ताबा कोणाचा ? ऍड. रोहित एरंडे

  ताबा कोणाचा ?

ऍड. रोहित एरंडे.

 रुक्ष वाटणाऱ्या, किचकट कायद्यांचा अभ्यास कराव्या लागणाऱ्या   वकीली  व्यवसायात कधी कधी हसवणुकीचे  प्रसंग येतात. कोर्टातील विविध दाव्यांमध्ये  घरमालक -भाडेकरू ह्यांच्यामधील दावे  हिरीरीने भांडली जातात आणि कधी कधी कारणे देखील खूप मजेशीर असतात.  काही  वर्षांपूर्वी    पुणेरी बाण्यासाठी  प्रसिद्ध असलेल्या   पेठेमधील एका जुन्या वाड्यातील  जागेची केस आम्ही घरमालकातर्फे  लढवत होतो . ह्या केस मध्येएक मजेशीर प्रश्न उद्भवला   की वाड्यामधील  सामाईक   संडास कोणाच्या ताब्यामध्ये   आहे. घरमालक -भाडेकरू दोघेही जण दुसऱ्या ठिकाणी राहत होते, परंतु    ताबा मात्र स्वतःचा सांगत होते . शेवटी कोर्टाने "कोर्ट-कमिशनर" नेमून संडासचा ताबा कोणाकडे आहे हा अहवाल मागितला. १५ दिवसांनी "कोर्ट-कमिशनर" ने ठरविलेल्या  वेळी मी, तसेच  भाडेकरू आणि त्यांचे वकील जागेवर जाऊन पोहोचलो. संडासाला तर बाहेरून कुलूप लावलेले होते. मात्र अर्धा  तास झाला तरी आमच्या पक्षकाराचा  - घरमालकाचा काही पत्ता नव्हता. त्याचा फोन देखील बंद होता. शेवटी  तासाभराने   कोर्ट कमिशनरने त्याच्या कामाला  सुरुवात केली आणि ज्याचा ताबा असेल त्याने कुलूप उघडावे असे   सांगितले.   भाडेकरू आमच्याकडे विजयी मुद्रेने बघत, हसत हसत पुढे आला. खिश्यामधील किल्ली बाहेर काढून कोर्ट कमिशनरला दाखवली आणि कुलूप उघडून संडासाचे दार उघडून कमिशनर कडे बघत म्हणाला, "बघा, मी म्हणत होतो ना कि ताबा आमच्याकडेच आहे, मालक तर घाबरून आला देखील नाही". मात्र आमचे सर्वांचे अवाक झालेले चेहरे बघून त्याला काही कळेना आणि आणि त्याने मागे वळून बघितले तर घरमालक संडासाच्या आत मध्ये  हसत उभा होता.!!  आम्हाला काहीच कळेना. तेव्हा मालकाने सांगितले की ,"अहो मला माहिती होते की हा कुलूप लावणार, म्हणून मी हळूच २ दिवसांपूर्वी  कुलुपाची  दुसरी किल्ली करून आणली आणि कमिशनचे काम सुरु होण्याच्या आधी अर्धा तास आधी मुलाला घेऊन  आलो, माझ्या किल्लीने कुलूप उघडले आणि मुलाला परत कुलूप लावून निघून जायला सांगितले, आता तुम्हीच सांगा कमिशनर साहेब, ताबा कोणाचा ?" भाडेकरू वगळता आम्हा सर्वांची हसून हसून पुरेवाट झाली आणि कोर्ट कमिशरने  देखील तसाच रिपोर्ट दिला. जागेच्या मालकी पेक्षाही  जागेचा ताबा असणे म्हणजे १० पैकी ९ मार्क मिळण्यासारखे असते ह्या कायदेशी तत्वाचा  मजेशीर प्रत्यय अश्या रितीने आला.

ऍड. रोहित एरंडे
पुणे.

Comments

  1. कोणत्या वृत्तपत्रात आपण हा लेख लिहिला आहे?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©