जागा नावावर करायची म्हणजे काय ? - ॲड. रोहित एरंडे ©

 सर, माझी स्वतःची जागा मला माझ्या एकुलत्या एक  मुलाच्या नावावर करायची आहे म्हणून मी सोसायटी चेअरमनला तसा  अर्ज दिला तर त्याने मला कोर्टातून इंडेक्स-२ आणायला सांगितला  आहे. तर मी कोणत्या कोर्टातून आणि कश्या प्रकारे इंडेक्स-२ आणू , ? 

एक वाचक, पुणे. 

ऍड. रोहित एरंडे .©


 तुमचा प्रश्न वाचून कायद्याचे अज्ञान किती खोलवर रुजले आहे ह्याची परत एकदा अनुभूती आली. 

जागा नावावर करणे ह्या बाबतीत खूप गैरसमज दिसून येतात. बहुसंख्य लोकांना असे वाटत असते की, ७/१२ च्या उताऱ्याला किंवा   प्रॉपर्टी कार्डला किंवा टॅक्स पावती /लाईट बिल येथे  नाव लावायचा अर्ज दिला किंवा तुम्हाला वाटते तसे सोसायटीमध्ये अर्ज दिला  कि जागा आपल्या नावावर / मालकीची झाली.   वस्तुस्थिती उलट आहे.    एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क कसा मिळतो, ह्याची थोडक्यात माहिती आधी सांगतो, त्यातून तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. 


एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा कुठल्याही २ किंवा अधिक  व्यक्तींच्या हयातीमध्ये  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच मिळू शकतो. अश्या नोंदणीकृत दस्तांचा इंडेक्स-२ हा मालकी हक्काचा पुरावा म्हणून वापरला जातो. इंडेक्स-२ हा कुठल्याही कोर्टात मिळत नाही किंवा कुठे दुसरीकडे विकतही मिळत नाही.तुमच्या चेअरमन  सारखेच  बऱ्याचदा लोकांना असे  वाटते कि कुठेतरी अर्ज दिला कि इंडेक्स-२  मिळतो, हा समजहि पूर्णपणे चुकीचा आहे.  रजिस्ट्रेशन कायदा १९०८ च्या कलम ५५ अन्वये एखादा दस्त नोंदविला गेला कि त्याचा गोषवारा  सांगणारे कायदेशीर प्रमाणपत्र म्हणून इंडेक्स-२ सब-रजिस्ट्रार ह्यांच्याकडून दिला जातो. 

 त्याचप्रकारे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने  तबदील होऊ शकतो.  .  मृत्यूपत्राप्रमाणे मालकी हक्क हा मात्र मृत्यूपत्र करणारी व्यक्ती म्हणजेच टेस्टेटर मयत झाल्यावरच   प्राप्त होतो आणि मृत्यूपत्र नोंदविल्यावर त्याचा 'इंडेक्स-३' मिळतो. 


७/१२- प्रॉपर्टी कार्ड ह्यांनी मालकी ठरत नाही :

 ७/१२ उताऱ्यांसंदर्भात आणि शहरी भागात प्रॉपर्टी कार्ड बद्दल मा. सर्वोच्च न्यायालायने तसेच मा. मुंबई उच्च न्यायालायने वेळोवेळी हे स्पष्ट केले आहे की अश्या उताऱ्यामधील नोंदी ह्या महसुली  म्हणजेच रेव्हेन्यू रेकॉर्ड मधील असल्यामुळे ह्या नोंदीमुळे कुणाचाही मालकी हक्क हिरावून घेतला जाऊ शकत नाही किंवा कोणालाही मालकी हक्क प्रदान  केला जात नाही. वर नमूद केल्याप्रमाणे दस्त नोंदणी झाल्यानंतर मालकी हक्क तबदील झाल्याची  फक्त नोंद ७/१२ किंवा प्रॉपर्टी कार्डला होते. तसेच  एखादी व्यक्ती मयत झाल्यावर बऱ्याचवेळेला काही कारणास्तव ७/१२ किंवा प्रॉपर्टी कार्डला वारसांच्या नावांची    नोंद करावयाची राहिली म्हणून चिंता करण्याचे काहीही कारण नाही.  कारण वारसांचा  मालकी हक्क  हा आधीच संबंधित वारसा कायद्याने प्रस्थापित झालेला असतो आणि त्याप्रमाणे वारस-नोंद होणे हा केळवळ एक उपचार राहिलेला असतो.

त्याच प्रमाणे मुनिसिपाल्टी टॅक्स पावती किंवा वीज-बिल ह्यांनी तर अजिबातच  मालकी हक्क ठरत नाही.हे फारतर रहिवास दाखला म्हणून वापरले जाऊ शकतात.  त्यामुळे ह्या रेकॉर्डवरून  जुन्या मालकाचे नाव बदलले गेले नाही तरी चिंता करू नये. त्यासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज भरून नवीन मालकांचे नाव संबंधित रेकॉर्डला बदलता येते. एक लक्षात घ्या कि असे उतारे किंवा अशी बिले ह्यांवर कुठेही "मालक" असा शब्दही लिहिलेला नसतो. 

त्यामुळे तुमच्या केसमध्ये तुम्हाला जर का तुमच्या हयातीमध्ये मुलाच्या नावावर जागा करायची असेल  तर तुम्ही त्याच्या नावे तुम्ही नोंदणीकृत बक्षिस पत्र करू शकता किंवा त्याला खरेदिखताने जागा विकत देऊ शकता आणि अश्या  दस्तांचा  जो इंडेक्स-२ तयार होईल तो तुम्ही सोसायटीमध्ये देऊ शकता. मात्र  जर का तुम्हाला स्टँम्प ड्युटी वाचवायची असेल, तर नोंदणीकृत मृत्यूपत्र करणे हाही एक पर्याय तुमच्या समोर आहे, मात्र तुमच्या मृत्यूनंतरच मृत्युपत्राची अंमलबजावणी होईल. 

ऍड. रोहित एरंडे ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©