू होईल. 

 कबुतरांच्या घाणीमुळे अतिशय घातक   असे आजार होऊ शकतात असे तज्ञ्   डॉक्टरांचे मत आहे आणि आजार होताना प्राणीप्रेमी किंवा इतर असा भेद करीत नाही. तसेच प्राण्यांना खायला घालणे हे जर पुण्याचे काम असेल, तर नियम न पाळणे आणि इतरांना त्रास होईल असे वागणे हेहि मोठे पापच  आहे असे म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे    सदरील सभासदाचे वर्तन हे उपविधी ४८ (अ) अन्वये कारवाईस पात्र असून सोसायटीने उपविधी ४८ (बी ) प्रमाणे कारवाई करणे क्रमप्राप्त आहे, अन्यथा तुम्हाला सक्षम  कोर्टात जाऊन मनाईचा दावा करता येईल. 

वरील निकालांचा अर्थ प्राणी पाळता येणार नाहीत असा मात्र अजिबात नाही, तर  त्याचा अतिरेक होऊन इतरांना त्रास होऊ नये असा आहे. यासाठी मला समर्थांची आठवण होते. त्यांनी दासबोधात जी काही लोकांची वेग वेगळी लक्षणे सांगितली आहेत त्या मध्ये    'मर्यादेविण पाळी सुणे (श्वान), तो एक ...  ' हे लक्षण कोणाचे असेल हे सूज्ञास सांगणे न लगे.. .  


ऍड. रोहित एरंडे.

पुणे. ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©