देहे त्यागिता अवयवदान मागे उरावे ! ॲड. रोहित एरंडे.©

देहे त्यागिता  अवयवदान मागे उरावे !

ॲड. रोहित एरंडे.©


१३ ऑगस्ट हा जागतिक अवयवदान दिवस म्हणून साजरा केला जातो, तर २७ नोव्हेंबर हा दिवस भारतीय अवयवदान दिवस म्हणून साजरा केला जातो, त्या निमित्ताने....

अवयवदानाची गरज असलेल्या व्यक्ती आणि अवयवदाते यांचे प्रमाण इतके व्यस्त आहे हे पुढील आकडेवारीवरून दिसून येईल.  भारतामध्ये दरवर्षी सुमारे ५ लाख लोकांना अवयवदानाची गरज असते , तर सुमारे  ५० हजार लोकांना    लिव्हरच्या ट्रान्सप्लांटची गरज असते त्यापैकी केवळ १७००-१८०० लोकांनाच याचा लाभ होतो. , तर सुमारे १,५०,००० लोक किडनी ट्रांसप्लांट साठी प्रतीक्षेत असतात पैकी केवळ ८००० रुग्णांनाच प्रत्यक्षात किडनीदानाचा लाभ होतो.  त्याचप्रमाणे   असेही म्हणतात की भारतामध्ये रोज मरणाऱ्या व्यक्तींची संख्या बघता त्यांनी   जर का नेत्रदान केले, तर भारतामध्ये एकही अंध व्यक्ती उरणार नाही. 

 मानवी अवयवांचे दान आणि प्रत्यारोपण नियमाप्रमाणे व्हावे,  मानवी अवयवांच्या  तस्करीला आळा बसावा, यासाठी १९९४ साली भारत सरकारने मानवी अवयव आणि पेशी प्रत्यारोपण कायदा अस्तित्वात आणला. तदनंतर वेळोवेळी वेगळी नियमावली देखील अंमलात आणली आहे. भारतात अवयवदानासाठी केंद्र सरकारने सदरील कायद्याखाली २०११ मध्ये आणलेल्या दुरुस्तीनुसार   स्थापन केलेली  नॅशनल ऑर्गन आणि टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (National Organ and tissue Transplant Organization) म्हणजेच  नोटो  . तर महाराष्ट्र राज्यामध्ये  The Regional cum State Organ and Tissue Transplant Organisation (ROTTO-SOTTO), West and Maharashtra ही संस्था काम करते. या दोन्ही संस्थेच्या वेबसाईटवर विस्तृत माहिती मिळू शकते. 

त्वचा बँक : 

ह्या कायद्याखाली आता National  Tissue  Bank   स्थापन केली असून मानवी शरीरातील (मृत देह ) स्नायुबंध (Tendon ) शिरा (veins ), नसा (Nerves ), त्वचा (Skin ), डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा (Cornea ), हृदयाची झडप (Heart Valve ), अस्थी आणि स्नायू पेशी ( Musculoskeletal Tissues) अश्या महत्वाच्या पेशींची योग्य रीतीने साठवणूक केली जाते जेणेकरून गरजू व्यक्तींना त्याचा वापर करता येईल.  जी व्यक्ती अवयवाद दान करते तिला डोनर (दाता ) आणि लाभार्थी व्यक्तीला डोनि असे म्हणतात. मूत्रपिंड , हृदय, फुफ्फुसे, स्वादुपिंड, त्वचा, डोळे, अश्या महत्वाच्या अवयवांचे दान केले जाऊ शकते. 

अवयवदानाचे ढोबळमानाने २ प्रकारामध्ये वर्गीकरण करता येते. 

