रिडेव्हल्पमेंट : प्लॅन मंजूर झाल्यावरच जुनी जागा सोडणे हिताचे. ॲड. रोहित एरंडे ©
रिडेव्हल्पमेंट : प्लॅन मंजूर झाल्यावरच जुनी जागा सोडणे हिताचे.
ॲड. रोहित एरंडे ©
आमच्या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरु होऊन डेव्हलपमेंट ऍग्रिमेंट झाले आहे. मात्र अजून प्लॅन मंजूर झालेला नाही. असे असतानाही संस्थेचे पदाधिकारी आणि बिल्डर आम्हावर जागेचा ताबा देण्यासाठी दबाव आणत आहेत आणि ताबा देताना लोखंडी दरवाजे, ग्रील इ. काढू नये असेही त्यांचे म्हणणे आहे. तसेच संपूर्ण ताबा मिळाल्याशिवाय बिल्डर भाडे देणार नाही असे म्हणत आहे. तर याबाबत नक्की काय करावे ?
एक वाचक, पुणे.
रिडेव्हल्पमेंटचा डोंगरही दुरून साजरा असतो, पण जस जसे तुम्ही जवळ येत तस-तसे अनेक चढ-उतार यायला लागतात. प्रत्येक रिडेव्हल्पमेंट केस ही वेगळी असते आणि त्याप्रमाणे प्रत्येकाच्या अटी शर्ती याही वेगळ्या असणारच. प्रत्येक सोसायटी / अपार्टमेंटने सुरुवातीलाच जास्तीची जागा किती मिळणार, इतर आर्थिक फायदे इ. अटींबरोबरच बेसिक एफएसआय चा प्लॅन मंजूर झाल्यावर जागा सोडायची, का "पूर्ण पोटेन्शिअल" चा प्लॅन मंजूर झाल्यावर सोडायची, का PAAA करार नोंदविल्यावर सोडायची , तसेच बँक गॅरेंटी हवी की नाही इ. महत्वाच्या अटी - शर्तींवर तडजोड होणार नाही असे स्पष्ट केले की ज्या बिल्डरला अशा अटी -शर्ती मान्य असतील तोच टेंडर भरेल हे लक्षात ठेवा, म्हणजे नंतर वाद-विवाद होत नाहीत. अर्थात काही वेळेला परिस्थितीनुसार उभयता काही बदल केले तर तो भाग अलाहिदा. अर्थात परत प्रत्येक स्कीमच्या आकाराप्रमाणे यामध्ये बदल होतातच. या अटी शर्ती आपले हित जपणाऱ्या असण्यासाठी सोसायटीने स्वतःचा वकील आणि आर्किटेक्ट नेमणे अत्यंत गरजेचे असते आणि तिथे काटकसर करणे चांगले नाही.
साधारणपणे आधी डेव्हलपमेंट ऍग्रिमेंट (डी.ए.) होते, मग प्लॅन मंजुरीला जातो, मग रेरा रजिस्ट्रेशन होते आणि मग PAAA करार नोंदविला जातो. मात्र जो पर्यंत प्लॅन मंजूर होत नाही तो पर्यंत जागेचा ताबा सोडणे योग्य नाही, तसे डी.ए. मध्ये नमूद केले जाते आणि बहुतांशी ठिकाणी अशीच प्रक्रिया अनुसरली जाते. समजा उद्या कुठल्याही कारणास्तव बिल्डरचा प्लॅन मंजूर झालाच नाही तर ज्यांनी ताबा सोडलाय त्यांची स्थिती 'ना घरका ना घाटका' अशी होईल. एक लक्षात घ्या, ताब्याला १० पैकी ९ मार्क असे कायद्यामध्ये म्हणतात कारण ताबाच नसेल तर मालकी हक्काच्या १ मार्काचा काय उपयोग ? कोर्टातील बहुतांशी वाद हे ताबा मिळण्यासाठी किंवा ताबा वाचविण्यासाठी असतात, एवढे महत्व ताब्याला आहे. नवीन जागेचा प्लॅन पास झाला की सभासदांचे हक्क देखील अधोरेखित होतात. त्याचप्रमाणे संपूर्ण जागेचा ताबा मिळाल्याशिवाय बिल्डर देखील पर्यायी जागेचे भाडे शक्यतो देत नाहीच कारण संपूर्ण ताबा मिळाल्याशिवाय बिल्डरला काम देखील सुरु करता येत नाही. त्यामुळे सोसायटीने सर्व सभासदांच्या जागेचा ताबा बिल्डरला एकदम मिळेल याकडे लक्ष द्यावे. विनाकारण जागा अडविणाऱ्या सभासदांना उच्च न्यायालयाने वेळोवेळी दणके दिले आहेत हेही लक्षात घ्यावे.
बिल्डिंग पाडताना किंवा पाडल्यावर जो काही लाकूडफाटा, स्टील, लोखंड इ. उरते त्यावर बिल्डरचा अधिकार असतो आणि तसे डी.ए.मध्ये नमूद केलेले असते, तुमच्याही डी.ए. मध्ये तसे नमूद केले असेल. घरातील मुव्हेबल फर्निचर, एकवेळ सिलिंग फॅन इ. काढून नेणे समजू शकतो, पण प्रॅक्टिकली ग्रील, दारे इ. ज्या गोष्टी कायमस्वरूपी बसविल्या आहेत त्या काढून काही उपयोगही नसतो आणि नवीन फ्लॅटला ग्रील, दारे मिळणार असतातच की. असो. सबब डी.ए.च्या अटी-शर्ती नीट आहेत की नाही हे बघणे गरजेचे आहे कारण एकदा का डी.ए. ची नोंदणी झाली की आधीचे,- MOU , ऑफर लेटर, तोंडी आश्वासने इ. करार मदार सर्व संपुष्टात येतात !
ॲड. रोहित एरंडे ©
Very very important advice. Today all are taken for a ride for interest of few office bearers, who are hand i glove with Developer and his team.
ReplyDelete