एकत्र केलेल्या फ्लॅटसाठी किती मेंटेनन्स घ्यावा ? मेंटेनन्स आणि फ्लॅटचे कायदेशीर एकत्रीकरण . ऍड. रोहित एरंडे ©

एकत्र केलेल्या फ्लॅटसाठी किती मेंटेनन्स घ्यावा ?

फ्लॅटचे कायदेशीर एकत्रीकरण झाले आहे का ? .

नमस्कार. माझा प्रश्न असा आहे कि जर  हौसिंग सोसायटी मध्ये एकाच कुटुंबाने दोन फ्लॅट घेऊन एकत्र करून त्यात एकच कुटुंब रहात असले  तर सोसायटीने मेंटनन्स एकाच फ्लॅटचा घ्यावा कि दोनचा ?

एक वाचक. 

सोसायटी आणि सभासद ह्यांच्यामधील वादांचे मूळ कारण हे बहुतेक वेळा आर्थिक विषयाशी संबंधित असते. आपण विचारलेल्या प्रश्नासारखी परिस्थिती अनेक ठिकाणी दिसून येते आणि ह्यामध्ये  मेंटेनन्स आणि कायदेशीर एकत्रीकरण ह्या दोन पैलूंचा  अंतर्भाव होतो. सोसायटीमध्ये जरी देखभाल खर्च सर्वांना समान पद्धतीने आकारला जायला पाहिजे तरी देखभाल खर्चात कशाचा समावेश होतो आणि  कुठले खर्च कुठले एरिया प्रमाणे इ. आकारले जातात  ह्याची तरतूद आदर्श उपविधी क्र.  ६५ ते ६८ मध्ये दिलेली आहे. अनेक वेळा लोकांचा सोयीकरिता  शेजारील फ्लॅट घेण्याचा किंवा त्याच इमारतीमधील दुसरा फ्लॅट विकत घेण्याकडे कल  दिसून येतो. एकाच इमारतीमध्ये एकाच व्यक्तीचे  दोन वेगवेगळे फ्लॅट असले तरी प्रत्येक    फ्लॅटचा स्वतंत्र मेंटेनन्स देणे क्रमप्राप्त आहे. परंतु जेव्हा दोन स्वतंत्र फ्लॅट एकत्र केले जातात, तेव्हा परिस्थिती वेगळी असते . सर्वप्रथम अश्या एकत्रीकरणाला सोसायटीची आणि जर कन्व्हेयन्स झाला नसेल तर बिल्डरच्या लेखी पूर्व परवानगीची गरज असते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकत्रीकरणाला महानगरपालिकेकडून रीतसर लेखी पूर्व परवानगी मिळणे गरजेचे आहे आणि त्यासाठी नकाशात  फेरबदल करून घेण्यासाठी वास्तुविशारदाची मदत घ्यावी लागेल. दोन फ्लॅट एकत्र करणे काय किंवा  आपल्या फ्लॅट मध्ये  काही फेरबदल (renovation )  करायचे असेल, ते करताना  महानगरपालिकेने मंजूर केलेल्या  बांधकाम  नकाशाच्या विपरीत बांधकाम / फेरफार करताच  येत नाही.  जो सभासद असे २ फ्लॅटचे  एकत्रीकरण करतो , त्याच्यासाठी ते जरी खूप सोयीचे असले तरी  जेव्हा दोन  फ्लॅट स्वतंत्र  खरेदीखताने विकत घेतले जातात तेव्हा सोसायटीच्या दृष्टीने ते दोन वेगळे युनिट्स असतात, सभासदत्व वेगळे असते. पण कोणतीही अशी परवानगी न घेता एकत्रीकरण केले  असेल, तरी तांत्रिक  दृष्ट्या ते दोन वेगळे युनिट असतात म्हणून प्रत्येक फ्लॅटचा स्वतंत्र मेंटेनन्स देणे गरजेचे आहे, भले त्यात तुम्ही म्हणता तसे एकच कुटुंब राहत असेल. 

ह्याला अपवाद म्हणजे जेव्हा वर नमूद केल्याप्रमाणे, सर्व पूर्वपरवानग्या घेऊन , रीतसर जेव्हा दोन फ्लॅटचे एकत्रीकरण केले जाते तेव्हा त्यांचे एकच  युनिट समजले जाते आणि अश्यावेळी दोघांचे सभासदत्व देखील एक होईल आणि अश्या कायदेशीर पद्धतीने एकत्रीकरण केलेल्या फ्लॅटसाठी मेंटेनन्स हा एक फ्लॅट म्हणूनच आकारावा   लागेल.  


अजून एक महत्वाची बाब म्हणजे मेंटेंनन्सचा मुद्दा बाजूला ठेवला तरी  असे  बेकायदेशीर फेरबदल केल्यास अश्या सभासदाविरुद्ध कायदेशिर कारवाई होऊ शकते. काही वर्षांपूर्वी मुंबई मध्ये तळमजल्यावरील एका दुकानदाराने  जास्त जागा वापरायला मिळेल  म्हणून केलेल्या बेकायदेशीर सुशोभीकरणाच्या  नादात  बिल्डिंगच्या आधाराचे कॉलमच काढून टाकले आणि ज्यामुळे संपूर्ण बिल्डिंगच कोसळल्याची दुर्दैवी  घटना आपल्याला आठवत असेल. त्यामुळे असे कुठलेही फेरबदल करण्याआधी कायदेशीर आणि तांत्रिक सल्ला जरूर घ्यावा. 


ऍड. रोहित एरंडे ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©