सामायिक जागेचा वापर खासगी कारणाकरिता अवैध. : ऍड. रोहित एरंडे. ©

  सामायिक जागेचा वापर खासगी कारणाकरिता अवैध. 


आमच्या सोसायटीमध्ये पार्किंग समोर काही जागा सोडून लगेच सीमाभिंत आहे  एका सभासदाने त्याच्या पार्किंग समोरच्या  मोकळ्या जागेत चहाची टपरी सुरु केली आहे आणि सीमाभिंतीवरून बाहेरच्या लोकांना तो चहा, कॉफी असे पदार्थ देतो तर त्याचे किचेन त्यानी त्याच्या पार्किंगमध्येच  थाटले आहे. हे काढण्यासाठी त्याला विचारणा केल्यास तो अजिबात बधत नाही. कमिटी मध्ये सुध्दा कारवाई करावी कि नाही यात एकवाक्यता नाही.  तर अश्या सभासदविरुद्ध काय करता येईल ?




सोसायटी कमिटी सदस्य  , पुणे. 


 एक लक्षात घ्यावे कि सोसायटी असो का अपार्टमेंट, सभासदाला   जसे  काही हक्क प्राप्त होतात त्याचबरोबर त्याला काही कर्तव्ये देखील पार पाडायची असतात आणि दोन्ही ठिकाणी सभासदाला सामायिक (common ) जागेचा वापर खासगी कारणाकरिता करता येत नाही. 


 जेवढी जागा करारनाम्याने मिळाली आहे तेवढीच जागा वापरण्याचा अधिकार सभासदाला असतो. मोकळी जागा दिसली कि ती "आपलीशी" करणे , मोकळ्या पॅसेजला ग्रील लावणे असे प्रकार सर्रास बघायला मिळतात आणि कायद्याच्या भाषेत ह्याला अतिक्रमण (एन्क्रोचमेंट) असे म्हणता येईल. या संदर्भात सोसायटी आदर्श उपविधी १६९ (अ) मध्ये स्पष्ट तरतुदी केल्याचे आढळून येईल. ह्या तरतुदीप्रमाणे जिना, पायऱ्या, लँडिंग एरिया, सामायिक पार्किंग स्पेस, कॉरिडॉर आणि अश्या प्रकारच्या इतर सर्व मोकळ्या /सामायिक जागा ह्या सर्व सभासदांच्या वापराकरिता असतात आणि त्यामुळे कोणत्याही एका सभासदाला त्यावर हक्क सांगता येणार नाही आणि कोणताही सभासद हा अश्या जागा स्वतःच्या वापराकरिता बळकावू शकत नाही. ह्या सर्व जागांचा उपयोग हा त्या जागा ज्या कारणाकरिता दिल्या आहेत त्याच करता झाला पाहिजे असेही पुढे नमूद केले आहे. ज्या सभासदाने अश्या प्रकारचे अतिक्रमण केले असेल ते त्यांनी त्वरित काढून घेणे गरजेचे आहे आणि अश्या सभासदाने जितका काळ अश्या जागांवर अतिक्रमण केले असेल तेवढ्या कालावधी करता मासिक देखभाल खर्चाच्या पाचपट इतकी रक्कम देणे बंधनकारक राहील. त्याचप्रमाणे पार्किंगचा वापर हा फक्त पार्किंगसाठीच होणे क्रमप्राप्त आहे. या सभासदविरुद्ध महानगरपालिकेमध्ये देखील लेखी तक्रार करता येईल. अपार्टमेंट बाबतीत डिड ऑफ डिक्लरेशन मध्ये सामायिक जागा कोणत्या याचा उल्लेख केलेला असतो. 


त्याचप्रमाणे कुठल्याही सभासदाला सोसायटीच्या आणि महानगर पालिकेच्या परवानगीशिवाय मंजूर नकाशाच्या बाहेर जाऊन कुठल्याही प्रकारचे बांधकाम, रचनात्मक (स्ट्रक्चरल ) बदल करता येत नाहीत,हेही या निमित्ताने लक्षात ठेवावे. "आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये" हे नागरिक शास्त्राचे मूलभूत तत्व   उपविधी ४८(अ) मध्ये अंगिकारले असून   कुठल्याही सभासदाला आपले वर्तन किंवा कृत्य हे इतर सभासदांना उपद्रवकारक आणि त्रासदायक ठरेल असे होणार नाही ह्याची काळजी घेणे बंधनकारक आहे आणि अश्या वर्तनाविरुद्ध कमिटीला स्वतःहून किंवा तक्रार अर्ज आल्यास कारवाई करण्याचे अधिकार आहेत. असे वर्तन हे उपविधी ४९ अन्वये सभासदत्व रद्द होण्याचे कारण ठरू शकते, हेही लक्षात ठेवावे. त्यामुळे  अश्या सभासदाविरुध्द कडक कायदेशीर कारवाई करता येईल,. तो सभासद्  बधत नाही हे काही कारण असू शकत नाही. कारण कायदा सर्वांपेक्षा मोठा आहे. कमिटीचे काम हे "थॅंकलेस-जॉब" असले  तरी तुम्ही जर काही कारवाई केली केली नाही, ते तुमच्या कर्तव्यात कसूर केल्यासारखे होईल.  "केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे । पाहिजे ।। या समर्थ  वचनाप्रमाणे कायदा काही आपोआप कारवाई करणार नाही, तक्रार करण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे. 


ऍड. रोहित एरंडे. ©

Comments

  1. That was a very good article. I really loved the way you explained the articles. Apart from this, I need your expertise in judging my article, as you are an experienced lawyer. you can also see the articles written by me and give me a review on that Section 406 IPC in Marathi

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©