ॲटॅच्ड टेरेस फ्लॅटसाठी जादाचा मेंटेनन्स नाही. ॲड. रोहित एरंडे ©
ॲटॅच्ड टेरेस फ्लॅटसाठी जादाचा मेंटेनन्स नाही.
ॲड. रोहित एरंडे ©
सोसायटी मधील मेंटेनन्स चार्जेस प्रत्येक सदनिका धारकाला समान असतात असे समजते. त्यामध्ये चटई क्षेत्रानुसार वाढ करता येत नाही. काही सदनिकांना जोडून गच्ची किंवा टेरेस असते किंवा ओपन टू स्काय असा भाग असतो. समजा सोसायटी तील सर्व सदनिका ५०० स्क्वेअर फूट या चटई क्षेत्राच्या आहेत. त्यांचा देखभाल खर्च म्हणून समजा ५००० रुपये सोसायटी चार्ज करते. म्हणजे १० रुपये प्रती फूट. परंतु एक सदनिका अशी आहे की तीचे चटई क्षेत्र २५० फूट कव्हर्ड व २५० फूट ॲप्रूव्हड प्लॅन नुसार ॲटॅच्ड टेरेस, ज्याला त्या सदनिकेमधूनच एन्ट्री आहे, म्हणजे जोडलेली आहे. या वेळी या सदनिकेला सोसायटीने मेंटेनन्स चार्ज किती लावला पाहिजे या बाबत काही नियम आहेत का? वरील उदाहरणात या सदनिकेचा मेंटेनन्स चार्ज फ्लॅटसाठी वेगळा आणि टेरेससाठी वेगळा असला पाहिजे का ?
मिलिंद काळे, मुलुंड, मुंबई
आपल्या मेंटेनन्सच्या प्रश्नामध्ये टेरेसबद्दलचे उपप्रश्न दडले आहेत. प्रत्येक सोसायटीमध्ये कळीचा मुद्दा असलेला मासिक देखभाल खर्च / सेवा-शुल्क (मेंटेनन्स) किती असावा हे ठरविण्याचा अधिकार सोसायटीला नक्कीच आहे. मात्र तो देखभाल खर्च सर्वांना सामान असावा हा कायदा आता पक्का झाला आहे. निवासी असो वा व्यावसायिक, पहिल्या मजल्यावर राहताय का शेवटच्या मजल्यावर, फ्लॅट छोटा आहे का मोठा, त्यानुसार मासिक देखभाल खर्च कमी जास्त होत नाही. मात्र या समान मासिक देखभाल खर्चामध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो आणि त्याचबरोबर कुठले चार्जेस हे क्षेत्रफळाप्रमाणे आकारता येतात, याचीही माहिती सोसायटी आदर्श उपविधींमध्ये दिलेली आहे. अपार्टमेंटमध्ये मेंटेनन्स हा फ्लॅटच्या क्षेत्रफळाप्रमाणे कमी जास्त होतो.
तुम्ही नमूद केल्याप्रमाणे टेरेस जरी फ्लॅटला जोडली असली तरीही तो फ्लॅटचाच एक भाग आहे आणि इथे तर टेरेस मंजूर नकाशाप्रमाणे आहे. अशी ॲटॅच्ड टेरेस असेल तर जास्तीचा मेंटेनन्स द्यावा असे कुठेही नमूद केलेले दिसून येत नाही. तसेच अशी ॲटॅच्ड टेरेस असल्यामुळे सोसायटीच्या मेंटेनन्स मध्ये काय वाढ होणार आहे ? त्यामुळे फ्लॅटला ॲटॅच्ड टेरेस असली तरीही समान मेंटेनन्सच्या तत्वाप्रमाणे मेंटेनन्स बदलणार नाही.
आता टेरेसच्या हक्कांबद्दल वळू या. सर्वप्रथम टेरेस फ्लॅट म्हणजेच फ्लॅटला स्वतंत्ररीत्या जोडून असलेली टेरेस आणि कॉमन -टॉप टेरेस यामध्ये खूप फरक असतो हे लक्षात घ्या. 'टेरेस - फ्लॅटला लागून असलेले छोटेसे टेरेस हे मंजूर बांधकाम नकाशात देखील स्वतंत्रपणे दाखवलेले असतात, अश्या टेरेस या फ्लॅटचाच भाग समजला जातो आणि अशा टेरेस या त्या फ्लॅट मालकाच्या स्वतंत्र मालकीच्या असतात, सोसायटीच्या नाही आणि जसे आपल्या केसमध्ये आहे . मात्र सोसायटीमधील टॉप टेरेस बाबत मा. मुंबई उच्च न्यायालयाने "श्रीमती. रामगौरी विराणी विरुद्ध ओमवाळकेश्वर त्रिवेणी को.ऑप. सो. (२००० {२} बी.सी.आर. ६८७) या निकालामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की "सामाईक गच्चीचा वापर सोसायटीमधील सर्व सभासदांना करता येतो आणि अशी सामाईक गच्ची बिल्डरला कोणालाही विकत येत नाही" . मात्र अपार्टमेंट असोसिएशनच्या बाबतीत डीड ऑफ डिक्लरेशन मध्ये नमूद केले असल्यास सामाईक सोयी सुविधा वापरयाचा प्रत्येक अपार्टमेंट मालकाचा अधिकार हा कमी जास्त असू शकतो.
Comments
Post a Comment