ई.व्ही. चार्जिंग पॉईंट -स्वतःचा वापरायचा का सोसायटी सांगेल तो ? - ऍड. रोहित एरंडे. ©

ई.व्ही.  चार्जिंग पॉईंट -स्वतःचा वापरायचा का सोसायटी सांगेल तो  ?

 प्रश्न : आमच्या सोसायटी मध्ये काही लोकांनी इलेक्ट्रिक दुचाकी /चारचाकी घेतल्या आहेत आणि हळू हळू हे प्रमाण वाढत जाणार ह्यात शंका नाही. मात्र आमच्या सोसायटी कमिटीने एका खासगी कंपनीला कॉमन चार्जिंग पॉईंट बसविला आहे आणि आता  एक फतवा काढला आहे कि कोणत्याही सभासदाने स्वतःच्या मीटर मधून चार्जिंग पॉईंट साठी कनेशन घ्यायचे नाही, तर ह्या कॉमन चार्जिंग पॉईंटमधूनच कनेक्शन घ्यावे आणि ह्या कॉमन कनेक्शनचा विजेचा दरही वीज मंडळापेक्षा जास्त आहे. सोसायटीला विचारणा केल्यास त्यांचे म्हणणे आहे कि सगळ्यांनी स्वतःचे कनेक्शन घेतल्यास खूप वायरी होतील आणि ते चांगले दिसणार नाही, तर असा ठराव कमिटीला करता येईल का ?

एक वाचक, पुणे . 

उत्तर : कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी  रुळेपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाच्या अडचणी ह्या येतातच आणि ईलेक्ट्रिक व्हेईकल (ई.व्ही.) ह्याला अपवाद नाही, हे आपल्या प्रश्नावरून दिसून येते.  सर्व सभासदांनी  सोसायटी ठरवेल त्याच एका कंपनीच्या  डिश अँटिनामधून कनेक्शन घ्यावे, हे जसे सांगता येणार नाही तसेच आपल्या केस मध्येही सोसायटीला त्यांनी बसविलेल्या चार्जिंग पॉईंटमधूनच गाड्यांचे चार्जिंग करावे हे सांगता येणार नाही. इ.व्ही.  हा तुलनेने नवीन प्रकार आहे आणि त्याच्या वापरात वाढ होणार हे दिसत आहेच  पॉईंट हे तर त्याचा मुख्य घटक आहे.  ह्या नवीन टेक्नॉलॉजी संदर्भात सोसायटीच्या बाय -लॉज  मध्ये थेट तरतूद आढळून येत नाही.   महाराष्ट्र सरकारने देखील २०२१ मध्ये इलेक्ट्रिक  वाहने धोरण जाहीर करताना अश्या वाहनांच्या वापरात वाढ व्हावी म्हणून विविध उपाययोजना आखून दिल्या आहेत. त्यामध्ये 'नवीन' रहिवासी इमारतीमध्ये २० टक्के पार्किंगच्या जागा इलेक्ट्रिक वाहनांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक असेल आणि त्यातील ३०% जागा हि सामायिक पार्किंग मधील.असावी असे नमूद केले आहे. अर्थात ह्या वाहन धोरणाची अंमलबजावणी किती झाली किंवा कसे हे वेगळा प्रश्न आहे. या  वाहन धोरणाच्या अनुषंगाने सोसायटी बाय -लॉज मध्ये योग्य ते बदल करून इ.व्ही चार्जिंगसाठी योग्यती साधन  सामग्री सभासदांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोसायटीवर टाकावी ह्या करीता ,सध्याच्या प्रथेप्रमाणे,  मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका २०२२ मध्ये दाखल झाली आहे (संदर्भ : अमित ढोलकीया वि. महाराष्ट्र सरकार ) त्यावर निकाल येणे अपॆक्षित आहे. 

त्याचप्रमाणे सोसायटीमध्ये चार्जिंग पॉईंट /स्टेशन बाबत ज्या ज्या  परवानग्या लागतात त्या सोसायटयांनी लगेच द्याव्यात  असा आदेश सहकार उपनिबंधकांनी दिल्याची बातमी मध्यंतरी वाचण्यात आली होती.  सोसायटी  कमिटी असो वा जनरल बॉडी त्यांचे  ठराव, हे कधीही  हे कायद्यापेक्षा मोठे होऊ शकत नाहीत  त्यामुळे असा ठराव  कोणत्या कायदेशीर कारणास्तव  सोसायटीने केला, निविदा मागितल्या होत्या का आणि  ह्याच खासगी कंपनीला काम देण्याचे नेमके कारण काय   ह्याची लेखी विचारणा करावी आणि त्यांच्या उत्तरावरून पुढे काय करायचे हे स्पष्ट होऊ शकेल.  ज्या सभासदांकडे स्वतःचे पार्किंग आहे अथवा कॉमन पार्किंग मध्ये गाडी लावतात, पण स्वतःच्या मीटर मधून चार्जिंग कनेक्शन घेणे शक्य आहे त्यांना स्वतःच्या मीटरमधून चार्जिंग कनेक्शन  घेण्यापासून सोसायटी कसे रोखू शकेल ? आणि खूप वायरी होतील, हे  कारण संयुक्तिक वाटत नाही.  अर्थात असे कनेक्शन जर का कोणी कॉमन मीटरमधून घेत असेल किंवा सुरक्षिततेची काळजी न घेता, कनेक्शन  घेतले गेले असेल तर ते मात्र नक्कीच चुकीचे आहे आणि त्यांच्यावर सोसायटी कारवाई करू शकते कारण  आपल्या वागणुकीमुळे इतरांना त्रास होऊ नये हे नागरिकशास्त्राचे मूलभूत तत्व सोसायटीमध्ये   पाळले जाणे कायद्याला अपेक्षित आहे. असो.  अजूनतरी, सोसायटी सांगेल त्याच  पद्धतीने इ.व्ही. चार्जिंग करावे लागेल असा नियम आढळून आलेला  नाही. अर्थात सोसायटीने ज्या सभासदांकडे इ.व्ही आहे, पण स्वतःचे पार्किंग नाही आणि त्यामुळे  चार्जिंग सुविधा नाही त्यांच्यासाठी कायदेशीर  प्रक्रिया पार पाडून वाजवी  दरात आणि पुरेशी सुविधा   पुरवल्यास त्यास विरोध असण्याचे कारण नाही. भविष्यात  अशा सोयी  कराव्या  लागणार हेही तितकेच खरे आहे.  


ऍड. रोहित एरंडे. ©


Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©