सासऱ्याच्या मिळकतीमध्ये नणंदेचे हक्क किती ?: ॲड. रोहित एरंडे ©
सासऱ्याच्या मिळकतीमध्ये नणंदेचे हक्क किती ?
सर आमच्या घरात माझ्या ३ नणंदा आहेत. एक अहिवाहित आहे आणि दोघींची लग्ने झाले आहेत. माझे यजमान सर्वात छोटे आहेत. माझे सासरे नुकतेच अचानक मयत झाले. त्यांनी इच्छापत्र केलेले नव्हते. त्यांच्या नावावर बरीच मिळकत होती, मात्र सासूबाई आणि ३ नणंदा यांचेच आमच्याकडे चालते माझ्या यजमानांनी तिन्ही बहिणींसाठी खूप कष्ट केले, मात्र त्यांच्या सध्या स्वभावाचा फायदा घेऊन ते सर्व एक झाले आहेत. सासूबाईंनी परस्पर ३ बक्षीसपत्रे करून ३ नणंदा यांना सासऱ्यांची एक एक प्रॉपर्टी देऊन टाकली. आता आम्ही काय करावे ? आमच्या मुलाबाळांना काहीच मिळणार नाही का ?
एक वाचक, पुणे जिल्हा
ऍड. रोहित एरंडे.©
नणंद म्हणजेच नवऱ्याची बहीण या व्यक्तिरेखेचे बऱ्याच घरात वर्चस्व असते आणि सुनांविरुध्द होणारी घरगुती भांडणे, हिंसाचार यामध्ये नणंद -सासू यांची जोडी असल्याचे दिसून येते आणिवर्तमानपत्रामध्ये अश्या अनेक बातम्या आपण वाचल्या असतील. नणंद म्हटल्यावर "सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, नंणदेच कार्ट किरकिर करते, खरुज होऊ दे त्याला" या संत एकनाथ महाराजांच्या रूपकात्मक भारुडाची आठवण होते. असो. सब घोडे बारा टक्के हा न्याय इथेही लागू होत नाही. पण तुमच्या प्रश्नामुळे परत एकदा हिंदू पुरुषाचे वारस कोण होतात ? जी मिळकत आपली नाही, ती आपल्याला देता येते का ? यावर परत एकदा उत्तर देण्याची वेळ आली आहे.
नणंद आहेत का भावोजी आहेत ही नाती झाली. कायद्याने एखादा हिंदू पुरुष किंवा स्त्री मरण पावल्यावर आणि त्यांनी हयातीमध्ये मृत्युपत्र केले नसल्यास, त्यांच्या मिळकतीची विभागणी कशी होते हे आपण बघू या, यासाठी ढोबळ मानाने वारसांची क्लास-१ -हेअर्स (वारस) आणि क्लास-२-हेअर्स (वारस) अशी विभागणी केलेली आढळते. .
*हिंदू पुरुष आणि मिळकतीचे विभाजन* :
एखादा हिंदू पुरुष मृत्यूपत्र न करता मरण पावल्यास त्याची स्वकष्टार्जित मिळकत हि हिंदू वारसा कायद्याच्या कलम ८ अन्वये सर्व प्रथम क्लास-१ हेअर्स ज्यांच्यामध्ये प्रामुख्याने त्याची विधवा पत्नी, मुलगा -मुलगी (मुले) ,आई , जर मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असतील तर त्यांची मुले (नातवंडे), मुलाची विधवा पत्नी (सून) इ. चा समावेश होतो, या वारसांना समान पद्धतीने मिळकतीमध्ये हक्क मिळेल आणि जर का क्लास-१ वारसांपैकी कोणीही नसेल, तर मग क्लास-२ वारसांकडे अशी संपत्ती जाते. क्लास-२ हेअर्स मध्ये प्रामुख्याने वडील, मुलाच्या किंवा मुलीच्या मुलीचा मुलगा किंवा मुलगी (पतवंडे), भाऊ -बहीण, चुलते इ. यांचा समावेश होतो. तुमच्या केसमध्ये सासर्यांनी मृत्युपत्र केलेले नाही, त्यामुळे त्यांची जी काही मिळकत असेल त्यामध्ये त्यांचे क्लास-१ वारस म्हणजेच तुमच्या सासूबाई, तीनही नणंदा आणि तुमचे यजमान याना प्रत्येकी १/५ अविभक्त हिस्सा मिळेल.
राहिला प्रश्न बक्षीस पत्राचा. यासाठी एक मूलभूत कायदेशीर तत्व लक्षात घ्यावे "की जे आपले नाही ते आपण देऊ शकत नाही". सासऱ्यांच्या मृत्युनंतर त्यांचा हिस्सा आपल्यालाच मिळणार असे भावनिक दृष्ट्या सासूबाई आणि नणंदा यांना कदाचित वाटत असेल परंतु कोर्टामध्ये भावनांना थारा नाही आणि कायदा आपल्याला आवडेल असा बऱ्याचदा नसतो हे त्यांच्या लक्षात नसेल. पैसा -संपत्ती आली की नातेसंबंध दुरावतात हे कोर्टातील कटू सत्य आहे. तुमच्या केसमध्ये सासूबाईंचा १/५ एवढाच हिस्सा असल्याने त्या जास्तीत जास्त तेवढाच हिस्सा देऊ शकतात आणि जर त्यांनी १००% हिश्श्याचे बक्षीसपत्र केले असेल तर ते मूलतःच बेकायदेशीर आहे आणि सबब तुम्हाला त्यास कोर्टात दाद मागावी लागेल. स्वभाव शांत, चांगला म्हणून एकवेळ दुसऱ्यांची सहानुभूती मिळू शकते, पण कोर्ट स्वतःहून तुमच्या दारात येत नाही. यासाठी जी काही पाऊले उचलायची आहेत ती तुमच्या यजमानांनाच उचलावी लागतील. कोर्ट कचेरी करण्याआधी तुमच्या समाजातील जाणत्या व्यक्तींच्या मध्यस्थीचा काही उपयोग होतोय का तेही बघा.
तुमच्या प्रश्नामुळे केसमुळे मृत्यूपत्राचे महत्व देखील अधोरेखित झाले आहे. मृत्यूनिश्चित असला तरी त्याची वेळ सर्वात अनिश्चित असते, हे सासऱ्यांच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे कळले आहे. मृत्यूपत्र केले असेल तर वारसा कायद्याला बगल देता येते.
ऍड. रोहित एरंडे.©
Comments
Post a Comment