१२ जुलै - मॅरॅथॉन आणि पावनखिंड.. ॲड. रोहित एरंडे.©

 १२ जुलै - मॅरॅथॉन आणि पावनखिंड.. 

महाकवि कालिदास ह्यांनी "कुमारसंभव ' ह्या महाकाव्यात म्हटल्याप्रमाणे    'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्' म्हणजेच शरीर -पर्यायाने आरोग्य चांगले असेल तर इतर (धर्म) कार्य नीट करता येतील, त्या प्रमाणे मॅरॅथॉन स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे वाढते प्रमाण बघता   फिटनेस बाबत लोक जागरूक झाल्याचे हे चिन्ह आहे. पण मॅरॅथॉन हा शब्द कुठून आला, ह्याचा शोध घेतला असता इंटरनेट वर माहिती मिळाली ती अशी, की सुमारे ५ व्या शतकात प्राचीन ग्रीस मध्ये मॅरॅथॉन नावाचे एक गाव होते. ह्या गावी रोमन्स आणि पर्शियनस ह्यांच्यातील युद्धामध्ये रोमन्स विजयी झाले आणि ही बातमी अथेन्स येथे पोहोचविण्यासाठी ग्रीक निरोप्या - फिलीपेडस, हा  मॅरॅथॉन ते अथेन्स हे सुमारे २५-२६ मैल म्हणजेच सुमारे ४२ किमी हे अंतर पळाला आणि बातमी सांगून तत्क्षणी गतप्राण झाला. त्यामुळे ह्या अंतराची पळण्याची जी स्पर्धा पुढे सुरू झाली त्याला मॅरॅथॉन म्हणून ओळखले जावू लागले. ऑलिंपिक स्पर्धेमध्ये देखील ह्या क्रीडा प्रकाराला स्थान मिळाले. 

 आपल्याला  प्रश्न कदाचित पडेल की मॅरॅथॉन आणि पावनखिंड ह्यांचा काय संबंध ?

१२ जुलै १६६० ह्या दिवशी  आषाढ पौर्णिमा होती. पाऊस प्रचंड होता आणि अश्या किर्र रात्री बाजीप्रभु देशपांडे बांदल आणि त्यांचे शूर सहकारी मावळे आपल्या शिवाजी महाराजांसाठी  जीवावर उदार होवून, पायाखाली दगड धोंडे, नदी नाले, विंचू काटा तुडवत पन्हाळ्यापासून जे पळत होते ते पार घोडखिंडीपर्यंत  सुमारे तब्बल ५४ किमी चे अंतर कापून थांबले आणि न भूतो न भविष्यती असा अजरामर रणसंग्राम केला आणि घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे सार्थ केले .

आपल्याला पन्हाळा - पावनखिंड असा पायी प्रवास , ते सुद्धा,पायात बूट , अंगात रेनकोट, प्यायला पाणी, खायला अन्न एवढ्या सोयींनी सुद्धा जमणे खूप कष्टप्रद आहे. नवीन पिढीला मॅरॅथॉनची माहिती असेल वा नसेल  पण पावनखिंडीबद्दल जरूर माहिती द्या आणि   मॅरॅथॉन जरूर पळा आणि मनात पावनखिंड आणा, आपोआप स्फुर्ती येईल !

ॲड. रोहित एरंडे.©


Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©