फ्लॅट कुलुपबंद आहे , मेंटेनन्स द्यायचा का ? मेंटेनन्स आणि ना वापर शुल्क यांची होणारी गल्लत - ॲड. रोहित एरंडे.©
सभासद जागा वापरत नसेल म्हणजेच कुलूप बंद ठेवली असेल तरीही त्याने मेंटेनन्स देणे क्रमप्राप्त आहे, पण 'अश्या' केस मध्ये ना वापर शुल्क सोसायटीला घेता येणार नाही.
ऍड. रोहित एरंडे.©
सर, माझा एक फ्लॅट आहे, तो मी बंद ठेवला आहे, वापरत नाही, कारण मी दुसरीकडे राहते. तो फ्लॅट मी भाड्यानेही दिलेला नाही, तरीही सोसायटी माझ्याकडून मेंटेनन्स आणि ना वापर शुल्क मागत आहे ? तर ह्या परिस्थितीमध्ये मी ते देण्यास बांधील आहे का ?
एक वाचक, पुणे.
आपल्या सारखे प्रश्न अनेक वेळा उपस्थित होतात. कारण "ना-वापर" शुल्क म्हणजेच non occupancy charges ह्या नावावरून लोकांची किंबहुना सोसायटी कमिटीची अशी धारणा होते, कि फ्लॅट बंद ठेवला असेल म्हणजेच मालक त्यात राहत नसला, फ्लॅट कुलूप बंद असला म्हणजेच तो वापरात नाही म्हणून "ना-वापर" शुल्क घ्यावे, तर सभासदांची धारणा असते कि मी फ्लॅट बंद ठेवला आहे, सोसायटीच्या कुठल्याही सोयी वापरात नाही त्यामुळे मी कुठलेच पैसे देण्यास बांधील नाही. वरील दोन्ही धारणा का चुकीच्या आहेत ते आपण थोडक्यात बघू.
ना-वापर शुल्क कधी घेतात ?
एखादा सभासद स्वतः जागा वापरात नसेल आणि त्याने ती जागा तिऱ्हाईत व्यक्तीस भाड्याने दिली असेल, तर सभासदास ना-वापर शुल्क म्हणजेच Non Occupancy Charges द्यावे लागते. पण तुम्ही म्हणता तसे सभासदाने नुसती जागा कुलूप बंद ठेवली असेल म्हणजेच तर त्या सभासदाकडून ना वापर शुल्क घेता येणार नाही. ह्याबद्दलचा कायदा येऊन दोन दशके उलटली आहेत. अश्या ह्या ना-वापर शुल्काची आकारणी मनमानी पद्धतीने होऊ लागली म्हणून महाराष्ट्र सरकारने सहकार कायद्याच्या कलम ७९-अ अन्वये ०१/०८/२००१ अध्यादेश काढून ना-वापर शुल्क हे देखभाल खर्चाच्या (maintenance charges ) जास्तीत जास्त १० टक्केच आकारता येईल असे स्पष्ट केले. हा अध्यादेश घटनात्मक दृष्ट्या वैध असल्याचा आणि सभासदाने त्याचे घर भाड्याने दिल्यास सोसायटीचे काहीच नुकसान होत नाही आणि स्वतःचे घर भाड्याने देऊन उत्पन्न घेण्याचा अधिकार घरमालकाला आहे हा सरकारचा युक्तिवाद मान्य करून मा. मुंबई उच्च न्यायालायच्या २ सदस्यीय खंडपीठाने सोसायटीविरुद्ध निकाल माँब्ला सोसायटी विरुद्ध महाराष्ट्र सरकार - २००७ (४) Mh .L .J ५९५ या याचिकेच्या निमित्ताने दिला. सोसायटी बहुमताच्या जोरावर कायद्याच्या विरुद्ध ठराव कधीच पास करू शकत नाही, हे कायमच लक्षात ठेवावे.
ना-वापर शुल्काचे अपवाद :
काही वेळा सभासदाने स्वतः जागा न वापरता दुसऱ्याला जागा वापरायला दिली असेल तरीही ना-वापर शुल्क घेता येत नाही. सभासदाचे कौटुंबिक सदस्य, विवाहित मुलगी, नातवंडे हे जागा वापरत असतील तर ना-वापर शुल्क आकारता येत नाही. मात्र सून, जावई, मेव्हणा-मेव्हणी यांना जर जागा वापरायला दिली असेल तरी ते कौटूंबिक सदस्यांच्या व्याख्येत बसत नाहीत असे मा. उच्च न्यायालयाने नमूद केले आहे, सबब अश्या व्यक्ती जर जागा वापरात असतील तर त्यांच्याकडून ना वापर शुल्क घेता येईल.
मेंटेनन्स द्यावाच लागतो.
सभासद स्वतः जागा वापरत असेल किंवा नसेल , त्याने जागा भाड्याने दिली असेल किंवा नसेल, मासिक देखभाल खर्च (मेंटेनन्स) हा द्यावाच लागतो. जागा वापरत नाही हा पण एक विवादास्पद मुद्दा आहे कारण कोण किती वेळ / दिवस जागा वापरत आहे हे बघणे सोसायटीचे काम नाही. जागा वापरयाची कि नाही हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे , पण म्हणून मेंटेनन्स द्यायचा नाही हे कायद्याला अभिप्रेत नाही कारण बऱ्याचदा असे होते कि लोकं इन्व्हेस्टमेंट म्हणून फ्लॅट घेतात आणि तिथे राहायला कधीच येत नाहीत आणि जर सगळ्याच लोकांनी असे केले तर सोसायटीचा खर्च कसा भागणार ?
अजून एक गल्लत लोकांची होताना दिसते. काही सोसायट्यांमध्ये ना-वापर शुल्काबरोबरच जागा भाडयाने दिली म्हणून जास्तीचा देखभाल खर्च आणि काही ठिकाणी तर भाड्याच्या ठराविक टक्के इतके शुल्क सभासदांकडून आकारला जातो, जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे हे लक्षात घ्यावे.
ना-वापर शुल्क तरतूद अपार्टमेन्टला लागू नाही :
महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट मध्ये मध्ये 'ना वापर शुल्काची' कुठलीही तरतूद आढळून येत नाही आणि त्याबाहेर जाण्याचा अधिकार अपार्टमेंट असोसिएशनला नाही. एकतर अपार्टमेंट हे अपार्टमेंट होल्डरच्या पूर्ण मालकीचे असते, त्यामुळे वैध कारणासाठी जागा कोणाला भाड्याने द्यायची हा सर्वस्वी त्याचा अधिकार असतो. ह्याबाबतीत १-२ वर्षांपूर्वी पुणे येथील सहकार उपनिबंधकांनी एका अपार्टमेंट असोसिएशनला चांगलाच दणका दिला होता
त्यामुळे तुम्ही जागा वापरत नसाल म्हणजेच कुलूप बंद ठेवली असेल तरीही तुम्हाला मेंटेनन्स देणे क्रमप्राप्त आहे, पण तुमच्याकडून ना वापर शुल्क सोसायटीला घेता येणार नाही.
धन्यवाद.🙏
ऍड. रोहित एरंडे ©
Comments
Post a Comment