धडा डेबिट कार्डचा - नवरा - बायको एकमेकांचे कार्ड वापरू शकतात का ? कायदा काय म्हणतो.. ऍड. रोहित एरंडे ©

धडा डेबिट कार्डचा -  नवरा - बायको एकमेकांचे कार्ड वापरू शकतात का ? कायदा काय म्हणतो..

ऍड. रोहित एरंडे ©


एटीएम मधून पैसे काढण्यासाठी   स्वतःहून आपले डेबिट कार्ड   आपल्या वैवाहिक जोडीदाराला देणे  ही    वरकरणी साधी  वाटणारी  गोष्ट चांगलीच महागात पडू शकते हे बेंगलोर येथे   घडलेल्या एका केस वरून  आपलयाला लक्षात येईल.  सुमारे २०१४ चे हे प्रकरण दिसत असले, तरी त्याची बातमी नुकतीच सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल  झाली होती.  बाळंतपणाच्या रजेवर असलेल्या वंदना नामक एका महिलेने तिच्या स्टेट बँकेमधील खात्यामधून  रू.२५,०००/- काढण्यासाठी तिच्या नवऱ्याला, राजेशला, स्वतःचे डेबिट कार्ड अर्थातच पिन नंबरसह दिले.  राजेशने जवळच्या एटीएम मध्ये जाऊन कार्ड स्वाईप केले आणि त्याला रू. २५,०००/- खात्यातून वर्ग झाल्याची   स्लिप देखील मिळाली, परंतु प्रत्यक्षात पैसे मात्र काही मिळाले नाही. त्यामुळे राजेशने लगेचच बँकेच्या कॉल सेन्टरला  फोन करून तक्रार नोंदवली आणि त्याला सांगण्यात  आले कि एटीएम मशीन सदोष असल्यामुळे असा प्रकार घडला आहे, तरी २४ तासांत  पैसे अकाउंटला  जमा होतील. परंतु प्रत्यक्षात बँकेकडून कोणतीच हालचाल झाली नाही आणि पैसेहि  परत मिळाले नाहीत. त्यामुळे खातेदाराने बँकेकडे पाठपुरावा सुरु केला आणि  खातेदाराला पैसे मिळाले आहेत, असे आधी  सांगून बँकेने तक्रार बंद केली. शेवटी खातेदाराने बँकेविरुद्ध  ग्राहक न्यायालयात दाद मागितली. खातेदाराने त्या दिवशीचे  सीसीटीव्ही  रेकॉर्डिंगही दाखल केले  ज्यात हे   स्पष्ट दिसून आले कि राजेशला पैसे मिळाले नाहीत. तसेच माहिती  अधिकारात देखील अर्ज केल्यावर खातेदाराला  कॅश व्हेरिफिकेशन रिपोर्ट बद्दल अशी माहिती मिळाली कि त्या दिवशीच्य हिशोबामध्ये रु.  २५,०००/- एटीएम मशीन  मध्ये जादा  होते. अर्थात हा रिपोर्ट बँकेने कोर्टात अमान्य केला आणि असा  बचाव घेतला कि  एकतर  डेबिट कार्ड हे "अहस्तांतरणीय" असते  आणि त्यातील  पिन नंबर सारखी माहिती कोणासहि सांगणे हे एटीएम कार्ड नियमांच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे खातेदाराने स्वतःच्या कार्डाचा  पिन नंबर तिच्या नवऱ्याला सांगणे हे  नियमाचे उल्लंघन  होत असल्यामुळे  बँक कोणतेही पैसे देणे लागत नाही. अखेर २०१८ मध्ये केसचा निकाल लागला आणि ग्राहक न्यायालायने तक्रार फेटाळताना नमूद केले कि पिन नंबर त्रयस्थ व्यक्तीस सांगणे हे नियमांचे उल्लंघन आहे,  त्या ऐवजी वंदनाने स्वतः सही केलेला  चेक किंवा पैसे काढण्याची स्लिप भरून दिली असती तरी चालले असते.  ह्या केस मध्ये पुढे अपील झाले की नाही हे समजून येत नाही.

