भाडेकरूपणाचे हक्क मृत्युपत्राने देता येत नाहीत. - ऍड. रोहित एरंडे. ©

भाडेकरूपणाचे हक्क मृत्युपत्राने देता येत नाहीत. 

मुंबईमधील एका चाळीत आमच्या २ खोल्या भाड्याने आहेत. आमचे वडील मूळ भाडेकरू होते ते काही वर्षांपूर्वी मयत झाले. वडिलांना  आमची आई आणि मी, माझा भाऊ आणि बहीण  असे वारस आहोत. आता ती जागा रिडेव्हल्पमेंटला जाणार आहे आणि आम्हाला नवीन जागा मालकी हक्काने मिळणार आहे. परंतु वडिलांनी त्यांच्या मृत्यूपत्राने भाडेकरूपणाचे हक्क आमच्या मोठ्या भावाला दिले आहेत  असे आम्हाला नुकतेच समजले आणि त्यामुळे तो एकटाच आता त्या नवीन फ्लॅटवर हक्क सांगत आहे. तर आम्ही २ भावंडे आणि आईचा  भाड्याच्या जागेवरचा हक्क  आहे, का गेला ?

एक वाचक, मुंबई. 


मृत्युपत्र ह्या विषयाबद्दल आपल्याकडे खूप गैरसमज प्रचलित आहेत आणि भाडेकरूपणाचे हक्क मृत्युपत्राने देता येतात हा असाच एक गैरसमज आहे. तत्पूर्वी भाडेकरू मयत झाल्यावर भाड्याचे हक्क कोणाला प्राप्त  होतात ह्याची थोडक्यात माहिती घेऊ. आपली जागा भाड्याची असल्याने त्याला भाडे नियंत्रण (रेंट कन्ट्रोल ऍक्ट)  कायदयाच्या तरतुदी लागू होतात.  पूर्वीचा बॉम्बे रेंट ऍक्ट आणि आत्ताचा  महाराष्ट्र रेंट ऍक्ट प्रमाणे एखादा भाडेकरू मयत झाल्यावर त्याच्या  कुटुंबातील कुठल्या सदस्याला  भाड्याचे हक्क-अधिकार प्राप्त होतात ते तपशीलवार नमूद केले आहे आणि ह्यावर आणि कौटुंबिक सदस्य म्हणजे कोण यावरही मा. सर्वोच्च तसेच मा. मुंबई उच्च न्यायालयाचे अनेक निकाल  आहेत. त्याचा गोषवारा असा कि राहण्याची जागा असेल तर मूळ भाडेकरू सोबत कुटुंबातील जो सदस्य त्या भाडेकरूच्या मृत्यूसमयी त्याच्या सोबत राहत असेल असा सदस्य किंवा जर भाड्याची जागा व्यवसाय -धंद्याची असेल तर जो सदस्य  अश्या व्यवसाय धंद्यात भाडेकरू सोबत असेल असा सदस्य भाडेकरु  म्हणून धरला जाईल. मात्र जर असा कोणीही सदस्य नसेल, तर वारसांनी आपसात ठरविल्याप्रमाणे किंवा सक्षम कोर्ट ठरविल त्या वारसाला भाडेकरूपणाचे हक्क प्राप्त होतात. आपल्या प्रश्नामध्ये आपल्यापैकी वडिलांबरोबर कोण राहत होते हे कळायला मार्ग नाही.   मात्र प्रॅक्टिस मध्ये बहुतेकवेळा जेव्हा मूळ भाडेकरू मयत होतो तेव्हा त्याच्या सर्व वारसांना दाव्यामध्ये सामील पक्षकार केले जाते जेणेकरून पुढे जाऊन कोणी हक्क सांगू नये. मात्र भाडेकरू कोण असा वाद जर वारसांमध्ये निर्माण झाला किंवा घरमालकाने वारस मानण्यास नकार दिला तर लघुवाद न्यायालयात भाडेकरू कोण हे ठरविण्यासाठी दावा दाखल करता येतो. 

आता मुख्य  प्रश्न मृत्युपत्राचा . तर  हा प्रश्न मा. सर्वोच्च न्यायालयाने   काही वर्षांआधीच "वसंत प्रताप पंडित विरुद्ध डॉ. आनंद त्र्यंबक  सबनीस (1994) 3 SCC 481"  ह्या गाजलेल्या केसच्या निमित्ताने निकाली काढला असून ह्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे कि भाडेकरूपणाचे हक्क हे त्या भाडेकरूपुरतेच वैयत्तिक असतात आणि त्यामुळे ते मृत्युपत्राने तबदील केले जाऊ शकत नाहीत आणि असे करणे हे कायद्याच्या तरतुदींविरुद्ध आणि घरमालकावर  अन्याय करण्यासारखे होईल  आणि समजा जर कायदेमंडळाची तशी इच्छा असती तर त्यांनी तशी स्पष्ट तरतुदच  कायद्यात केली असती. मृत्यूपत्राने आपल्या स्वतःच्या मालकी हक्काची मिळकत देता येते आणि  भाड्याची जागा हि काही भाडेकरूंच्या मालकीची नसते त्यामुळे आपल्या वडिलांनी केलेले मृत्युपत्र या  भाड्याच्या जागेपुरते तरी वैध ठरणार  नाही. त्यामुळे  तुम्हाला सर्वांना एकत्रपणे बसून नवीन जागा कोणाच्या नावर ठेवायची आणि त्याबदल्यात कोणी कोणाला किती पैसे द्यायचे, का सगळ्यांनी हक्क सोडून पैसे वाटून घ्यायचे  किंवा कसे, याबाबत  मार्ग काढणे श्रेयस्कर राहील नाहीतर कोर्टाची पायरी आहेच. तुटे वाद, संवाद तो हितकारी हे सर्मथ वचन कायम लक्षात ठेवावे. 


ऍड. रोहित एरंडे. 

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©