सोसायटी शेअर ट्रान्सफर-फी किती घेता येते आणि कधी माफ होऊ शकते ? ऍड. रोहित एरंडे.©

 सोसायटी शेअर ट्रान्सफर-फी किती घेता येते आणि कधी माफ होऊ शकते ?

ऍड. रोहित एरंडे.©


सोसायटी आणि सभासद ह्यांच्यामधील वादांमध्ये पहिल्या तिघांमध्ये स्थान असेल तर ते ट्रान्स्फर फी, मेंटेनन्स आणि ना-वापर शुल्क ह्या संबंधातील वाद. सोसायटीमधील सदनिका विकताना सभासदत्व हस्तांतरण फी म्हणजेच ट्रान्सफर फी पोटी भरमसाट रकमा आकारल्या जाण्यावरून अनेक तक्रारी आल्यामुळे महाराष्ट्र शासनाने दि. ०९/०८/२००१ रोजी काढलेल्या अध्यादेशाप्रमाणे जास्तीत जास्त रु. २५,०००/- सभासदत्व ट्रान्सफर फी आकारता येईल असे स्पष्ट केले, जे आज रोजी देखील लागू आहे आणि ह्यावर मा. उच्च न्यायालयाचे स्पष्ट निकाल आहेत. परंतु आजही त्या बद्दल वाद चालूच असतात. जे प्रत्यक्षपणे करता येत नाही ते अप्रत्यक्षपणे करणे ह्याप्रमाणे डोनेशनच्या नावाखाली अवाच्या सवा ट्रान्सफर फी आकारता येणार नाही तर जास्तीत जास्त रू.,२५,०००/- ट्रान्सफर फी इतकीच आकारता येईल असा निकाल अलंकार गृहरचना सोसायटी विरुद्ध अतुल महादेव भगत (याचिका क्र . ४४५७/२०१४) या याचिकेवर मा. न्या. मृदुला भाटकर यांनी तसेच न्यू इंडिया को .ऑप . सोस . विरुद्ध महाराष्ट्र सरकार. (संदर्भ :२०१३) २ Mh .L .J . ६६६'.) या निकालपत्रातहि दिला होता . मा. मुंबई उच्च न्यायालयाच्याच 'सिंध सहकारी सोसायटी विरुद्ध इनकम टॅक्स ऑफिसर' ह्या केस मध्ये २००९ साली दोन सदस्यीय खंडपीठाने निकाल देताना असे नमूद केले की कुठल्याही सहकारी सोसायटीला नियमांच्या अधीन राहूनच सभासदांकडून पैश्यांची मागणी करता येते आणि सभासदांना वेठीस धरून नफा कमावणे हे बेकायदेशीर आहे आणि जर का अशी कुठली रक्कम सोसायटीने दबाव टाकून किंवा सरकारी नियमांविरुद्ध घेतली असेल, तर ती रक्कम सोसायटीने संबंधित सभासदास परत करावी. जर का अशी रक्कम सोसायटीने परत नाही केली तर त्या रकमेस नफेखोरी समजून कायद्याप्रमाणे त्यावर इनकम टॅक्स लागू होईल असेही कोर्टाने नमूद केले.

जादा मेंटेनन्स, जादा ट्रान्सफर फी किंवा ना वापर शुल्क आकारण्यासाठी सोसायट्यांच्या एक समान बचाव दिसून येतो की "आमच्या bye -laws मध्ये तश्या तरतुदी आहेत आणि bye -laws उपनिबंधकांनी मान्य केले आहेत". अर्थात हा बेगडी बचाव कोर्टात टिकला नाही कारण bye -laws हे कधीही कायद्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाहीत असे अनेक निकालांमधून आज पर्यंत स्पष्ट झाले आहे.  


ट्रान्सफर फी कधी माफ होऊ शकते ?

आदर्श उपविधी म्हणजेच मॉडेल सोसायटी बाय लॅIज मध्ये असे स्पष्टपणे नमूद केले आहे कि सभासदाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना किंवा कायदेशीर वारसांना किंवा नॉमिनीला शेअर ट्रान्सफर करताना किंवा सभासदांनी आपापसांमध्ये एकमेकांच्या सदनिका तबदील केल्या तरच ट्रान्सफर फी आकारता येणार नाही.

अर्थात ट्रान्सफर फीची तरतूद अपार्टमेंट बाबतीत लागू होत नाही. अपार्टमेंट मालकाला अपार्टमेंट कोणालाही विकण्याचा किंवा बक्षीस पत्र, हक्क सोड पत्र इ द्वारे तबदील पूर्ण अधिकार आहे आणि त्यासाठी अपार्टमेंट असोसिएशनच्या परवानगीची गरज नसते त्यामुळे अशी ट्रान्सफर फीज कोणी घेत असल्यास ते बेकायदेशीर आहे.

धन्यवाद. काळजी घ्या..

ऍड. रोहित एरंडे.  ©

पुणे. 

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©