आता आपल्या लक्षात येईल किती तरी वेळा आपल्या पैकी अनेकांनी आपले कार्ड आपल्या वैवाहिक जोडीदाराला किंवा मुलाला-मुलीला वापरण्यास दिले असेल, कारण काहीही असो. तुमचे नाते कितीही जवळचे असले तरी नियमाप्रमाणे अशी दुसरी व्यक्तीहि त्रयस्थच ठरते.   प्रत्येक बँकेची एटीम बाबतचे वेगळी नियमावली असते, त्याची माहिती करून घेणे इष्ट. तसेच  बहुतेक ठिकाणी एटीएम कार्डची माहिती कोणाशी देऊ नये असे लिहिलेलं आढळतेच. त्यामध्ये ग्राहकांची सुरक्षितता हेच ध्येय असते.  वरील केस बद्दल बोलायचे झाल्यास ही केस  सकृत  दर्शनी 'फेल्ड ट्रँजॅक्शन' मध्ये मोडते. अश्या  फेल्ड ट्रँजॅक्शन  बाबतीत आरबीआय ने २०/०९/२०१९ रोजीच्या एका  परिपत्रकामध्ये एसओपी   नमूद केली  आहे, परंतु त्यामध्ये ह्या वरील केस सारखेच   फेल्ड ट्रँजॅक्शन झाले तर बँक पैसे देणे लागत नाही असे स्पष्टपणे नमूद  केल्याचे आढळून येत  नाही. त्याचप्रमाणे ०६/०७/२०१७ रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे बेकायदेशीर इलेट्रॉनिक बँकिंग व्यवहार झाल्यास बँकेचे  आणि ग्राहकाचे हक्क आणि कर्तव्ये कोणती, ह्यांचा परामर्श घेतला आहे आणि त्या प्रमाणे, ग्राहकाने बेकायदेशीर इलेट्रॉनिक बँकिंग व्यवहार केला हे सिद्ध करण्याची  जबाबदारी बँकेवर आहे. थोडक्यात अश्या केसेस साठी एकच आणि स्पष्ट नियमावली करणे गरजेचे आहे.

वरील केसमध्ये  समजा जॉईंट अकॉउंट असते , तर प्रश्न आला नसता.  येथे विधिज्ञांची मतमतांतरे  आहेत. काहींच्या मते बँक नियमाप्रमाणे वागली आहे तर काहींच्या मते    बँकेने पैसे परत करायला पाहिजे होते कारण प्रत्यक्षात बँकेने पैसे कोणालाच दिले नव्हते किंवा सायबर  फ्रॉड देखील झाले  नव्हते आणि पैसे दिले नाही, हे सीसीटीव्ही मध्ये पण दिसत होते. काहींच्या मते आरबीआय च्या नियमाप्रमाणे जर  समजा बायकोने तक्रार केली असती कि नवऱ्याने माझ्या संमतीविरुद्ध कार्ड वापरून  पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तर  बेकायदेशीर इलेट्रॉनिक बँकिंग व्यवहार झाला म्हणून  बँकेने कदाचित पैसे दिले असते. असो. सध्याच्या ऑनलाईन घोटाळ्यांच्या ह्या जमान्यात जास्तीत जास्त काळजी घेणे हे आपल्या हातात आहे. सोयी तितक्या गैरसोयी हे आपल्याला दिसून येईल.  

ह्या विषयाचा  अजून एका  कंगोऱ्याबद्दल सांगावेसे वाटते. एकमेकांचे  अकाउंट डिटेल्स, अकॉउंट / फोन पासवर्ड इ. जोडीदाराला माहित असावेत कि नाही, ह्या बद्दल असलेली  अगदी टोकाची मते वकीली व्यवसायात आम्हाला  दिसून येतात. घटस्फोटांच्या केसेस मध्ये किंवा जोडीदार मयत झाल्यावर असे  प्रश्न ठळकपणे समोर येतात . 


धन्यवाद.   🙏🙏

ऍड. रोहीत  एरंडे. 

पुणे.©

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©