म्हाडा बिल्डिंगचा पुनर्विकास : ऍड. रोहित एरंडे

 म्हाडा बिल्डिंगचा पुनर्विकास 

लोअर परळ, सेनापती बापट मार्गावर फिनिक्स मॉलच्या जवळ आमच्या तपोवन 'अ', 'ब' आणि 'क' या म्हाडाच्या इमारती आहेत. तर बाजूलाच भगिरथ ही देखील म्हाडाची इमारत आहे. या इमारतीतील सध्याच्या खोल्यांचा आकार १८० चौ. फूट आहे. आमच्या परिसरात गेल्या सात-आठ वर्षांपासून पुनर्विकासाचे वारे वाहत आहेत. साहजिकच एक नामांकित बांधकाम व्यावसायिकाने आणि काही संधिसाधू लोकप्रतिनिधींनी आमच्या इमारतींच्या जागेवर डोळा ठेवून ही संधी कॅश करण्यासाठी तयारी चालवली आहे. या अंतर्गत या विकासकाने भगिरथला एक प्रस्ताव दिला आहे. यात ५८५ चौ. फूट कार्पेट एरिया आणि १८ हजार रुपये दरमहा घरभाडे तसेच कॉर्पस फंडही देण्याचे कबुल केले आहे. मात्र यात नेमका आकडा सांगितलेला नाही. अशी घसघशीत ऑफर मिळाल्याने बहुतांश रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा विकासक याच रांगेतील खिमजी नागजी चाळ (साधारण नऊ चाळी) , बारा चाळ, तपोवन आणि भगिरथ या इमारतींचा एकत्रित विकास करणार आहे. मात्र, आमच्या इमारती या म्हाडाच्या अखत्यारित असून, त्यांच्या जमिनीची मालकीही म्हाडाकडे आहे. माझ्या माहितीनुसार म्हाडाच्या मालकीची जमीन कोणताही विकासक विकत घेऊ शकत नाही.अशा परिस्थितीत हा विकासक आमच्या इमारतींचा पुनर्विकास करू शकतो का? किंवा आम्ही रहिवाशांनी पुनर्विकासासाठी पुढे जावे का? कृपया मार्गदर्शन करावे. 

- - महेंद्र शिरावळे, रहिवासी, तपोवन ब


आपल्या प्रश्नामध्ये अनेक  वेगवेगळ्या गोष्टी अंतर्भूत असल्यामुळे त्यास तपशीलवार उत्तर देणे जागेअभावी येथे शक्य होणार नाही. तरीही त्यातील महत्वाच्या गोष्टींचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करू. तुमच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या अर्थातच आता जुन्या झाल्या असतील आणि नवीन सोयी-सुविधांचा अभाव असलेल्या असतील आणि त्यामुळे पुनर्विकास करणे गरजेचे आहे असे दिसते. एक गोष्ट लक्षात घ्यावी कि कुठलाही बिल्डर हा जेव्हा बिल्डिंग पुनर्विकासामध्ये जुन्या सभासदांना मोफत आणि जास्त क्षेत्रफळाची नवीन घरे बांधून देतो, त्या बरोबर अजून काही आर्थिक मोबदला जसे कि घरभाडे, बेटरमेंट चार्जेस, कॉर्पस फंड  इ. देतो  तेव्हा त्या बदल्यात त्याला काहीतरी नफा होईल म्हणूनच तो करीत असतो, तो काही धर्मादाय म्हणून काही करेल  अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे आणि कुठलाही बांधकाम व्यावसायिक हा तुमच्यासारख्या मोठ्या जागेच्या शोधात असणारच. तुम्ही सभासद म्हणून काय करू शकता तर पुनर्विकासाची प्रक्रिया हि पारदर्शक पद्धतीने पार पडली जाते का नाही यासाठी आणि  जे काही करार-मदार करणार आहेत त्यासाठी तज्ञ वकीलांची,   तज्ञ आर्किटेक्ट इ. लोकांची मदत घेणे क्रमप्राप्त आहे. आता तुमच्या प्रश्नाप्रमाणे जो कोणी बिल्डर आहे तो एवढ्या इमारतींचा एकत्रितपणे  पुनर्विकास करणार असेल तर माझ्या माहितीप्रमाणे हे समूह-पुनर्विकास (cluster redevelopment ) मधेय प्रकरण मोडते आणि त्यासाठी बांधकाम नियमावलीमध्ये (एसआयआय इ. साठी )  विशेष तरतुदी सरकारने केल्या आहेत. तसेच आपल्या इमारती  खालील जमीन  म्हाडाची असली तरी  पुनर्विकास करण्यासाठी  अशी जमीन बिल्डरने विकत घेण्याची गरज नाही मात्र त्यासाठी म्हाडाची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे आहे आणि  काही विशिष्ट अटी शर्तींवर अशी परवानगी म्हाडा देते असे समजते. त्यासाठी आपण म्हाडाकडे चौकशी करू शकता किंवा माहिती अधिकारातही माहिती मागवू शकता. भौगोलिक विभागांप्रमाणे या अटी शर्ती बदलू शकतात.   तसेच जमीन जरी म्हाडाची असली तरी तुमची को.ऑप. सोसायटी गठीत झाली असेल असे मी गृहीत धरतो आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारची पुनर्विकास नियमावली -२०१९ चे पालन करणे तुम्हाला  गरजेचे राहील. तसेच जर का म्हाडाने तुम्हाला जमिनीचा  लीज करार करून दिला  असेल तर त्याच्या देखील अटी शर्तींचे पालन करणे सर्वांवर बंधनकारक राहील. जर तुम्हा रहिवाशांना स्वतः पुनर्विकास करायची इच्छा असेल तर एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी लागणार प्रचंड  खर्च, तांत्रिक कौशल्य आणि इतर अनेक गोष्टी पार पाडणे खरंच शक्य आहे का याचाही सारासार विचार करावा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पुढे जावे जेणेकरून नवीन वास्तुत लवकर प्रवेश करता येईल. 


ऍड. रोहित एरंडे   

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©