न विकलेल्या फ्लॅटचा मेंटेनन्स देण्यास बिल्डर बांधील. -नुसते रजिस्ट्रेशन होऊन सोसायटी मालक होत नाही. - ऍड. रोहित एरंडे ©

न विकलेल्या फ्लॅटचा मेंटेनन्स देण्याची जबाबदारी बिल्डरवर ..

आमची सोसायटी नुकतीच अस्तित्वात आली आहे. सोसायटी नोंदणी फॉर्मवर बिल्डरने सह्या केल्या होत्या. पण  आमच्या सोसायटीमध्ये काही  फ्लॅट अजुनहि  विकले गेलेले नाहीत, तर अश्या न विकलेल्या फ्लॅटचा  मेन्टेनन्स बिल्डर कडून घेता येतो का ?. 

एक वाचक, पुणे. 

उत्तर - आपल्यासारखे प्रश्न अनेक सोसायट्यांमध्ये दिसून येतात. ह्यासाठी आपल्याला रेरा कायदा आणि मोफा कायदा दोघांच्या तरतुदी बघाव्या लागतील. रेरा कायदा आला असला तरी  मोफा कायदा पूर्णपणे  रद्द झालेला नाही हेही लक्षात घ्यावे.   मोफा कायदा कलम (१०)१ अन्वये सोसायटी /अपार्टमेंट / कंपनी स्थापनेसाठी कमीत कमी आवश्यक संख्या झाल्यावर सोसायटी किंवा अपार्टमेंट स्थापन करणे गरजेचे आहे आणि त्याचप्रमाणे जे फ्लॅट्स विकले गेलेले नाहीत (अन-सोल्ड ) अश्या न विकलेल्या  फ्लॅटचे सभासदत्व बिल्डरला घेणे क्रमप्राप्त आहे. रेरा कायदा कलम ११ (४)(e) अन्वये बहुसंख्य फ्लॅट धारकांनी बुकिंग केल्यावर ३ महिन्यांच्या आत सोसायटी किंवा अपार्टमेंट असोसिएशन किंवा कंपनी फॉर्म (रजिस्टर)  करण्याची जबाबदारी प्रमोटर वर आहे. तर कलम १७ प्रमाणे भोगवटा प्रमाणपत्र (occupancy certificate) मिळाल्यानंर ३ महिन्यांमध्ये कन्व्हेयन्स करून देण्याची जबाबदारीहि  प्रमोटर वरती आहे. आदर्श उपविधी क्र. १७ - खुलासा (note ) क्र. २ अन्वये ज्या मूळ सभासदांनी सोसायटी नोंदणी  करताना प्रमोटर म्हणून सह्या केल्या असतील ते सभासद म्हणून ग्राह्य धरले जातात, ज्यामध्ये आपल्या बिल्डरचाही समावेश होईल. त्यामुळे अश्या न विकल्या गेलेल्या फ्लॅटचा मेंटेनन्स देण्याची जबाबदारी बिल्डरवरती आहे. 


--------------------------

नुसती सोसायटी रजिस्टर झाली म्हणजे सोसायटी जागेची मालक होत नाही.

१५ वर्षांपूर्वी आमची सोसायटी रजिस्टर झाली आहे, तरीही आम्हाला कन्व्हेयन्स करून घेणे गरजेचे आहे का ?   काही लोक म्हणतात आवश्यकता नाही.

एक वाचक, नाशिक

उत्तर : कव्हेयन्स होणे म्हणजेच जमीन आणि त्यावरील इमारत ह्याचा मालकी हक्क तबदील होणे गरजेचे असते आणि हे विहित  मुदतीमध्ये करून देण्याची  जबाबदारी बिल्डरवरती आहे. नुसती सोसायटी रजिस्टर केली म्हणजे सोसायटी जमीन आणि बिल्डिंगची मालक होत नाही.  कन्व्हेयन्सविना नुसती रजिस्टर सोसायटी म्हणजे एखादा क्लबच म्हणता येईल, जिथे मेम्बरकडून सुविधांचे  महिनेमहा  पैसे घेतले जातात.   आता बिल्डरवर कायदेशीर कारवाई करता येईल, पण त्यापेक्षा डीम्ड कव्हेयन्स  आधी करून घेणे तुमच्यासाठी  फायदेशीर आणि कायदेशीर राहील.  ह्या बाबतीत चार लोक काय म्हणतात ह्या पेक्षा तज्ञ लोक काय म्हणतात ते श्रेयस्कर ठरेल.

ऍड. रोहित एरंडे ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©