केवळ लग्न झाले म्हणून सासू सासऱ्यांच्या मिळकतीमध्ये जावई-सुनेला मालकी हक्क मिळत नाही. ॲड. रोहित एरंडे. ©
केवळ लग्न झाले म्हणून सासू सासऱ्यांच्या मिळकतीमध्ये जावई-सुनेला मालकी हक्क मिळत नाही.
ॲड. रोहित एरंडे. ©
आम्हा नवरा बायकोचा स्वकष्टार्जित फ्लॅट आहे आणि आता रिडेव्हलपमेंट झाल्यावर खूप मोठा फ्लॅट आम्हाला मिळणार आहे. आम्हाला एकच मुलगा आह आणि आम्ही त्याच्या लग्नाचे बघत आहोत. थोडे ऑड वाटेल, पण एकतर सध्या डिव्होर्स केसेस वाढीस लागल्या आहेत. भविष्यात आमच्या मुलाच्या बाबतीत असे काही झाल्यास आमच्या सुनेचा त्यावर अधिकार राहील का ? फक्त मुलाच्या नावे आत्ताच बक्षीसपत्र केले तरी सुनेला हक्क मिळेल का ?
एक पालक, पुणे.
प्रॉपर्टी असली तरी त्रास, नसली तरी त्रास असे म्हणतात. मात्र जेव्हा असे वाद आपल्या रक्ताच्या नात्यातील लोकांशी होतात तेव्हा संताप आणि मानसिक क्लेश या दोन्ही भावना एकाच वेळी दाटून येतात याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. आपल्या प्रकरणामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे फ्लॅट तुमचा स्वकष्टार्जित फ्लॅट आहे. त्यामुळे तुमच्या हयातीमध्ये तर तुमच्या मुलाला सुध्दा यामध्ये काहीही मालकी हक्क नाही त्यामुळे सुनेला देखील मालकी हक्क मिळण्याचा प्रश्नच येत नाही. डिव्होर्सचे प्रमाण सध्या खूप वाढले आहे यात शंका नाही. पूर्वी दूरवर कोणाबाबत घडणारे हे प्रसंग आता आपल्या घरात येऊन ठेपले आहेत आणि याला बदलत चाललेले समाज-जीवन कारणीभूत आहे.
A Bad Marraige or a Divorce " हा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा असतो. पण याचा अर्थ प्रत्येक लग्नाचे पर्यवसन हे डिव्होर्स मध्येच होईल असे अजिबातच नाही. डिव्होर्सच्या भितीने लग्न न करणे म्हणजे अपघात होईल म्हणून गाडी न चालविण्यासारखे आहे. त्याच प्रमाणे तुमची ही भिती येणाऱ्या सुनेविषयी उगाचच तुमचे मत पूर्वग्रहदूषित म्हणजेच "prejudiced " केल्यासारखे होईल आणि यातून वेगळे दूरगामी प्रश्न निर्माण होतील .
मात्र समजा भविष्यात दुर्दैवाने तुमची डिव्होर्सची भिती खरी ठरली तरी सुनेचे हे "martial home " असल्यामुळे डिव्होर्स चालू असे पर्यंत सुनेला फक्त राहण्याचा हक्क एकवेळ मिळू शकेल, पण मालकी हक्क नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे आई वडिलांच्या स्वकष्टाजीत मिळकतीमध्ये मुलाला किंवा मुलीला जन्मतः कुठलाच हक्क प्राप्त होत नाही आणि केवळ तुमच्या मुलामुलींशी लग्न केले म्हणून त्यांच्या जावई - सुनेला देखील लगेच कुठलाच मालकी हक्क मिळत नाही.
याच पार्श्वभूमीवर "एकतर पालकांच्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये मुलांना पालकांच्या हयातीमध्ये कुठलाही हक्क मिळत नाही. त्यामुळे वेळ पडल्यास मुलांना घराबाहेर काढण्याचा हक्क पालकांना आहे". असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने "श्वेता शेट्टी विरुध्द महाराष्ट्र सरकार आणि इतर, रिट याचिका क्र.९३७४/२०२० (एल)" या याचिकेवर दिला आहे.
सांगण्याचे तात्पर्य हेच कि जो फ्लॅट तुमच्या सारख्या आई-वडिलांचा स्वकष्टार्जित आहे त्याचे विभाजन कसे करायचे किंवा कायद्याच्या भाषेत त्याची "विल्हेवाट" कशी लावायची हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे. सबब तुम्ही तुमच्या फ्लॅटचे नोंदणीकृत मृत्युपत्र करून ठेवणे इष्ट. तुम्ही आता थेट प्रश्न विचारलाच आहे तर यामध्ये अजून एक दुर्दैवी शक्यता अशी कि समजा तुमच्या मुलाचे तुमच्या हयातीमध्येच काही बरे-वाईट झाले आणि तुम्ही मृत्युपत्र न करता मरण पावलात तर मात्र तुमचे पश्चात, तुमच्या मुलाला जो वाटा मिळाला असता, तो सुनेला आणि नातवंडांना (असल्यास) समान रीत्या विभागून मिळेल.
तुम्ही समजा मुलाच्यानावे बक्षीसपत्र केले, तर अर्थातच तो एकटा मालक होईल आणि मग त्या फ्लॅटचे काय करायचे हा सर्वस्वी अधिकार त्याचा राहील आणि अश्यावेळी "जेवायला ताट द्यावे. पण बसायला पाट देऊ नये" या म्हणीप्रमाणे जरी तुम्ही बक्षीसपत्र करून दिले तरी तुम्हा उभयतांना आयुष्यभर राहण्याचा अधिकार ठेवा आणि मुख्य म्हणजे जर का मुलाने तुमचा नीट सांभाळ केला नाही तर बक्षीस पत्र रद्द करता येईल, अशी आत जरूर लिहून ठेवा, अशी अट नसेल बक्षीस पत्र रद्द करता येत नाही. अर्थात सब घोडे बारा टक्के या न्यायाने सर्वच पालकांना /मुलांना तोलणे चुकीचे होईल. ज्याने त्याने आपापल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय घ्यावा.
ॲड. रोहित एरंडे. ©
Comments
Post a Comment