१) जिवंतपणी अवयवदान (Live donation)  : ज्यामध्ये  अवयवदाता आणि पेशंट हे दोघेही एकमेकांचे जवळचे नातेवाईक किंवा मित्र असतात. जिवंतपणी अवयवदान / पेशिदान करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे गरजेचे असते. एखाद्या दात्यास  जिवंतपणी एक  मूत्रपिंड, स्वादुपिंडाचा काही भाग, यकृताचा काही भाग इ . अवयवांचे  दान करता येतो. जर अवयव दाता आणि लाभार्थी  एकमेकांचे जवळचे नातेवाईक नसतील किंवा जवळचे नातेवाईक असले तरी  अवयव दाता आणि लाभार्थी ह्यांच्यापैकी कोणीही भारताचा रहिवासी नसेल किंवा कोणाही  एकाचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल किंवा कोणीही एक मानसिक दृष्ट्या विकलांग असेल , तर अश्या परिस्थितीमध्ये   सदरील कायद्याखाली नेमलेल्या परवानगी  अधिकाऱ्यांनी  चौकशी करून  परवानगी दिल्याशिवाय असे अवयवदान करता येत नाही.

स्वॅप ट्रान्सप्लांट : स्वॅपिंग म्हणजे अदलाबदल. काही वेळा अवयवदान करण्यासाठी पेशंटच्या कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक तयार असतात परंतु काही वैद्यकीय कारणांमुळे उदा. रक्तगट न जुळणे इ. मुळे ह्या व्यक्तींचे अवयव घेतले जाऊ शकत नाहीत. अगदी त्याचवेळी अशीच गरज दुसऱ्या कोणत्यातरी कुटुंबातील लोकांना असते. मग  पहिल्या कुटुंबातील व्यक्ती दुसऱ्या कुटुंबातील व्यक्तीला अवयवदान करू शकतो आणि दुसऱ्या कुटुंबातील व्यक्तीकडूनही ततसेच केले जाते. 

२) मृत्युपश्चात अवयवदान (Cadaverous   Organ Donation)   : यामध्ये अवयवदाताच्या   मृत्यूनंतर त्याच्या  अवयवांचे दान केले जाते. ह्यालाच आपण देहदान असेही संबोधतो. आता लिव्हिंग विल मध्ये देखील आपण अवयवदानासंदर्भात सूचना देऊन ठेवता येतील .

अवयवदान कोण करू शकते ?

१८ वर्षे पूर्ण झालेली कोणतीही व्यक्ती अवयवदान किंवा देहदान करू शकते. देहदानासाठी, जिवंतपणीच विहित नमुन्यामधील फॉर्म हा दोन  साक्षीदार म्हणून घेऊन  भरणे गरजेचे असते.ह्यातील एक साक्षीदार हा जवळचा नातेवाईक असणे गरजेचे आहे.  'जवळचे  नातेवाईक' ह्या संज्ञेमध्ये वैवाहिक जोडीदार, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, नात, नातू  ह्यांचा समावेश होतो. ह्या संज्ञेला कायद्यामध्ये खूप महत्व आहे.  मात्र जर का असा फॉर्म भरला नसेल, तर ज्याच्या ताब्यात मृतदेह असे अश्या व्यक्तीलाही देहदानाचा फॉर्म भरता येतो.  असे  असे फॉर्म्स संबंधित हॉस्पिटल्स मध्ये उपलब्ध असतात आणि अवयवदान चळवळीमधील अनेक कार्यकर्ते तेथे मार्गदर्शन करतात. ह्या चळवळीमधील सर्व कार्यकर्ते, डॉक्टर्स ह्यांना सलाम.  एक प्रॅक्टिकल सल्ला असा, कि आपण देहदानाचा फॉर्म भरला आहे आणि तो कुठे ठेवला आहे , ह्याची माहिती आपल्या निकटवर्तीयांना देऊन ठेवावी. आता "लिव्हिंग विल" मध्ये सुध्दा आपण देहदानाचा इच्छा लिहून ठेवू शकतो.  त्याचप्रमाणे देहदानाचा फॉर्म भरला असेल, परंतु मृतदेह ठेवण्यास कुठल्याच शवागारात जागाच नसेल, तर देहदान करता येत नाही, हे आम्ही एका नातेवाइकांबाबत अनुभवले आहे.


