वॉचमन, नोकर ह्यांना राहण्यासाठी दिलेल्या जागेत काहीही हक्क नसतो. ऍड. रोहित एरंडे ©

वॉचमन, नोकर ह्यांना राहण्यासाठी दिलेल्या  जागेत काहीही हक्क नसतो 

आमच्या सोसायटीमध्ये वॉचमनला राहण्यासाठी , केवळ शब्दावर एक पैसाही न घेता  पार्किंग एरिया  मधील एक खोली आणि संडास बाथरूम वापरायला दिले होते. आता सोसायटीला काही कारणास्तव दुसरा वॉचमन नेमायचा आहे, परंतु पहिला वॉचमन खोली खाली करण्यास नकार देत आहे आणि 'मी आता सोसायटीचा भाडेकरू झालो आहे, तुम्ही मला काढूच शकत नाही' अशी धमकी देतोय, तर  सोसायटी खोलीचा ताबा घेवू शकते का किंवा कसे, ह्याबद्दल मार्गदर्शन करावे. 

सोसायटी पदाधिकारी, पुणे . 

आपल्या जागेचा सांभाळ करण्यासाठी केअर -टेकर , वॉचमन, नोकर ह्यांना राहण्यासाठी आणि तेही मोफत जागा देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. जेणेकरून त्यांना डोक्यावर छप्पर मिळते आणि जागा मालकांची  सोय होते. परंतु अश्या केलेल्या उपकाराची फेड जेव्हा अपकाराने केली जाते, तेव्हा नाईलाजास्तव कोर्टाची पायरी चढावी लागते ह्याचे हि केस म्हणजे उत्तम उदाहरण आहे.  "कितीही काळ राहिले म्हणून केअर-टेकर, वॉचमन, नोकर ह्यांना वापरायला दिलेल्या जागेत कुठलाही हक्क प्राप्त होत नाही" असे  मा. सर्वोच्च न्यायालयाने विविध निकालांमध्ये स्पष्ट केले आहे. अश्या विना मोबदला जागेत राहणाऱ्या  केअर -टेकर , वॉचमन, नोकर ह्यांना कायद्याच्या भाषेत " ग्रॅच्युचीअस लायसेन्सी" असे म्हणतात. केअर-टेकर, नोकर , भाडेकरू ह्यांनी कायम लक्षात ठेवावे कि "एकदा भाडेकरू कि आयुष्यभर भाडेकरू' असे होत नाही. कधीतरी मूळ मालकाला जागेचा ताबा द्यावाच लागतो. केवळ लाईट बिलावर किंवा  मतदार यादीत नाव आहे ह्यावरून जागेचा वैध  ताबा आहे हे सिद्ध होत नाही, असे कोर्टांचे निकाल आहेत. 


ह्यासाठी  २०१२ साली (संदर्भ : 2012 (5) SCC 370) मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ३ सदस्यीय खंडपीठाने 'मारिया फर्नांडिस विरुद्ध इरॅसमो सिक्वेरीआ' ह्या केसमध्ये जागा मालकाच्या बाजूने निकाल देताना खालील काही महत्वपूर्ण निकाल दिला  आणि खोटी  केस केली म्हणून केअर-टेकरला रु.५०,०००/- चा दंड देखील केला.   

१) पैसे न देता म्हणजेच ज्यांना आपुलकीने / मेहेरबानीने, ज्याला कायद्याच्या भाषेमध्ये 'ग्रॅच्युचिअस लायसेन्सी' असे म्हणतात, त्यांना राहण्यासाठी /वापरण्याकरिता  जागा दिली आहे  अश्या लोकांना सदरील  जागेमध्ये, त्या व्यक्ती कितीही वर्षे राहत असल्या, तरी कोणताही हक्क /अधिकार प्रप्त होत नाही. कारण अश्या व्यक्तींकडे जरी जागेचा ताबा असला तरी तो ताबा जागामालकाच्या वतीनेच  असतो.  

२) अश्या केअर टेकर, वॉचमन, नोकर किंवा प्रेमापोटी दिलेली  जागा वापरणारे  व्यक्ती  ह्यांचा ताबा वाचविणे हे कोर्टांसाठी योग्य (जस्टिफाईड) होणार नाही. 

३) केवळ ज्या व्यक्तीकडे योग्य आणि कायदेशीर भाडेकरार, लीज डिड किंवा  लिव्ह लायसेन्स असेल अश्या व्यक्तींनाच कोर्टाकडे ताब्यासाठी दाद मागता येईल. 

४) जर का अश्या व्यक्तींनी कोर्ट त्यांचा कथित ताबा वाचावा  म्हणून दावा केला, तर अश्या व्यक्तींनी दाव्याचा निकाल लागेपर्यंत  'चालू बाजार भावाप्रमाणे' ठराविक रक्कम दरमहा कोर्टात भरावी. हि रक्कम  दावा विरुद्ध गेला तर परत भरेन ह्या अटीवर  घरमालक काढून घेऊ शकतो. मात्र अशी रक्कम भरण्यास कुचराई केली तर कोर्ट जागेचा ताबा मालकाला देण्याचा हुकूम करू शकते तसेच दावा देखील रद्द होऊ शकतो असेही कोर्टाने पुढे नमूद केले आहे. 

मालकी हक्काच्या तुलनेत ताब्याला जास्त महत्व असते आणि कोर्टातील वाद हे बहुतांशी वेळा ताबा वाचविण्यासाठी किंवा घेण्यासाठीच केले जातात आणि म्हणूनच  "ताब्याला १० पैकी ९ मार्क " असे कायद्यात  वचन आहे. तसेच  कोणी कायदेशीर भाडेकरू असो वा  घुसखोर, वैध मार्गानेच ताबा घेणे कायद्याला अभिप्रेत आहे.  त्यामुळे सोसायटीने रितसर आधी वॉचमनला वकीलांमार्फत नोटीस द्यावी.  तडजोडीने आणि दोघांना मान्य अश्या अटींवर प्रश्न सुटला तर उत्तमच. नाहीतर कोर्टाची पायरी चढण्याशिवाय पर्याय नाही. मात्र "वन्स बीटन,ट्वाईस शाय ", ह्या इंग्रजी उक्तीप्रमाणे  यापुढे अश्या लोकांना जागा वापरण्यास देण्याआधी रीतसर लेखी नोकरनामा किंवा तत्सम करार  तज्ज्ञ वकीलांकडून करून घेणे हितकारक राहील. 


 ऍड.  रोहित एरंडे ©


Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©