"डास चावल्यामुळे मृत्यू झाल्यास इन्शुरन्स कंपनी नुकसान भरपाई देण्यास बांधील " - ऍड. रोहित एरंडे

"डास चावल्यामुळे  मृत्यू झाल्यास   इन्शुरन्स कंपनी नुकसान भरपाई देण्यास बांधील "
* ऍड. रोहित एरंडे *



डास चावल्यामुळे मलेरिया होऊन एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास असा मृत्यू अपघाती मृत्यू संबोधायचा का नाही असा प्रश्न राष्ट्रीय ग्राहक आयोगा पुढे नुकताच उपस्थित झाला. नॅशनल इन्शुरन्स कं . वि . श्रीमती. मौसमी भट्टाचार्जी (रिव्ही . पेटि . क्र. १२७०/२०१६).  
गेल्या काही दिवसांपूर्वी आपलीकडे कडे देखील चिकन गुनिया , डेंग्यू या डासांमुळे होणाऱ्या रोगांनी थैमान घातले होते आणि काही लोकांचे प्राण देखील गेले होते , त्या पार्श्वभूमीवर हा निकाल महत्वाचा आहे. 

ह्या केस ची थोडक्यात हकीकत बघूयात.  श्रीमती. मौसमी भट्टाचार्जी यांचे पती श्री. देबाशिष यांनी बँक ऑफ बरोडा कडून गृह कर्ज घेतले होते आणि त्याच बरोबर त्यांनी "बँक ऑफ बरोडा कर्ज सुरक्षा बिमा " हि अपीलकर्त्या इन्शुरन्स कंपनी ने ईशु  केलेली पॉलीसी देखील घेतली होती. ह्या पॉलीसी प्रमाणे जर विमा धारकाचा अपघाती मृत्यू झाला तयारी त्यास विम्याची रक्क्म मिळणार होती. 
दरम्यानच्या काळात श्री. देबाशिष ह्यांना मलेरिया झाला आणि त्या दुखण्यातच त्यांचे हॉस्पटिल मध्ये निधन झाले. त्यामुळे त्यांच्या वारसांनी इन्शुरन्स कंपनी कडे विम्याच्या रकमेकरिता क्लेम दाखल केला. मात्र इन्शुरन्स कंपनि ने क्लेम फेटाळून लावला. इन्शुरन्स कंपनी चे असे म्हणणे होते कि विमाधारकाचा मृत्यू हा  डास चावल्यामुळे झाला असून कुठल्याही अपघातामुळे झालेला नाही. डासा मुळे होणारा  मलेरिया हा आजार किंवा  रोग असून अपघात  नाही आणि त्यामुळे विम्याची रक्कम देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. 
मात्र इन्शुरन्स कंपनी विरुद्ध विमा धारकाच्या वारसांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार केली आणि जिल्हा ग्राहक मंचाने इन्शुरन्स कंपनीचे म्हणणे फेटाळून लावले. त्याच्या विरुद्ध दाखल केलेले अपील देखील राज्य ग्राहक आयोगाने फेटाळून लावले आणि प्रकरण राष्ट्रीय आयोगाकडे पोहोचले. 

राष्ट्रीय ग्राहक मंचाने देखील इन्शुरन्स कंपनी च्या विरुद्ध निकाल देताना खालील  दोन्ही निकालांवर शिक्कामोर्तब केले. संबंधित पॉलीसी मध्ये " कोणकोणत्या अपघतामध्ये मृत्यु झाल्यास विमा रक्कम मिळेल आणि कोणत्या नाही याची यादी दिली होती, परंतु "अपघात" ह्या शब्दाची व्याख्या काही केली नव्हती. राष्ट्रीय मंचाने पुढे नमूद केले कि संपूर्ण केस ही "अपघात" ह्या एका शब्द भोंवोंती फिरत आहे. "एखादी घटना अनपेक्षितपणे आणि कोणतीही पूर्वसूचना ध्यांनीमनी नसताना घडणे आणि त्यामुळे नुकसान होते, म्हणजे अपघात" अशी व्याख्या मंचाने केली.. "An  Accident is something that  happens unexpectedly and  is  not planned in  advance  and  that causes  injury  " अश्या आशयाची  ऑक्सफर्ड शद्बकोषतील व्याख्येचा आधार घेऊन मंचाने पुढे नमूद केले एखाद्या व्यक्तीस दास कधी चावेल ह्याकची पूर्व  कल्पना असणे अशक्य असते आणि ती एक अपघातासारखीच अचानक पणे  घडणारी घटना आहे. राष्ट्रीय मंचाने पुढे जाऊन त्यांच्याच एका आधीच्या निकालाचा आधार घेतला (श्री. मातबर सिंग वि. ओरिएन्टल इन्शुरन्स कं ., नि.ता. ०५/०९/२०१४) ज्यामध्ये राष्ट्रीय मंचाने इन्शुरन्स कंपनी च्या वेब साईट वर उपलब्ध असलेल्या माहितीचा आधार घेतला, ज्या मध्ये  सर्प दंश, हिम दंश, श्वान दंश अश्या घटनां देखील "अपघात" ह्या प्रकारातच मोडतात असे नमूद केले आहे आणि त्यामुळे डासांमुळे होणारा मलेरिया हा एक रोग / आजार असून अपघात नाही , हा इन्शुरन्स कंपनी चा युक्तिवाद अजिबात मान्य करता येणार नाही असे पुढे मंचाने नमूद केले. 

हा निकाल खूप महत्वाचा आहे आणी आपल्या  सगळ्यांचे डोळे उघडणारा आहे. कारण विमा पॉलीसी घेणे त्यातल्या त्यात  मोठाली कर्जे घेतल्यावर तर  अश्या प्रकारची  पॉलीसी घेणे किती  गरजेचे असते हे आपल्याला कळेल , जेणे करून आपल्या वारसांना नंतर काही त्रास होत  नाही .  ह्या साठी तज्ज्ञ व्यक्तिचा सल्ला अवश्य घ्यावा. त्याच प्रमाणे आपल्या पैकी अनेक जणांनी   डेंग्यू, चिकन गुन्या , मलेरिया या सारख्या डासांमुळे होणाऱ्या जीवावर उदभवणाऱ्या रोगांचा अनुभव घेतला असेल आणि काही दुर्दवै लोकांनां जर त्यांचे प्राण गमवावे लागले तर  त्यांच्या वारसांना  देखील अश्या प्रकारच्या  पॉलीसीचा फायदा मिळू शकतो.  अर्थात ह्या सर्वामध्ये तुमची पॉलीसी आणि पॉलीसीच्या अटी  आणि शर्ती ह्या तितक्याच महत्वाच्या असतात हेही लक्षात ठेवावे . 

Adv.  रोहित एरंडे. 
पुणे ,  ©

ता.क 
मात्र ह्या निकालाविरोधात इन्शुरन्स कंपनीने मा. सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते (सिव्हिल अपील क्र . २६१४/२०१९) आणि मा. सर्वोच्च न्यायालयाच्या  मा. न्या. धनंजय चंद्रचूड आणि मा. न्या. हेमंत गुप्ता ह्यांच्या खंडपीठाने ग्राहक आयोगाचा निर्णय रद्द केला  आहे (निकाल दिनांक २६/०३/२०१९)

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©