रिडेव्हलपमेंट : नवीन फ्लॅटवर मुलांचे नाव कसे लावावे ? ॲड. रोहित एरंडे ©
रिडेव्हलपमेंट : नवीन फ्लॅटवर मुलांचे नाव कसे लावावे ?
ॲड. रोहित एरंडे ©
अखेर अनेक वाद-विवादानंतर आमची सोसायटी आता रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. आमच्या सारख्या बऱ्याचश्या ज्येष्ठ सभासदांना नवीन फ्लॅटवर मुला / मुलीचे नाव घालायचे आहे. यासाठी डेव्हलपमेंट ऍग्रिमेंटमध्ये आमच्या ऐवजी मुलांचे नाव घातले तर चालेल का ? का अजून काही करणे गरजेचे आहे ?
एक ज्येष्ठ नागरीक, पुणे
'कुठलीही गोष्ट घडण्यास वेळ यावी लागते' असे म्हणतात ते रिडेव्हलपमेंटबाबत तंतोतंत लागू होते. कुठली अडचण दत्त म्हणून उभी राहील हे काही सांगता येत नाही. असो. तुमच्या सारख्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या उमेदीच्या काळात कष्टाने घेतलेल्या फ्लॅटचे आता चीज होईल असे म्हणण्यास हरकत नाही. मात्र अश्या नवीन , मोठ्या क्षेत्रफळाचा आणि आधुनिक सोयी सुविधांनी मिळणार फ्लॅटमध्ये आपल्या मुला -मुलींचे किंवा आपल्या जोडीदाराचे नाव त्यात घालायचे असते , पण नक्की काय करायचे हे अनेकांना लक्षात येत नाही. सबब याची थोडक्यात माहिती घेऊ. अर्थात प्रत्येक केसच्या फॅक्टस वेगळ्या असतात म्हणून तज्ञ वकीलांचा सल्ला घेणे श्रयस्कर राहील.
जागा नावावर करणे हा जिव्हाळयाचा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. लाईट बिल, टॅक्स पावती, ७/१२ उतारा , प्रॉपर्टी कार्ड हे कायद्याच्या दृष्टीने मालकी हक्काचे पुरावे समजले जात नाहीत. खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तांमुळे जो इंडेक्स-२ तयार होतो त्याला मालकी हक्काचा पुरावा म्हणून समजला जातो. त्याचप्रकारे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने तबदील होऊ शकतो.
रिडेव्हलपमेंटमध्ये जुन्या सभासदांना त्यांच्या फ्लॅट ऐवजी नवीन मोठा फ्लॅट बिल्डर कोणतेही पैसे न घेता बांधून देतो आणि त्या बदल्यात उर्वरित नवीन फ्लॅट तो स्वतः विकतो. डेव्हलपमेंट ऍग्रिमेंट (डी.ए.) हा काही मालकी हक्क देणारा करार नसतो. डी.ए.म्हणजे सोसायटी, सभासद आणि बिल्डर यांचे हक्क - जबाबदारी विषद करून विविध अटी शर्तींना अधीन राहून दिलेली बांधकाम परवानगी असते, . येथे जुन्या सभासदांबरोबर कोणताही खरेदी-विक्रीचा व्यवहार होत नाही आणि त्याने काही कोणाला मालकी हक्क मिळत नाही. थोडक्यात ज्याचे नाव जुन्या फ्लॅटवर असेल त्याच्याच नावाने नवीन फ्लॅटचाही करार होतो. त्यामुळे जर तुम्हाला नवीन फ्लॅटमध्ये तुमच्या मुला -मुलींचे /जोडीदाराचे नाव यावे असे वाटत असेल तर त्यासाठी सोपा आणि कमी खर्चाचा पर्याय म्हणजे डी.ए. होण्याआधीच जुन्या फ्लॅटमधील तुमचा हिस्सा विनामोबदला बक्षीस पत्राने मुला -मुलींच्या /जोडीदाराच्या नावावर करून ठेवणे. जुना फ्लॅट आकाराने लहान असल्याने आणि चालू रेडी रेकनर विचारात घेता जुन्या फ्लॅटच्या बक्षीस पत्राला कमी स्टँम्प ड्युटी लागेल. फक्त स्टँम्प ड्युटीच्या खर्चात, कोणत्याही मोबदल्याशिवाय त्या-त्या हिश्श्याचा मालकी हक्क मुला - मुलींना प्राप्त होतो. या बक्षिसपत्राची माहिती सोसायटी /अपार्टमेन्टला द्यावी म्हणजे डी.ए. मध्ये नोंद घेतली जाईल आणि त्याचे इतर फायदे देखील त्या प्रमाणात तुम्हाला विभागून मिळू शकतील. नवीन फ्लॅटचा जो PAAA करार होईल त्याच्या इंडेक्स-२ वर बक्षीस पत्राच्या हिस्सेवारीने तुमचे आणि तुमच्या मुला -मुलींचे नाव येईल. बरेचदा जास्तीचा एरिया विकत घेताना मुलांना कर्ज मिळण्यास सोपे जाण्यासाठीही लोकं असे बक्षीसपत्र करून ठेवतात. याला दुसरा पर्याय म्हणजे PAAA करार झाल्यावर मृत्युपत्र करून ठेवणे. मात्र त्याचा अंमल तुम्ही मयत झाल्यानंतर होईल कारण मृत्युपत्र करणारा बोलायचा थांबला की मृत्युपत्र बोलायला लागते !
त्याचप्रमाणे किती टक्के हिस्सा बक्षीस द्यायचा, उदा. १%, ५०% का १००% ? हे प्रत्येकाने ठरवावे. समजा तुम्ही १००% हिस्सा बक्षीस दिलात तरी जुन्या आणि त्या बदल्यात मिळणाऱ्या नवीन फ्लॅटमध्ये तुम्ही स्वतः करीता आणि तुमच्या जोडीदाराकरिता तहहयात राहण्याचा हक्क - life interest आणि मुले तुमचा सांभाळ नीट करणार ही पूर्वअट देखील लिहून ठेवू शकता. "जेवायला ताट द्यावे, पण बसायला पाट देऊ नये" हा त्यामागचा उद्देश. समजा तुम्ही ५०% टक्के हिस्सा बक्षीस दिलात, तर नवीन फ्लॅट मधील तुमच्या ५०% हिश्शयासाठी तुम्हाला एकतर मृत्युपत्र करून ठेवावे लागेल अन्यथा तुमचे मृत्युपश्चात वारसा हक्काने तो हिस्सा इतर सर्व वारसांना मिळेल किंवा त्यावेळच्या दराने स्टँम्प भरून परत दुसरे बक्षीसपत्र करता येईल.
ॲड. रोहित एरंडे ©
Comments
Post a Comment