सोसायट्यांपुढील २ प्रश्न : कन्व्हेयन्स डीड न होणे आणि मोकळी जागा वापरण्यावरील बंधने : . ऍड. रोहित एरंडे.

 प्रश्न : ५७६ सदनिका असलेल्या आमच्या सोसायटीमध्ये २००४ पासून लोकं राहिला आलीत आणि २००८ मध्ये सोसायटी रजिस्टर झाली पण आजपर्यंत कन्वेयन्स डीड करण्यात आले  नाही. त्यात सोसायटीतील मोकळ्या जागेत मोठ मंदिर बांधण्यात आले आहे. तसेच पुनर्विकासाच्या नावाखाली रस्त्यालगतची जागा ही भाडेतत्वावर बिल्डर ला कार्यालयासाठी देण्याचे चालले आहे. सदर जागा ही मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला आहे व सोसायटी मध्ये प्रवेश करण्यासाठी एक चारचाकी वाहन जाईल एवढाच रस्ता आहे. सदर जागेखाली ड्रेनेज लाइन, पाण्याची पाइप लाइन तसेच महानगर गॅस ची लाइन आहे. तरीसुद्धा सोसायटी पदाधिकारी व त्यांचे समर्थक यांनी सोसायटीला   उत्पन्न मिळत आहे म्हणून सदर कामाला मंजूरी दिली आहे. तर ह्याबाबत कायदा  काय सांगतो ?

श्री. देवानंद खिलारी 


उत्तर : कन्व्हेयन्स  डीड न होणे आणि मोकळ्या कायदेशीर जागेचा वापर हे आपल्यासारखेच दोन प्रमुख प्रश्न आणि त्याबद्दलचे गैरसमज अनेक सोसायट्यांमध्ये दिसून येतात. कन्व्हेयन्सचा अर्थ एखाद्या जागेमधील मालकी हक्क दुसऱ्याच्या नावे तबदील करणे, म्हणजेच सोप्या शब्दांत  खरेदी खत असे म्हणता येईल. सोसायटीच्या नावाने जमीन आणि त्यावरील इमारतीचा मालकी हक्क तबदील म्हणजेच कन्व्हेयन्स करण्याची जबाबदारी प्रमोटर ह्या नात्याने बिल्डरवरती असते. बिल्डरने स्वतःहून करून दिला तर "कन्व्हेअन्स" आणि नाही करून दिला तर "कायदेशीर यंत्रणे मार्फत केला जातो डीम्ड कन्व्हेअन्स असा सोपा फरक दोघांमध्ये करता येईल. दोघांचे उद्दिष्ट्य एकच. पण  नुसती  सोसायटी रजिस्टर केली म्हणून सोसायटीला जागेमध्ये कुठलाही मालकी हक्क मिळत नाही,  जे आपल्या केसमध्ये दिसून येते.  

बिल्डरने स्वतःहून असे अभिहस्तांतरण करून देण्यास टाळाटाळ केल्याच्या अनेक घटना समोर आल्यामुळे सरकारने मोफा कायद्याच्या कलम  ११ मध्ये  दुरुस्ती करून सोसायट्यांना जिल्हा उपनिबंधकाकडे  अर्ज करून  मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यापूर्वी दिवाणी कोर्टात दावा लावण्याचा पर्याय उपलब्ध होता आणि तो आजही आहे. त्याचप्रमाणे बिल्डरने अपार्टमेंट डिड करून न दिल्यास देखील ह्या तरतुदीचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे आपल्या सोसायटीने देखील २००८ साली नोंदणी झाल्यापासून  १४ वर्षांचा वनवास संपला असे मानून   डीम्ड कन्व्हेअन्स करून घेणे इष्ट आहे. 

मोकळी जागा वापरण्यावरील बंधने :. 

सर्वप्रथम  मोकळी जागा हि मोकळी ठेवणे अपेक्षित असून तिथे कुठल्याही प्रकारचे बांधकाम विनापरवाना करता येत नाही मग मंदिर असो का अजून काही. त्याचप्रमाणे आदर्श उपविधी १६९ प्रमाणे जिन्या  खालील मोकळी जमीन, गच्ची, खुली जमीन, हिरवळ, क्लब हाऊस , सामायिक  हॉल इ. जागा सभासद असो व इतर कोणी, कोणालाही लिव्ह लायसेन्सने किंवा पोटभाडयाने देता येणार नाही. मात्र उपविधी १७० प्रमाणे फक्त सभासदाच्याच  समारंभासाठी  जर विचारणा झाली, तर कॉमन टेरेस किंवा इमारतीची जागा सोसायटीला सर्वसाधारण सभा ठरवेल त्या बंधनासह तात्पुरत्या कारणासाठी वापरयाला देता येते.  मात्र  बहुमताच्या जोरावर कायद्याला धाब्यावर बसविता येत नाही त्यामुळे उत्पन्न मिळत आहे म्हणून  सदर कामाला मंजूरी दिली असली तरी ती बेकायदेशीर आहे आणि त्याबाबत सहकार न्यायालयात दाद मागता येईल. तसेच महानगर पालिका आणि महानगर गॅस ह्यांच्याकडे देखील लेखी तक्रार करा. मात्र आधी (कन्व्हेअन्स) केलेची पाहिजे हे लक्षात घ्या. 

ऍड. रोहित एरंडे. 

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©