ब्रेन-डेड अवस्था : 

ब्रेन डेड किंवा ब्रेन-स्टेम डेथ हि एक अशी अवस्था असते ज्यामध्ये मेंदूचे संपूर्ण नियंत्रण सुटलेले असते आणि केवळ हृदय चालू रहाते . अश्या ब्रेन-डेड पेशंटच्या बाबतीत  संबंधित हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनेलच्या  शिफारशीनंतरच देहदान करता येते. मात्र जर का ब्रेन-डेड झालेली व्यक्ती १८ वर्षांच्या खालील असेल, तर त्या व्यक्तीच्या पालकांची पूर्वसंमती घेणे गरजेचे असते. 

हॉस्पिटल किंवा जेलमधील बेवारशी मृतदेहांच्या बाबतीत जर मृत्यूनंतर  ४८ तासांच्या आतमध्ये संबधीत मृतव्यक्तीच्या नातेवाईकांनी आपला हक्क सांगितला नाही, तर संबंधित अधिकारी अश्या मृतदेहांचे देहदान करण्याचा निर्णय घेऊ शकतात. 

सर्वात महत्वाचे म्हणजे अवयवदान /अवयव प्रत्यारोपण हे  फक्त सदरील कायद्याखालील नोंदणीकृत असलेल्या  डॉक्टराना आणि मान्यताप्राप्त हॉस्पिटल मध्येच करता येते अन्यथा अन्यठिकाणी ते केल्यास ते बेकायदेशीर ठरून मोठा गुन्हा (तस्करी) समजला जातो.  ह्याला अपवाद म्हणजे एखाद्या मृत व्यक्तीचे डोळे आणि कान हे मान्यताप्राप्त तज्ञ्  डॉक्टरांकडून कुठल्याही ठिकाणावरून काढता येतात. 

सरकार देखील अवयवांच्या वाहतुकीसाठी 'ग्रीन कॉरिडॉर' हा एक विशेष मार्ग उपलब्ध करून देते जेणेकरून जेथून अवयव काढले जातात त्या हॉस्पिटल पासून ते जिथे प्रत्यारोपण करायचे त्या हॉस्पिटल पर्यंतचे सर्व ट्रॅफिक सिग्नल्स हिरवे (ग्रीन) केले जातात, कारण   अवयव प्रत्यारोपण जेवढे लवकर होईल तेवढे ते  यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. 


अवयवदानापुढील अडथळे :


मरावे परी अवयवदानारूपी उरावे, असे म्हणले तर वावगे ठरणार  नाही.   तरीही अजून लोक कचरतात किंवा घाबरतातही. कारण बऱ्याच लोकांना असे वाटते की अवयवदानामध्ये मृतदेहाची विटंबना होते. वस्तुतः मृतदेहाची विटंबना होणार नाही ह्याची पूर्णपणे काळजी घेतली जाते. 

दुसरा गैरसमज धार्मिक स्वरूपाचा आहे. पुराणांमधील  दधीची ऋषींची गोष्ट आपल्याला माहिती आहेच की दधीची ऋषींनी  आपल्या प्राणांची   पर्वा न करता,   समाजाच्या कल्याणासाठी वज्र  बनवण्यासाठी आपली अस्थी दान करण्याचा निर्णय घेतला.   

आपले अवयव दान केले, तर पुढच्या जन्मी आपल्याला असे अवयवच  येणार नाहीत, अशी  आपल्याला  अचंबित करणारी भीतीही लोकांच्या मनात असलेली आढळून येते. अश्या गोष्टींवर विश्वास असणाऱ्यांनी मग देह विनाशी आहे, आत्मा अमर आहे, ह्या हिंदू तत्वज्ञानावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. असो. 

ॲड. रोहित एरंडे © 

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©