पुनर्विकास आणि पर्यायी जागेच्या भाडयाचा प्रश्न?" ॲड. रोहित एरंडे ©

 पुनर्विकास आणि पर्यायी जागेच्या भाडयाचा प्रश्न?" 

ॲड. रोहित एरंडे ©

मी ९१ वर्षांचा आहे. मुंबईत आमची स्वमालकीची जागेवर  ४०/५० वर्षापासून चाळी बांधून आम्ही रहात आहोत. २० वर्षापूर्वी एका बिल्डरने मोकळया जागेवर दोन इमारती बांधून त्यात १२० सभासद सुखाने रहात आहेत. शिल्लक चाळी खाली केल्या नाहीत म्हणून बिल्डर निघून गेला. 

दुसऱ्या बिल्डरने पुनवर्विकासामध्ये  २ बी.एच.के. जागा देवू केली,.  आता एस.आर.ए. मार्फत एक विकासक ४/५ महिन्यांपूर्वी आला.    किती जागा देणार  काहीही माहिती नाही, मात्र  मासिक भाडे रु.२२,०००/-  देणार  असे सांगितले, पण  या  भाडयात जवळपास सर्वाना घरे मिळणे अशक्य. मी माझ्या परीने प्रयत्न करतोय. तसेच इमारती व चाळीतील सभासदांचा नफा-तोटा किती होइल ? आम्हाला किती जागा मिळावी ?


 सुदर्शन सिताराम परब, मुंबई. 

 

सर्व प्रथम आपण या वयातही सक्रीय आहात आणि इतरांचा विचार करत आहात याबद्दल आपले अभिनंदन आणि अशाच थँक लेस जॉब करणाऱ्या मंडळींमुळेच पुनवर्विकासाचे काम पुढे जात असते. तुमच्या प्रश्नात अनेक प्रश्न दडलेले आहेत.  पुनवर्विकासाचा  फायदा मिळण्यासाठी योग्य बिल्डर आणि इतर योग्य कायदेशीर सल्लागार, वास्तुविशारद हेदेखील मिळणे तितकेच गरजेचे आहे. एक लक्षात घ्यावे की कोणताही पुनवर्विकास प्रकल्प हा सभासद आणि बिल्डर या दोघांना फायदेशीर (win win  situation ) असणे अपेक्षित आहे. त्यासाठी आधी सभासदांमध्ये त्यांना नक्की काय हवे आहे या पेक्षा खरंच नक्की काय मिळू शकते याचा गृहपाठ करणे आवश्यक आहे.      बिल्डर निवडताना 'काय भुललासी वरलीया रंगा' असे होता कामा नये आणि सर्व बाजूंचा विचार करून बिल्डर निवडणे गरजेचे आहे. प्रत्येक   बिल्डरच्या जे प्रपोजल देतो त्यामध्ये कमी जास्त असतेच, त्यातील योग्य बिल्डर निवडणे हे खरे सभासदांचे  कौशल्य आहे आणि त्यासाठी त्यानं विविध सल्लागारांची गरज असते. 

तुमच्या केसमध्ये अजून मुख्य अटी शर्तीच ठरलेल्या नसल्यामुळे केवळ भाड्याची .रक्कम सांगून काय उपयोग ? आपली जागा पाडून व्यवस्थित   बांधकाम वेळेत पूर्ण करून नवीन बिल्डिंगचा ताबा देईल असा जो बिल्डर असेल त्यालाच तुम्ही निवडावे, 

पर्यायी जागेचे भाडे हा सगळ्या सभासदांचा जिव्हाळ्याचा विषय असतो,  नवीन फ्लॅट मिळेस्तोपर्यंत २-३ वर्षे दरमहा भाडे देऊन दुसरीकडे राहायचे असते आणि  अशा पर्यायी फ्लॅटसाठी भाड्याची रक्कम ही शक्यतो तुमच्या सध्याच्या फ्लॅटच्या क्षेत्रफळाशी निगडित असते आणि त्याचा दर किती असावा हे     प्रत्येक केस प्रमाणे ठरते आणि यासाठी वाटाघाटी करण्याचे कौशल्यही तितकेच महत्वाचे असते, नाहीतर युद्धात जिंकले आणि तहात हरले अशी परिस्थिती उद्भवू शकते.   त्याचप्रमाणे आपल्या घराच्या जवळच पर्यायी जागा मिळावी असा बहुतांशी लोकांचा कल असतो, मात्र याचे भाडे सगळ्यांना परवडेल असे द्यावेच असा काही कायदा नाही आणि यासाठीच आर्थिक अटी नीट बघणे गरजेचे आहे. काही ठिकाणी भाडे जास्त हवे असेल तर बिल्डर बेटरमेंट चार्जेस /कॉर्पस फ़ंड याची रक्कम कमी करतो.  त्यामुले आपल्याला नक्की काय हवे आहे हे तुम्ही ठरविणे गरजेचे आहे. तुमची स्कीम जर एसआरए असेल तर त्याचे कायदे आणि अधिकारी वेगळे आहेत. शक्यतो आपली सध्याची  जागा जेवढी असेल त्यामध्ये ठरलेल्या टक्केवारीनुसार वाढ होऊन नवीन जागा मिळते. काही ठिकाणी सभासदांनी एकमताने सर्वांना सामान जागा मिळेल असे निर्णय घेतल्याचीही उदाहरणे आहेत.  मात्र प्रत्येक केसच्या फॅक्टस आणि नफ्या-तोट्याच्या संकल्पना  वेगळ्या असतात. त्यामुळे तुम्हाला सर्वांना आधी  एकत्र यावे लागेल, लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागेल आणि मग तुम्ही बिल्डर निवडीकडे वळावे. 


ॲड. रोहित एरंडे ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©