प्रोबेट सक्तीला केंद्र सरकारचा पूर्ण विराम : ॲड. रोहित एरंडे ©
प्रोबेट सक्तीला केंद्र सरकारचा पूर्ण विराम ॲड. रोहित एरंडे © प्रोबेट म्हणजे काय हे बघण्याआधी मृत्यूपत्राची माहिती घेणे गरजेचे आहे. मृत्यूपत्र इतर दस्तांच्या तुलनेने करावयास सोपा असा दस्तऐवज आहे. किर्तीचे माहिती नाही, "मरावे परी मृत्युपत्रारूपी उरावे" पण एवढे आपल्या हातात आहे. मृत्यूपत्राबद्दलच्या तरतुदी ह्या भारतीय वारसा कायदा १९२५ मध्ये समाविष्ट केल्या आहेत. कोणतीही सज्ञान आणि जिचे मानसिक संतुलन ढळलेले नाही अशी कोणतीही व्यक्ती तिच्या स्व-कष्टार्जित (self -acquired ), स्थावर आणि जंगम मिळकतींसंदर्भात मृत्यूपत्र करू शकते.त्याचबरोबर हिंदू वारसा कायदा कलम ३० प्रमाणे वडिलोपार्जित मिळकतीमधील स्वतः चा अविभक्त हिस्सादेखील मृत्यूपत्राने देता येतो. मृत्यूपत्रास कोणताही स्टॅम्प लागत नाही, त्याचे रजिस्ट्रेशन करणे देखील कायद्याने सक्तीचे नसले तरी ते केलेले कधीही उत्तम. मृत्यूपत्र कायदेशीर ठरण्यासाठी दोन सज्ञान साक्षीदारांनी त्यावर सही करणे गरजेचे असते. मृत्यूपत्राच्या शेवटी डॉक्टर सर्टिफिकेट असणे...