पुनर्विकास कराराच्या आधीच जागा सोडण्याची सक्ती करता येते का ? खिडक्यांचे ग्रील, लोखंडी दरवाजे ह्यावर हक्क बिल्डरचा का सभासदांचा ? - ॲड. रोहित एरंडे ©

 पुनर्विकास कराराच्या आधीच जागा सोडण्याची सक्ती करता येते का ? खिडक्यांचे ग्रील, लोखंडी दरवाजे ह्यावर  हक्क बिल्डरचा का सभासदांचा ? कराराच्या अटी का महत्वाच्या ?


आम्ही सर्व सत्तर वर्षांच्या पुढचे ज्येष्ठ नागरिक असून   सुमारे ५० वर्षांपासून इमारातीमध्ये राहतोय. काही जणांची मुले-बाळेही दुसरीकडे राहतात. आता आमच्या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरु झाले आहे. मात्र   कोणताही करार बिल्डर बरोबर झालेला नाही. असे असतानाही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले म्हणून काही सभासदांनी  फ्लॅटचा  ताबा बिल्डरला  दिला आहे आणि बाकीच्यांना नोव्हेंबर अखेर पर्यंत जागा खाली करण्यास सांगितले आहे . आम्ही आमच्या सेफ्टीसाठी लोखंडी  दरवाजे आणि खिडक्यांना ग्रील  बसविले आहेत,  असे आमचे म्हणणे आहे तर सोसायटी पदाधिकारी आमच्यावर दबाव आणत आहेत  कि हे दरवाजे आणि ग्रील हे बिल्डरची मालमत्ता आहे, तुम्ही ती काढून घेऊन जाऊ शकत नाहीत. कृपया ह्याबद्दल मार्गदर्शन करावे. 


 त्रस्त सभासद, मुंबई उपनगर. 


सोसायटी आणि सभासद ह्यांमध्ये कुठले वाद कधी निर्माण होतील हे सांगता येणार नाही, हे तुमच्या प्रश्नावरून मात्र  दिसून येते.  आश्चर्यकारक गोष्ट हि कि कुठलाही करार झाला नसताना काही सभासदांनी जागेचा ताबा बिडलरला दिलाच कसा ? पुनर्विकास प्रक्रियेमध्ये  होणारे  वाद , सभासदांना विश्वासात न घेणे ,मनमानीपणे बिल्डर-ठेकेदार यांच्या नियुक्त्या करणे, मॅनेजिंग कमिटीच्या कामकाजात पारदर्शकपणा नसणे इ. स्वरूपाच्या तक्रारी आल्यामुळे महाराष्ट्र  सरकारने सहकार कायद्याच्या कलम ७९(अ ) अन्वये सर्व प्रथम दि. ३ जानेवारी २००९ रोजी सोसायट्यांच्या पुनर्विकासासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आणि कालपरत्वे ह्या  मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करणे सरकारला गरजेचे वाटले  म्हणून दि. ४ जुलै २०१९ रोजी सरकारने सुधारित मार्गदर्शक तत्वे / नियमावली जाहीर  केली. ह्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सोसायटीची पुनर्विकास प्रक्रिया पार पाडावी लागते. 


आपल्या सोसायटीमध्ये अशी प्रक्रिया पार पाडली आहे असे  सकृत दर्शनी वाटत नाही.  जो पर्यंत लेखी करारनामा होत नाही आणि प्लॅन पास होत नाही तो पर्यंत जागेचा ताबा सोडणे योग्य नाही आणि बहुतांशी ठिकाणी अशीच प्रक्रिया अनुसरली जाते.  कारण समजा उद्या कुठल्याही  कारणास्तव  बिल्डरला स्कीम करण्यास जमलेच  नाही तर ज्यांनी ताबा सोडलाय त्यांची स्थिती 'ना घरका ना घाटका' अशी होईल. ताब्याला १० पैकी ९ मार्क, असे कायद्यामध्ये वचन आहे कारण ताबाच नसेल तर मालकी हक्काच्या १ मार्काचा काय उपयोगाच ? कोर्टातील बहुतांशी वाद हे ताबा मिळण्यासाठी किंवा वाचविण्यासाठी असतात, एवढे महत्व ताब्याला आहे. 


आता प्रश्न लोखंडी  दरवाजे आणि  ग्रील ह्यांचा. व्यवहारामध्ये जेव्हा बिल्डर सोबत करार होतो, तेव्हा बिल्डिंग पाडताना किंवा  पाडल्यावर जो काही लाकूडफाटा, स्टील इ. उरते  त्यावर बिल्डरचा अधिकार असतो आणि तसे करारामध्ये नमूद केलेले असते. करारातील  अटी -शर्ती सर्वांवर बंधनकारक असतात. तसेच सोसायटी पदाधिकाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागते हे कायम लक्षात घ्यावे. त्यामुळे  आपल्या केसमध्ये नोंदणीकृत करारच झाला नसल्यामुळे त्याआधीच फ्लॅटचा  ताबा  देण्याची   सक्ती पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही. तसेच करारनामा झाला नसल्यामुळे,  'लोखंडी  दरवाजे आणि  ग्रील काढायचे नाहीत, अशी आदेशवजा सूचना  देण्याचा अधिकार देखील कायद्याने   सोसायटी पदाधिकाऱ्यांना  नाही.  ह्या कशालाच पदाधिकाऱ्यांनी दाद न दिल्यास तुम्हाला सक्षम कोर्टात दाद मागावी लागेल.  शेवटी, तुमचे वय  तसेच मुले-बाळेही दुसरीकडे असतात  ह्या गोष्टी  लक्षात घेता   आदरपूर्वक असेही नमूद करावेसे वाटते कि असे लोखंडी ग्रील -दरवाजे  समजा तुम्ही काढले तरी त्याचे पुढे काय करायचे किंवा विल्हेवाट कशी लावायची  ह्याचेही नीट नियोजन करणे गरजेचे आहे इष्ट . 

ऍड . रोहित एरंडे ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©