७/१२ किंवा प्रॉपर्टी कार्डने मालकी ठरत नाही, ॲड. रोहित एरंडे.©

 ७/१२ किंवा प्रॉपर्टी कार्डने मालकी ठरत नाही, 

ॲड. रोहित एरंडे.©

आमच्या आजीच्या २ प्रॉपर्टी होत्या. आजीला आमचे वडील धरून अजून २ मुले आणि २ मुली होत्या. आजीने कोणतेही कायदेशीर मृत्युपत्र केलेले नव्हते. मात्र एका कागदावर ज्यावर आजीची सही नव्हती आणि २ साक्षीदारांची देखील सही नव्हती अश्या एका कागदाला मृत्युपत्र बनवून  वडिलांच्या दोन्ही भावांनी प्रॉपर्टी कार्डवर त्यांची नावे लावून घेतल्याचे आमच्या नुकतेच लक्षात आले आणि आता प्रॉपर्टी कार्डाने ते एकटेच मालक झाले सांगत आहेत आणि आमच्या ताब्यातील जागा खाली करून मागत आहेत  तर आता काय करता येईल ?


एक वाचक, पुणे. 

आपल्या प्रश्नामध्ये अनेक महत्वाचे पैलू आहेत, ज्याचा सामना आपल्यापैकी अनेक लोकांना करावा लागतो ते म्हणजे मृत्यूपत्राची वैधता, प्रॉपर्टी कार्डाने मालकी का ठरत नाही  आणि जागेच्या ताब्याचे महत्व. सर्व प्रथम मृत्युपत्राची वैधता बघूयात. मृत्यूपत्र कायदेशीर ठरण्यासाठी मृत्यूपत्रावर दोन सज्ञान साक्षीदारांनी सही करणे  गरजेचे आहे. मृत्यूपत्र करणाऱ्याने आणि दोन साक्षीदारांनी एकमेकांसमोर मृत्यूपत्रावर सही करणे गरजेचे आहे.२ साक्षीदारांनी एकाचवेळी सही केली पाहिजे असे काही नाही. तुम्ही कथन केल्याप्रमाणे त्या कथित कागदावर जर कोणाचीच सही नसेल तर त्याला मृत्यूपत्र म्हणता येणार नाही. पुढचा प्रश्न आहे तो प्रॉपर्टी कार्डवर नाव लागण्याचा. एकतर ७/१२ किंवा प्रॉपर्टी कार्ड ह्यांनी कोणाची मालकी ठरत नाही.  बहुसंख्य लोकांना असे वाटत असते की, ७/१२ च्या उताऱ्याला किंवा   प्रॉपर्टी कार्डला किंवा लाईट बिलावर  नाव लावायचा अर्ज दिला कि झाले किंवा   तहसीलदार ऑफिस मध्ये नुसता अर्ज करून मिळकतीवर आपले नाव कमी करता येते किंवा आपल्याबरोबर आपल्या बायका - पोरांचे नाव  मालक म्हणून लावता येते. मात्र वस्तुस्थिती उलटी आहे. 

योगायोगाने आपल्या केसला सुसंगत असा निकाल अलीकडेच मा. सर्वोच्च न्यायालयाने जितेंद्र सिंग वि. मध्य प्रदेश सरकार, (स्पे.लिव्ह पिटिशन  क्र. १३१४६/२०२१) या याचिकेच्या निमिताने दिला आहे. याही केसमध्ये आजीच्या कथीत   मृत्यूपत्राच्या आधारे याचिकाकर्त्याने त्याचे नाव ७/१२ उताऱ्याला  लावावे म्हणून  तहसिलदारांकडे अर्ज दिला होता, ज्याला इतर वारसांनी हरकत घेतली होती. मात्र तरीही  त्याच्या नावाच्या  नोंदीचा फेरफार तहसिलदार करतात आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचते. ह्या पूर्वीच्या  अनेक निकालांचा आधार  घेऊन न्या. एम.आर.  शाह आणि न्या. अनिरुद्ध बोस ह्यांच्या खंडपीठाने असा निकाल दिला कि  "(७/१२ - फेरफार /प्रॉपर्टी कार्ड   सारख्या ) महसुली  / रेव्हेन्यू  उताऱ्यामधील नोंदी ह्या महसुली उपयोगाकरिता  असल्यामुळे ह्या नोंदीमुळे कुणाचाही मालकी हक्क हिरावून घेतला जाऊ शकत नाही किंवा कोणालाही मालकी हक्क प्रदान  केला जात नाही . जर का वारसाहक्काच्या आधारावर फेरफार नोंद करून मागितली असेल तर मालकी हक्क ठरविण्याचा अधिकार हा केवळ दिवाणी कोर्टाला  असतो, महसुली अधिकाऱ्यांना नाही, त्यामुळे ज्यांना मालकी हक्क मागायचा असेल त्यांनी सक्षम  दिवाणी कोर्टात जाऊन दाद मागावी".

पुढचा महत्वाचा विषय आहे जागेच्या  ताब्याचा . जागेच्या ताबा असणे म्हणजेच  १० पैकी ९ मार्क मिळाल्यासारखे असणे  कायद्यात एक वचन आहे. इतके ताब्याला महत्व आहे. कोर्टातील बहुतांशी दावे हे ताबा मिळविण्यासाठीकिंवा ताबा वाचविण्यासाठी करतात. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही तुमचा जागेचा प्रत्यक्ष  ताबा तुमचे काका हिसकावून घेणार नाहीत ह्यासाठो सर्वतोपरी काळजी घ्यावी. तसेच  दिवाणी कोर्टामध्ये दावा लावून जागेचे वाटप (पार्टीशन) करून मागावे लागेल आणि त्याच अनुषंगाने सदरील मृत्युपत्र हे वैध नाही असा ठराव करून मागावा लागेल आणि ताबा हिरावून  घेऊ नये अशी मनाई तुमच्या काकांविरुध्द  मागावी लागेल. ह्याचबरोबर तुमचीही   नावे  प्रॉपर्टी कार्डवर येण्यासाठी भूमी अभिलेख अधिकाऱ्यांकडे वेगळा अर्ज करावा लागेल.  

ऍड. रोहित एरंडे ©


 

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©