महिलांच्या मिळकतीमध्ये वाटेकरी कोण ? ॲड. रोहित एरंडे. ©

  महिलांच्या  मिळकतीमध्ये वाटेकरी कोण ?

ॲड. रोहित एरंडे. ©

माझ्या पत्नीच्या  एकट्याच्या  नावावर एक फ्लॅट आहे आणि दुसरा फ्लॅट तिच्या आणि माझ्या नावावर आहे. माझी पत्नी २ वर्षांपूर्वी गेली. तिचे इच्छापत्र नाही .. तर  हे दोन्ही फ्लॅट मी पती या नात्याने    मला एकट्यालाच मिळतील ना  ?   त्यामध्ये  माझ्या मुला -मुलीचा आणि सून -जावयाचा काही हक्क येतो का ?

एक वाचक,  मुंबई 

  हिंदू  पुरुष आणि महिला यांच्याबाबत वारसा हक्काचे नियम वेग-वेगळे आहेत, तरीही पती नंतर फक्त पत्नीलाच  आणि पत्नी नंतर फक्त पतीलाच  एकमेकांची मिळकत मिळेल, असा कायदा नाही. असो. या निमित्ताने परत एकदा या विषयाची थोडक्यात माहिती घेऊ.  हिंदू वारसा कायदा  कलम १४ अन्वये महिलांना  एखादी स्थावर / जंगम मिळकत वारसाने, वाटपाने, पोटगीसाठी किंवा पोटगीच्या फरकापोटी, मृत्यूपत्र किंवा बक्षीसपत्र किंवा खरेदीखत अश्या दस्तांनी, स्त्री-धनापोटी इ. प्रकारे आणि कोणाकडूनही मिळाल्यास ती महिला अश्या मिळकतींची संपूर्ण मालक होते. ह्याला अपवाद म्हणजे अश्या दस्तांनी जर मिळकतींमध्ये फक्त तहहयात राहण्याचा हक्क (life interest ) दिला असेल तर त्यामध्ये असा मालकी हक्क मिळत नाही.


जर एखादी हिंदू महिला  मृत्यूपत्र न करता मरण पावली तर तिची मिळकत कलम १५ (१) प्रमाणे सर्वात प्रथम तिचा नवरा, मुलगा-मुलगी आणि  जर मुलगा -मुलगी आधीच मयत झाले असतील तर  त्यांची मुले (नातवंडे) यांच्यामध्ये  समानरीत्या विभागली जाईल. मात्र येथे लक्षात घ्या की   मातेआधीच  मयत झालेल्या (predeceased) मुलांना त्यांची माता  मयत झाली त्यावेळी समजा  मुले  जिवंत असती तर प्रत्येकी  जेवढा हक्क मिळाला असता तेवढाच हक्क त्यांच्या मुला - मुलींना (नातवंडांना) पुढे विभागून मिळतो.

त्यामुळे तुमच्या केसमध्ये तुमच्या पत्नीचा एका फ्लॅटमधील संपूर्ण हिस्सा  आणि दुसऱ्या फ्लॅटमधील ५०% हिस्सा  हा  तुम्ही आणि तुमची दोन्ही मुले यांच्यामध्येच समानरीत्या विभागला जाईल. तुमच्या जावई आणि सुनबाईंना आत्ता  काहीही हक्क नाही, काळजी नसावी !. 

मात्र कलम १५(१) मधील कोणीच वारस नसेल  तर मग अशी मिळकत ही त्या महिलेच्या  पतीच्या   वारसांकडे आणि ते नसतील तर महिलेच्या  आई-वडीलांकडे आणि  तेही नसतील तर वडिलांच्या वारसांकडे आणि शेवटी आईच्या वारसांकडे  जाईल. 

परंतु कलम १५(२) च्या अपवादाप्रमाणे जर महिलेला एखादी मिळकत तिच्या आई-वडिलांकडून  मिळाली असेल आणि ती महिला निपुत्रिक (in absence of any issue ) असेल किंवा तिचे मुलगा-मुलगी किंवा नातवंडे ह्यांपैकी कोणीहि वारस हयात नसेल तर अशी मिळकत वर नमूद केल्याप्रमाणे प्रमाणे न विभागली जाता केवळ त्या महिलेच्या वडिलांच्या वारसांकडेच जाईल. तसेच जर निपुत्रिक महिलेला मिळकत   पतीकडून  किंवा सासऱ्यांकडून आली असेल , तर अशी मिळकत तिच्या  मृत्यूनंतर फक्त तिच्या  पतीच्या वारसांकडे जाईल. (महिलेच्या  मृत्यूनंतर अशी मिळकत हि मिळकतीच्या उगमाकडेच जाईल' हा कलम १५(२) मधील वरील अपवाद पुरुषांबाबत मात्र दिसून येत नाही ! )

वारसा हक्काबाबतचे प्रश्न नेहमीच  मृत्यूपत्राचे महत्व अधोरेखित करून जातात असे परत एकदा नमूद करून तुम्ही तरी आपल्या मिळकतीचे मृत्युपत्र करून ठेवावे. 

ॲड. रोहित एरंडे. ©

Comments