दुष्टचक्रात गुरफटत चाललेले 'डॉक्टर-पेशंट' चाललेले नाते ॲड. रोहित एरंडे ©

  दुष्टचक्रात गुरफटत चाललेले 'डॉक्टर-पेशंट' चाललेले नाते  

ॲड. रोहित एरंडे ©

पुण्यातील प्रसिध्द दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधील झालेल्या प्रकरणानंतर जागेवर आणि  समाजमाध्यमांवर प्रतिक्रियांचा खच पडला आणि अनेकांनी आपली पोळी भरून घेण्याचा प्रयत्न केला. सध्या तर ब्रेकिंग न्यूज आणि मिडिया ट्रायलच्या जमान्यात पुढची ब्रेकिंग न्यूज येईपर्यंत दोन चार दिवस विषय तापवत ठेवला जातो. पुढे त्या गोष्टींमधील सत्य चौकशीअंती  बाहेर आले कि नाही याची कोणीच दखल घेत नाही. याही केसमध्ये  यथावकाश चौकशी समिती, ग्राहक मंच येथे साक्षी पुरावे, कायदा यांना अनुसरून तथ्य पुढे येईलच आणि दोषींवर कायद्याप्रमाणे कडक कारवाई व्हायलाच पाहिजे. मात्र या सर्व प्रकरणामुळे आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती सक्षम पाहिजे हेही अधोरेखित झाले. आजही आपल्याकडे   सुमारे  ३८% टक्के लोकांकडेच   आरोग्य विम्याचे कवच आहे अशी आकडेवारी सांगते. परवडतील अश्या दरात वैद्यकीय उपचार मिळणे हा  नागरिकांचा मूलभूत हक्क आहे आणि यासाठी सरकारी रुग्णालये तेवढ्या तोडीची बनविण्याची जबाबदारी हि सरकारवर आहे आणि एवढी सक्षम सरकारी रुग्णालये नसल्याने लोकांना खासगी  हॉस्पिटल्स कडे जाण्याशिवाय पर्याय नाही. 

या प्रकरणांमधून ज्यांनी ज्यांनी खासगी हॉस्पिटल बाबत आगपाखड केली, त्यातले किती जण वेळ आल्यावर सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेतील ? 

  गेल्या काही वर्षांपासून डॉक्टर-हॉस्पिटल आणि  रुग्ण हे नाते दुष्टचक्रात अडकलेले दिसून येते. यातील वादाचे प्रमुख कारण हे  हॉस्पिटल   बिलावरून झालेले दिसून येतात. तातडीचे  वैद्यकीय उपचार हे , "हि पोलीस केस आहे", "पैसे भरले नाहीत" या कारणांस्तव  थांबविता येणार नाहीत असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निकाल आहेत, याची माहिती नागरिकांनी आणि हॉस्पिटल्स नि करून घ्यावी. खासगी हॉस्पिटल्स मध्ये जे बील होते त्यामध्ये डॉक्टरांचा हिस्सा   तुलनेने कमी असतो, परंतु डॉक्टरच  लुटतात  असा समज  सर्वत्र पसरला आहे. या प्रकरणावरून दोन्ही बाजूंचा वेध घेण्याचा हा प्रयत्न 

डॉक्टर देव नसेल तर दानवही नाही. 

एका गोष्टीत दुमत नसावे की इतर कुठल्याही प्रोफेशन पेक्षा डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप म्हणून ओळखले जाते आणि इथे भक्तांची गल्लत होते. डॉक्टर जर का देव असेल, तर त्याची विटंबना (हल्ला )करू नका....आणि...डॉक्टर जर का देव नसेल तर, त्याच्या मर्यादा ओळखा.परिस्थती खरंच गंभीर झाली आहे कि "सेव्ह द सेव्हिअर" असे म्हणायची वेळ आली आहे. कारण कालच्या प्रकरणात नामसाधर्म्यामुळे भलत्याच डॉक्टरच्या   हॉस्पिटलची  तोडफोड झाली आणि याचा त्रास तेथील अन्य रुग्णांनाही झाला.  माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी देखील एका समारंभात याबद्दल चिंता व्यक्त करता नमूद केले होते डॉक्टरतांवरील हल्ले न थांबल्यास डॉक्टर औषधाला देखील मिळणार नाही. 

वैद्यक शास्त्र हे एक अपूर्ण शास्त्र

वैद्यक शास्त्र हे एक अपूर्ण शास्त्र म्हणून ओळखले जाते.   अजब गुंतागुंतीचे यंत्र समजल्या जाणाऱ्या आपल्या शरीराची पूर्ण ओळख अजूनही झालेली नाही, हे अनेक डॉक्टर देखील मान्य करतात. 'व्यक्ती तितक्‍या प्रकृती’ असल्याने उपचारांचा परिणामही वेगवेगळा ठरतो. एखाद्या आजारावर उपचार करण्याच्या वेगवेगळ्या; पण मान्यताप्राप्त व वर्षानुवर्षे वापरलेल्या पद्धती असतात. प्रत्येक उपचार पद्धतीला त्याचे फायदे-तोटे असतात, त्यामुळे संबंधित तज्ज्ञ डॉक्‍टरांनी त्यांच्या ज्ञानाचा व कौशल्याचा पुरेपूर उपयोग करूनदेखील जर दुर्दैवाने उपचारास यश आले नाही तर त्याचा दोष डॉक्‍टरांना देता येणार नाही, तसेच प्रत्येक मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच झाला असे गृहीत धरणे अत्यंत चुकीचे आहे असे सर्वोच्च न्यायालयाने तसेच राष्ट्रीय ग्राहक आयोगाने  अनेक निकालांमध्ये स्पष्ट केले आहे. कोणत्याही डॉक्टरला आपला पेशंट मरावा असे वाटत नाही. त्यामुळे ह्या "अपूर्णतेची"कल्पना आपल्या सगळ्यांना असणे आवश्यक आहे.

