जागा वापरासाठी मंजूर नकाशा हाच आधार, आणि, जादा ना वापर शुल्क घेता येणार नाही. ॲड. रोहित एरंडे ©

प्रश्न - मी ठाणे येथील एका रजिस्टर्ड सोसायटीच्या बिल्डींग मधे सहाव्या (शेवटच्या) मजल्यावर राहतो. फ्लॅट च्या एक खोलीला जोडुन बिल्डर ने बाहेरच्या बाजुला खाली आणि वर छज्जे बांधले आहेत जे सोसायटीच्या मंजुर आराखड्यात आहेत. मला त्या छज्जाला गॅलेरीतुन रस्ता काढुन, वर पत्रे ,खाली लाद्या आणि समोर जाळी लावुन गच्ची सारखा उपयोग करता येइल का? तसंच माझ्या फ्लॅट च्या हाॅल ला जोडुन आमच्याच सोसाटीच्या कमर्शियल विंगच्या लिफ्टरुमचं छत येत. त्याजागेला सुद्धा गॅलेरी तुन रस्ता काढुन, वर पत्रा आणि समोर जाळी लावुन गच्ची म्हणुन वापर करता येईल का? या दोन्ही जागांचा कोणालाही अडथळा होणार नाही तसंच सार्वजनिक उपयोगही होणार नाहीये किंवा कोणाचे नुकसानही होणार नाही का धोका निर्माण होईल.

एक वाचक

उत्तर : आपल्या प्रश्नांचे एकत्रित उत्तर "नाही" असेच द्यावे लागेल. आपल्याला सोयीची  वाटलेली प्रत्येक गोष्ट कायद्याला सोयीस्कर असतेच असे नाही. तुम्हाला जेवढी जागा मंजूर नकाशाप्रमाणे विकली आहे तेवढीच  जागा वापरण्याचा  अधिकार तुम्हाला पोहोचतो.  त्यामुळे तुम्ही असे कुठलेही बांधकाम केल्यास ते गैरकायदा ठरेल ह्याची नोंद घ्यावी आणि होणाऱ्या सर्व परिणामांची सर्व जबाबदारी तुमच्यावरच राहील.

प्रश्न - आपल्या  लेखाद्वारे उपयुक्त माहिती मिळत असते, त्याबद्दल आपले खूप आभार.  सोसायटी मध्ये सदनिका त्रयस्थ व्यक्तीला भाड्याने दिली असेल तर सामायिक खर्च च्या व्यतिरिक्त मेंटेनन्स च्या जास्तीत जास्त दहा टक्के ना वापर शुल्क म्हणून अतिरिक्त रक्कम आकारता येते. सोसायटी उपविधी मध्ये कोणता खर्च समान रीतीने आणि कोणता जागेच्या क्षेत्रफळ प्रमाणे आकाराला जातो याचे विवेचन दिलेले आहे. यातील देखभाल दुरुस्ती खर्च ( ०.७५% ) वर सुध्दा ना वापर शुल्क १० % घेण्यात यावा असे काही सभासदांचे म्हणणे आहे तर काही जणांच्या मते या क्षेत्रफळानुसार आकरलेल्या रकमा स्वतंत्रपणे मुदत ठेवी मध्या ठेवायच्या असल्याने  या रकमेवर ना वापर शुल्क आकारत येत नाही असे म्हणणे आहे. तर  क्षेत्रफळानुसार घेत असलेल्या देखभाल व दुरुस्ती फंडावर  ना वापर शुल्क आकारता येते का ?  .

शरद पारगावकर, पेबल्स सोसायटी,भूगाव , पुणे


उत्तर : सोसायट्यांमध्ये देखभाल खर्च किंवा मेंटेनन्स म्हणून जे ओळखले जातात त्या खर्चाला कायद्यामध्ये "सेवा शुल्क " किंवा "सर्व्हिस चार्जेस" म्हणून संबोधले जाते. असा सेवा खर्च हा सर्वांना समान असतो आणि ह्या सेवा शुल्कात कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो हे आदर्श उपविधी क्र. ६६ मध्ये नमूद केले आहे आणि उपविधी ६७ (अ ) मध्ये संस्थेच्या खर्चामध्ये प्रत्येक सदस्याचा हिस्सा  किती असेल हे नमूद केले आहे. उपविधी ६७ (अ ) (६) अन्वये सेवा शुल्काची आकारणी हि सर्व सदस्यांमध्ये समानरीत्या केली पाहिजे आणि असे मा. मुंबई उच्च न्यायालयाचे निर्णय देखील आहेत, आणि ह्या सेवा शुल्काच्या जास्तीत जास्त १०% इतकी रक्कम  ना वापर शुल्क म्हणून घेता येते. परंतु आपण म्हणत असलेले देखभाल दुरुस्ती खर्च हे सदरील सेवा शुल्काच्या वर्गवारी मध्ये बसत नाहीत आणि त्यामुळे त्यावरही १०% इतकी रक्कम  ना वापर शुल्क म्हणून घेणे आणि त्यायोगे जादाचे  पैसे कमावणे हे कायद्याला अभिप्रेत नाही.    देखभाल दुरुस्ती खर्च उपविधी ६७(अ)(३) मध्ये  समाविष्ट असून त्याची आकारणी हि प्रत्येक  सदनिकेच्या बांधकाम खर्चाच्या दर साल किमान ०.७५%  एवढ्या दराने करता येते. त्यामुळे क्षेत्रफळानुसार घेत असलेल्या देखभाल व दुरुस्ती खर्चावर "ना वापर शुल्क"  आकारता येणार नाही. तसेच ज्या सरकारी अधिसूचनेप्रमाणे "ना वापर शुल्क" हे जास्तीत जास्त सेवा शुल्काच्या १०% इतकेच आकारता  येईल असे नमूद केले आहे त्यामध्ये  देखील आपण विचारल्याप्रमाणे  ना वापर शुल्क आकारण्याबाबत उल्लेख आढळून येत नाही.  जर कायदा-कर्त्यांचे उद्दिष्ट असते तर त्यांनी तसे नियमांमध्ये स्पष्टपणे नमूद केले असते.


ऍड. रोहित एरंडे 


Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©