कॉमन /ओपन पार्किंग बिल्डर विकू शकत नाही .- ऍड. रोहित एरंडे ©

 कॉमन /ओपन पार्किंग  बिल्डर विकू शकत  नाही .

प्रश्न : March 02nd
मी अंबरनाथ येथील एका सोसायटीत फेब्रुवारी2020 मध्ये  बंदिस्त गॅरेज खरेदी केलेले आहे,त्याची सह दुय्यय निबंधक यांचेकडे मुद्रांक शुल्क भरून नोंदणी केलेली आहे ,तसेच या गॅरेजला नगरपालिका ने व्यावसायिक दराने मालमत्ता कर आकारणी केली आहे.या गॅरेजला सभासदत्व देण्यासाठी सोसायटी ने नकार देत सुप्रीम कोर्टाच्या नाहलचंद लालूचांद वि पांचाली  सोसायटी 2010 या निर्णयाचा आधार घेतलेला आहे .हे योग्य आहे का ? मी सोसायटी चा सभासद होण्यास पात्र आहे का ? सोसायटी सभासदत्व देत नसल्यास काय करावे .
शफिक शेख ,अंबरनाथ
उत्तर : आपली केस थोडी युनिक  आहे असे वाटते. सर्वप्रथम आपण खरेदी केलेली जागा हि ,  सर्वसामान्य भाषेत  ज्याचा उपयोग वाहने लावण्यासाठी होतो त्यास्वरूपाची आहे, का फ्लॅटसारखे  एक स्वतंत्न  युनिट (सदनिका)  आहे, हे तपासायला पाहिजे आणि त्यासाठी मंजूर बांधकाम नकाशामध्ये आणि आपल्या करारामध्ये काय लिहिलेले आहे हे तपासणे गरजेचे आहे. कारण  ते एक स्वतंत्र युनिट असल्यास सभासदत्व मागण्याचा आपल्याला अधिकार मिळू शकतो. ह्यासाठी  आदर्श उपविधी ३(६) मधील "सदनिकेच्या" व्याख्येचा आपल्याला फायदा होऊ शकतो. ह्या व्याख्येप्रमाणे सदनिका म्हणजे  अशी जागा जी अर्थ, निवास / कार्यालय/  शोरूम /दुकान/गोदाम ह्या कारणांकरिता वापरता येऊ शकते  आणि ह्यामध्ये गॅरेज /दवाखाना /कन्सल्टिंग रूम /रुग्ण चिकित्सालय /पिठाची गिरणी /कोचिंग क्लासेस /पाळणाघर /ब्युटी पार्लर यासाठी  वापरावयाच्या  इमारतीचा भाग असलेल्या अन्य जागेचा व  अपार्टमेंटचाहि समावेश होतो.  पुण्यासारख्या ठिकाणी पूर्वीच्या अनेक बिल्डिंगमध्ये असे "गॅरेज" आढळून येईल, ज्याचा उपयोग बहुतांशी वेळा व्यावसायिक कारणांसाठी केला जातो आणि त्याचे वेगळे सभासदत्व दिलेले आढळते.      परंतु मंजूर नकाशामध्ये नुसते पार्किंग म्हणून जे  दर्शविले असते  ते एकतर त्याच बिल्डिंगमधील फ्लॅट धारकांना ऑलॉट केले जाते आणि तिथे राहत नसलेल्या त्रयस्थ व्यक्तीला नुसते  पार्किंग विकण्याचा प्रश्नच येत नाही.
  कॉमन /ओपन पार्किंग आणि स्टील्ट पार्किंग बिल्डरला विकता येत नाही, हे लक्षात घ्यावे.    रेरा कायद्याच्या कलम २ (एन) मध्ये सामाईक (कॉमन) एरिया आणि फॅसिलिटीज कोणत्या ठेवायला लागतील  ह्याची स्पष्ट  यादीच  दिली आहे, तर उपकलम (iii ) मध्ये बेसमेंट, गच्ची, पार्क, प्ले एरिया ह्याच बरोबर  ओपन पार्किंगचा देखील स्पष्ट उल्लेख कॉमन फॅसिलिटीज मध्ये  केलेला आहे. ह्या ओपन पार्किंग मध्ये "स्टील्ट पार्किंग" चा देखील समावेश होतो.   आपण नमूद केलेल्या   केसमध्ये मा.  सर्वोच्च न्यायालयाने  नमूद केले आहे  की कॉमन किंवा ओपन पार्किंग हे काही 'मोफा' कायद्याच्या "फ्लॅट" च्या व्याख्येमध्ये बसत नाही आणि त्यामुळे ते विकण्याचा बिल्डरला अजिबात अधिकार नाही. त्याचप्रमाणे "स्टील्ट" पार्किंग देखील गॅरेज म्हणून विकण्याचा अधिकार बिल्डरला नाही; एकतर फ्लॅट विकताना कॉमन एरियाचे  पैसे प्रत्येक फ्लॅट धारकांकडून फ्लॅटच्या कार्पेट क्षेत्रफळाच्या प्रमाणात  बिल्डरने घेतलेलेच असतात, त्यामुळे बिल्डरांचे  आर्थिक नुकसान देखील होत नाही.   त्यामुळे असे ओपन किंवा स्टील्ट पार्किंग बिल्डरला   विकता येत नाही, कारण त्याचा उपयोग हा सामाईक  असतो." कव्हर्ड पार्किंग बिल्डरला विकता  येते. त्याचप्रमाणे इमारत बांधून पूर्ण झाल्यानंतर बिल्डरला  जमीन आणि त्यावरील इमारत या दोन्हींचे खरेदीखत सोसायटीच्या नावाने करून देणे म्हणजेच कन्व्हेयन्स करून देणे बंधनकारक असते. त्यामुळे देखील अशी  ओपन जागा बिल्डरला फ्लॅट धारकाला पार्किंग म्हणून विकता येत नाही. परंतु आपल्याला विकलेली जागा हि जर 'सदनिकेच्या' व्याख्येत बसत असेल तर हा निकाल आपल्याला लागू होणार नाही.  आपण मागणी करूनही सोसायटी सभासदत्व देत नसल्यामुळे  आपल्याला को.ऑप. रजिस्ट्रारकडे दाद मागणे अनिवार्य आहे, जेथे   ह्या सर्व कायदेशीर तरतुदींचा  आणि कागदपत्रांचा उहापोह होऊ शकेल.
ऍड. रोहित एरंडे ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©