डॉक्टरांना   कायदयाचा धाक .. 

 वैद्यकीय निष्काळजीपणाच्या खटल्यांत आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने संयत निर्णय दिलेले आहेत. योग्य तेथे कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाईही रुग्णाला दिलेली आहे; डॉक्टरांचे  परवाने  रद्द केले  आहेत ; तर त्याचबरोबर फौजदारी कारवाईचे निकषदेखील घालून दिलेले आहेत. उजव्या हाता ऐवजी डाव्या हाताचे ऑपेरेशन केले, एखाद्या शाखेचे ज्ञान नसतानादेखील त्या शाखेसंदर्भात उपचार केले, ऑपरेशन नंतर पोटात कापसाचा गोळा विसरणे अशा प्रकरणांत डॉक्‍टरांना न्यायालयाने जबर दंड अथवा शिक्षा देखील केलेल्या आहेत. कोर्ट-केसेसच्या या  भितीमुळे  तर सध्या डॉक्टर कोणताही धोका पत्करत नाहीत आणि स्वतः निदान करणे शक्य असले तरी आधी टेस्ट करण्यास  सांगतात आणि टेस्ट रिपोर्ट नॉर्मल आले तर उगाच टेस्ट करायला सांगितली असेही म्हणणारे पेशंट असतात आणि टेस्ट करायला नाही सांगितली तर डॉक्टर निष्काळजी होता असेही म्हणतात .  एकीकडे  होणारे हल्ले आणि दुसरीकडे कोर्ट केसेसची भीती असे इतर कुठल्याही प्रोफेशनलच्या बाबतीत आढळून येत नसेल.   या  मुळे आता हॉस्पटिल मध्ये बाऊन्सर्स ठेवणे सुरु झाले आहे. 

बेफिकिर आपण, दोष डॉक्टरांना ?

वैद्यकीय निष्काळजीपणाच्या केसेसमध्ये बरेचदा   "औषध न घे असोन वेथा | पथ्य न करी सर्वथा | न मिळे आलिया पदार्था | तो येक मूर्ख" असे रामदासस्वामींनी दासबोधात सांगून ठेवलं आहे ते दिसून येते. कायदा असो वा वैद्कयीय उपचार, प्रत्येक केस हि वेगळी असते त्यामुळे  दुसऱ्याला लागू झालेला निकाल किंवा औषध हे आपल्याला चालेलच असे नसते. 

एकीकडे बेफाम पणे गाडी चालवायची आणि अपघाताला निमंत्रण द्यायचे,   किंवा डॉक्टरांनी दारू पिऊ नका असे सांगितले तरी खूप प्यायची आणि मग किडन्या - लिव्हर निकामी झाली कि त्या परत उत्तम व्हाव्यात म्हणून डॉक्टरांकडे जायचे किंवा रिपोर्ट मध्ये शुगर कमी दिसावी म्हणून फक्त 2 दिवस अजिबातच गोड खायचे नाही आणि मग शुगर कमी होत नाही म्हणून ओरडायचे, इंटरनेट वरून माहिती घेऊन स्वतःचे स्वतःच उपचार करायचे आणि ह्या सर्व प्रकारात गुण आला नाही, आजार बरा झाला नाही म्हणून दोष डॉक्टरांवर थापायचा आणि शेवटी डॉक्टरांनाच मारायचे आणि बिल कमी करून घ्यायचे, असे काहीसे प्रकार घडत असल्याचे दिसून येतात. .  

 आपल्या उपचाराचे पेपर्स, रिपोर्ट्स इ. मागण्याचा पेशंटला हक्क असतोच त्याचप्रमाणे एखाद्या हॉस्पिटल मधून उपचार परवडत नसतील किंवा हॉस्पिटल वरती विश्वास नसेल, तर डिस्चार्ज घेण्याचा हक्क हा रुग्णाला आहे. मात्र अश्यावेळी पहिले हॉस्पिटल "वैद्कयिक सल्ल्याचा विरुध्द डिस्चार्ज घेतला" असे लिहून घेते आणि पुढे काही  गुंतागुंत झाल्यास त्याची जबाबदारी त्या हॉस्पिटलवर राहत नाही. 

एकंदरीतच सध्या समाजामधील सहनशीलता संपत चालली आहे.सोशल  मिडियावरती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या  नावाखाली जे काही कॉमेंट्स लिहिले जातात त्यालातर काही सीमाच नाही.. खचाखच गर्दीत गाडीचा थोडासा जरी धक्का लागला तरी लोक प्रचंड हमरीतुमरीवर आल्याचे दिसून येते.  "कमीत कमी कायदे आणि कमीत कमी हॉस्पिटल्स" हे प्रगत समाजाचे लक्षण गाठता येईल अशी अशा करू या. 

ऍड . रोहित एरंडे.
पुणे©


 


Comments

  1. रोहित सर आपण खूप छान पद्धतीने या विषयी मांडलं आहे...

    ReplyDelete
    Replies
    1. हा लेख आपल्या नावासह शेअर करता येईल का?

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©