अविवाहित महिला आणि मिळकतीची विभागणी : ॲड. रोहित एरंडे ©

   अविवाहित महिला आणि मिळकतीची विभागणी : 

नमस्ते , मी एक अविवाहित महिला आहे. मी  आणि माझे आई-वडील  आम्ही एकत्र सुखाने रहात  आहोत.  मी नोकरी करून पैश्यातून काही स्थावर जंगम प्रॉपर्टी कमावली आहे. माझे मृत्युनंतर माझी मिळकत कोणाला मिळेल ? मृत्युपत्र करणे कायद्याने मँडेटरी आहे का ?

एक वाचक,

  हिंदू वारसा कायद्याप्रमाणे  पुरुष आणि महिला यांच्या मिळकतीची त्यांच्या मृत्युपश्चात विभागणी वेगळ्या पद्धतीने होते. आपल्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी एक समजून घेऊ की एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा आपल्या  हयातीमध्ये हवा असेल तर  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच दिला -घेतला जाऊ शकतो. तर   एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने (टेस्टमेंटरी सक्सेशन) किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने (इंटेस्टेट सक्सेशन )  तबदील होऊ शकतो. खरेदीखत, बक्षीसपत्र , मृत्युपत्र  ह्यायोगे मिळालेली मिळकत हि त्या व्यक्तीची स्वकष्टार्जित / स्वतंत्र मिळकत धरली जाते.  


तर एखादा हिंदू पुरुष आणि महिला  मृत्यूपत्र न करता मरण पावले तर त्यांच्या स्वकष्टार्जित  संपत्तीची विभागणी हिंदू वारसा कायद्याच्या  वेगवेगळ्या तरतुदींप्रमाणे  होते. ह्यासाठी ढोबळ मानाने  कायद्याने क्लास-१ -हेअर्स (वारस) आणि क्लास-२-हेअर्स (वारस) अशी विभागणी केलेली आढळते. .


* महिला आणि मिळकतीचे विभाजन* :


 कलम १४ अन्वये   महिलांना एखादी मिळकत वारसाने, वाटपाने , पोटगीसाठी किंवा पोटगीच्या फरकापोटी,  मृत्यूपत्र किंवा बक्षीसपत्राने किंवा खरेदीने, स्त्रीधनापोटी इ. प्रकारे  आणि  कोणाकडूनही    मिळाल्यास ती महिला अश्या मिळकतींची संपुर्ण मालक होते. इथे विवाहित -अविवाहित असा  भेद केलेला आढळून येत नाही. याला  अपवाद म्हणजे ज्या  मिळकतींमध्ये फक्त तहहयात राहण्याचा हक्क दिला असेल त्या सोडून.   


 जर हिंदू वारसा कायदा  कलम १५(१) प्रमाणे जर का एखादी हिंदू महिला  मृत्यूपत्र न करता मरण पावली तर तिची मिळकत  प्रमाणे सर्वात प्रथम तिचा नवरा, मुलगा-मुलगी, जर मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे) ह्यांच्यामध्ये समानरीत्या विभागली जाईल. ह्यांच्यापैकी कोणीच नसेल तर मग नवऱ्याचे वारसांकडे आणि ते नसतील तर आई-वडील, तेही नसतील तर वडिलांच्या वारसांकडे आणि शेवटी आईच्या वारसांकडे मिळकत जाईल. त्यामुळे तुमच्या केसमध्ये तुम्ही अविवाहित असल्यामुळे आणि तुम्ही जर मृत्यूपत्र न करता  आई-वडिलांच्या आधी मयत झाला तर अशी मिळकत तुमच्या आई-वडिलांकडे अथवा मग  त्यांच्या वारसांकडे  जाईल.     हि कलम १५(२) मधील  पूर्व अट  लक्षात घ्यावीच  लागते. मात्र अशी अट पुरुषांबाबत आढळून येत नाही !  

त्यामुळे जर महिलेला एखादी  मिळकत तिच्या वडील किंवा आईकडून मिळाली असेल आणि ती महिला निपुत्रिक (issueless ) असेल म्हणजेच तिचे मुलगा-मुलगी किंवा जर मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे) ह्यांपैकी कोणी  वारस हयात नसतील तर अशी मिळकत हि कलम १५ (१) प्रमाणे न जाता  केवळ त्या महिलेच्या वडिलांच्या वारसांकडेच  जाईल,  तसेच जर का मिळकत नवऱ्याकडून किंवा सासऱ्यांकडून आली असेल आणि ती निपुत्रिक असेल , तर अशी मिळकत हि तिच्या मृत्यूनंतर फक्त तिच्या नवऱ्याच्या वारसांकडे जाईल, हि तरतूद जरी आपल्याला लागू नसली तरी इतरांसाठी महत्वाची आहे. 'महिलेच्या मृत्यूनंतर अशी मिळकत हि मिळकतीच्या उगमाकडेच जाईल' अशी अट पुरुषांबाबत केलेली दिसून येत नाही. 


 विवाहित असो वा  अविवाहित, मृत्युपत्र करून ठेवणे कधीही उत्तम कारण   मृत्युपत्र हे वारसा कायदा आणि नॉमिनेशन यांच्या वरचढ असते आणि तुमच्या केसमध्ये तर ते करणे इष्ट राहील.  मृत्युपत्र हे तुमच्या मृत्यूनंतरच अंमलात येईल आणि ते कितीही वेळा बदलता येते. त्याची नोंदणी केलेली कधीही फायदेशीर ठरते. मी सुखी आहे असे तुमच्यासारखे सांगणारे लोकं फार कमी असतात आणि तसेच रहा  आणि  त्यामुळे मृत्यूपश्चात काय होईल याचा फार ताण घ्यायचा नसेल तर तज्ञ वकीलांच्या मदतीने मृत्युपत्र करून ठेवा. तुमची मिळकत कुठल्या "सत्पात्री व्यक्तीला /संस्थेला द्यायची किंवा कसे याबाबत ते मार्गदर्शन करून शकतील. 


*ऍड. रोहित एरंडे.©*










Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©