पुनर्विवाह व जोडीदाराचे आणि सावत्र मुलांचे मिळकतीमधील हक्क : ॲड. रोहित एरंडे ©

 पुनर्विवाह व  जोडीदाराचे आणि सावत्र मुलांचे मिळकतीमधील हक्क 

एखाद्या महिलेला  घटस्फोटात मिळालेली संपत्ती तिच्या पहिल्या लग्नापासून झालेल्या सज्ञान मुलांना मिळावी याकरीता तिने  तिला मृत्युपत्र बनवावे का ?  दुसऱ्या नवऱ्याच्या आधीच्या लग्नापासून झालेल्या सज्ञान मुलांना अश्या मिळकती मध्ये  काय हक्क असेल ? 

 एक घटस्फोटित महिला,  पुणे 

  आयुष्यात "Broken    Marriage  or  Divorce" यातील एक पर्याय निवडायची वेळ येऊ शकते. पूर्वी  दूरवर कोणाच्या तरी बाबतीत घडणारा डिव्होर्स हा त्याचे "टॅबूपण" सोडून आपल्या दारापर्यंत कधी येऊन ठेपला हे बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे कळलेच नाही   असो. पण  त्यामुळे उद्भवणारे आपल्यासारखे   नवीन प्रश्नही आता हळूहळू वर यायला लागले आहेत आणि त्यातच मुले असतील तर अजून वेगळे प्रश्न निर्माण होतात, त्याची थोडक्यात माहिती घेऊ.   


हिंदू वारसा कायदा कलम १४ अन्वये   महिलांना एखादी मिळकत वारसाने, वाटपाने , पोटगीसाठी किंवा पोटगीच्या फरकापोटी,  मृत्यूपत्र किंवा बक्षीसपत्राने किंवा खरेदीने, स्त्रीधनापोटी इ. प्रकारे  आणि  कोणाकडूनही    मिळाल्यास ती महिला अश्या मिळकतींची संपुर्ण मालक होते.    याला  अपवाद म्हणजे ज्या  मिळकतींमध्ये फक्त तहहयात राहण्याचा हक्क दिला असेल त्या सोडून आणि त्यामुळे    आता तुमच्या केसमध्येही  तुम्हाला जी  मिळकत मिळाली आहे ती तुमची स्वतःची असल्याने  तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे या मिळकतीचा  उपभोग घेऊ शकता, तुमच्या हयातीत ती तबदील (ट्रान्सफर)  करू शकता किंवा सगळ्यात सोपे आणि तुलनेने कमी  खर्चाचा दस्त म्हणजे तुमचे मृत्युपत्र करून ठेवू शकता आणि त्यायोगे तुमच्या  इच्छेप्रमाणे कोणालाही ती मिळकत तुमचे मृत्युपश्चात  देऊ शकता. घटस्फोट झाल्यामुळे तुमच्या एकटीच्या मालकीच्या मिळकतीमध्ये  पहिल्या नवऱ्याला काहीच हक्क मिळणार नाही. "मृत्यू निश्चित असला तरी त्याची वेळ सर्वात अनिश्चित असते" या एका वाक्यात  मृत्युपत्र कधी बनवावे याचे उत्तर मिळेल. थोडक्यात "sooner the  better ".   जर काही वर्षांनी परिस्थिती बदलली, नातेसंबंधात बदल झाले  तर तुम्ही परत मृत्युपत्र करू शकता आणि सर्वात शेवटचेच मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते. 

सावत्र मुले आणि मिळकतीमधील हक्क :

आपण   ज्याला बोली भाषेमध्ये "सावत्र" म्हणतो त्याचा  उल्लेख  हिंदू वारसा  कायद्यामध्ये आढळून येत नाही. आपल्याकडे "सावत्र" या शब्दाला एक नकारात्मक छटा  आहे,  पण सब घोडे बारा टक्के हा न्याय इथेही लागू नाही आणि  सध्याच्या काळात  अशी नवीन कौटुंबिक समीकरणे दिसायला लागली आहेत.   घटस्फोट हा नवरा बायको या नात्याचा होतो, पण मुलांचे  आई-वडील तुम्ही कायमच राहता.    जेव्हा दुसऱ्या  जोडीदाराला आधीच्या  लग्नापासून झालेली  संतती असेल, अश्या सावत्र मुलांना सावत्र आई- वडिलांच्या मिळकतीमध्ये कोणताही वारसा हक्क मिळत नाही.  केवळ दुसरे लग्न केले म्हणून तुम्ही त्यांचे सावत्र मुलांचे आपोआप कायदेशीर  आई - वडील होत नाही, त्यासाठी त्यांना  दत्तक घेणे गरजेचे असते आणि कायदेशीरपणे दत्तक घेतलेली संतती ही नैसर्गिक संततीच समजली जाते.    मात्र दत्तक कोण   आणि कोणाला घेऊ शकते याच्या  तरतुदी हिंदू अडॉप्शन  आणि मेंटेनन्स कायद्यात आहेत ज्यायोगे     वयाने १५ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना कायद्याप्रमाणे दत्तक    घेता येत   नाही हे लक्षात घ्यावे (अपवाद म्हणजे एखाद्या समाजात १५ वर्षांपेक्षा मोठ्या वयाची मुले दत्तक घेण्याची मान्यताप्राप्त चालीरिती  - Custom असेल तर). 

पण  समजा तुम्ही मृत्युपत्र न करता मयत झालात तर तुमची मिळकत ही तुम्हाला  पहिल्या लग्नापासून झालेली मुले   आणि तुमचा दुसरा नवरा यांच्यामध्ये   समानरित्या विभागली  जाईल.   मात्र तुमचा  दुसरा नवरा जेव्हा मयत होईल तेव्हा  त्याचा हा अविभक्त हिस्सा हा त्याच्या नैसर्गिक मुलांना म्हणजेच तुमच्या  सावत्र मुलांनाच मिळेल., तुमच्या   मुलांना नाही. हे  सर्व बघता   तज्ञ वकीलांकडून वेळीच मृत्यूपत्र बनवून घेऊन ते रजिस्टर करून ठेवणे कधीही श्रेयस्कर राहील. 


ॲड. रोहित एरंडे ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©