पतीच्या मृत्यूनंतर त्याची मिळकत कशी विभागली जाईल ? ऍड. रोहित एरंडे.©

 पतीच्या मृत्यूनंतर त्याची मिळकत कशी विभागली जाईल ?


ऍड. रोहित एरंडे.©


आमच्या   बिल्डिंगचे आता पुनर्विकासाचे ठरत आहे.  त्यामध्ये माझ्या आणि माझ्या पतीच्या  नावे एक फ्लॅट आहे. माझ्या पतीचे मागच्या वर्षी आकस्मिक निधन झाले. त्यांनी कोणतेही मृत्यूपत्र केले नव्हते.  मूळ ऍग्रिमेंट मध्ये पहिले नाव माझ्या पतीचे आणि दुसरे माझे आहे. त्यामुळे आता त्यांचा हिस्सा बायको म्हणून मला एकट्यालाच मिळेल,  का आमच्या दोन्ही मुलांना त्यात काही हिस्सा मिळेल आणि हेच नवीन फ्लॅटला हि लागू होईल का  ?


एक वाचक, पुणे 


आपल्यासारखे प्रश्न बऱ्याच जणांना पडतात. अनेक लोकांना असे वाटत असते कि वैवाहिक साथीदाराच्या मृत्यूनंतर उर्वरित जोडीदाराच आपोआप एकटा १००% मालक बनतो. तसेच अनेक गैरसमज असा आहे कि पहिले नाव ज्याचे असते त्याचा हिस्सा किंवा अधिकार हा दुसरे नाव असलेल्यापेक्षा जास्त असतो आणि पहिले नाव असलेली व्यक्ती मयत झाली कि आपोआप सर्व हक्क दुसरे नाव असलेल्या व्यक्तीलाच मिळतो. 


एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा व्यक्तींच्या हयातीमध्ये  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील केला जाऊ शकतो.    तर  एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने (टेस्टमेंटरी सक्सेशन) किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने (इंटेस्टेट सक्सेशन )  तबदील होऊ शकतो. आपल्या केसमध्ये तुमचा  आणि तुमच्या पतींचा समान अविभक्त हिस्सा होता, कारण करारनाम्यामध्ये कोणाचे नाव कुठल्या क्रमांकावर  आहे याने हिस्सेवारी आणि हक्क अधिकार ठरत नाहीत. तुमचे पती मृत्युपत्र न करता मयत झाल्यामुळे हिंदू  वारसा कायद्याच्या कलम  ८ अन्वये त्यांचा हिस्सा  सर्व प्रथम क्लास-१ हेअर्स (वारस) यांच्यामध्ये विभागला जाईल.  क्लास-१ हेअर्स मध्ये  प्रामुख्याने  मयत पुरुषाची विधवा पत्नी, मुलगा -मुलगी (मुले) ,आई , मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे), मुलाची विधवा पत्नी (सून)  इ. चा  समावेश होतो, आणि या सर्व  वारसांना  समान पद्धतीने मिळेल आणि  जर का क्लास-१ वारसांपैकी  कोणीही नसेल, तर मग क्लास-२ वारसांकडे  ज्यामध्ये प्रामुख्याने वडील, मुलाच्या किंवा मुलीच्या  मुलीचा मुलगा किंवा मुलगी (पतवंडे), भाऊ -बहीण, चुलते इ.  यांचा  समावेश होतो. मात्र हिंदू स्त्री मृत्युपत्र न करता मयत झाल्यास तिच्या  मिळकतीची विभागणी वेगळ्या पद्धतीने होते. असो. 


 तुमचे केसमध्ये  पतीचा ५०% अविभक्त  हिस्सा हा तुम्ही, आणि तुमची दोन्ही मुले यांच्यामध्ये समानरित्या म्हणजेच प्रत्येकी १/३ असा विभागला जाईल. अजून एक खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे  तुमच्या सासूबाई हयात आहेत किंवा कसे याबद्दल तुम्ही नमूद केलेले नाही  यात तुमचा दोष नाही कारण बऱ्याचदा हिंदू पुरुषाच्या क्लास-१ हेअर्स मध्ये  आईचाही समावेश होतो (वडिलांचा नाही) हे अनेकांना माहितीच  नसते. त्यामुळे  जर का तुमच्या   सासूबाई हयात असतील तर तुमच्या  पतीच्या हिश्श्याचे ४ समान भाग होतील आणि जर का त्या हयात नसतील वरील प्रमाणे प्रत्येकी १/३ हिस्सा मिळेल.   त्यामुळे तुमचा स्वतःचा ५०% हिस्सा + पतीच्या हिस्श्यामधील  १/३ हिस्सा असा तुमचा एकूण हिस्सा झाला आहे  आणि उर्वरित हिस्सा तुमच्या दोन्ही मुलांच्या वाटेला  समानरीत्या आला   आहे.   जर रिडेव्हलपमेंटपूर्वी तुमच्या  मुलांनी त्यांच्या हिश्याचे हक्कसोडपत्र तुमच्या लाभात लिहून दिले तर ते आत्ता  कमी खर्चात होईल आणि नंतर नवीन मिळणारा फ्लॅट आणि त्याचे इतर लाभ हे तुम्हाला एकट्यालाच मिळतील. अर्थात हा निर्णय सर्वानी नीट बोलून घ्यावा आणि समंजसपणा दाखविल्यास पुढचे वाद टळतील. अन्यथा तुम्ही तिघे  सह-हिस्सेदार झाल्यामुळे  नवीन फ्लॅट आणि त्याचे लाभ हे तिघांच्याही नावे होतील. 

तुमच्या प्रश्नामुळे परत  एकदा मृत्यूपत्राचे महत्व देखील अप्रत्यक्षपणे अधोरेखित झाले आहे.   मृत्यूपत्र केले असेल तर वारसा कायद्याला बगल देता येते, हे लक्षात घ्यावे.     मृत्युपत्राला स्टँम्प ड्युटी लागत नाही त्यामुळे हक्कसोडपत्र जमले नाही   तरी तुम्ही कमीतकमी आता तुमच्या हिश्शयापुरते आणि तुमच्या इतर स्थावर-जंगम मिळकतीसाठी तरी मृत्युपत्र करून ठेवा.   


ऍड. रोहित एरंडे.©



Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©