सोसायटी थकबाकी भरल्याशिवाय सभासदत्व मिळू शकणार नाही. : ॲड. रोहित एरंडे ©
सोसायटी थकबाकी भरल्याशिवाय सभासदत्व मिळू शकणार नाही. आमच्या सोसायटीमध्ये एका सभासदाने त्याचा फ्लॅट आमची कुठलीही परवानगी (एन ओ सी) घेतल्याशिवाय विकला. या सभासदाची सुमारे १ लाख रुपयापर्यंतची थकबाकी आहे. आता नवीन खरेदीदार सोसायटीकडे सभासदत्वाची मागणी करत आहे आणि पूर्वीची थकबाकी भरल्यावर सभासदत्व मिळेल असे आम्ही त्याला कळविले आहे. तर आता नवीन सभासद आमच्या विरुध्द कोर्टात जाण्याची आणि पोलीस तक्रार करण्याची धमकी देत आहे. तर या बाबतीत काय करता येईल ? एक वाचक, कोथरूड, पुणे. सोसायट्यांमधले बरेचसे वाद हे आर्थिक कारणांशी निगडित असतात आणि बहुतांशी वेळा सभासदांचा इगो हे त्याचे मूळ कारण असते. बऱ्याच सोसायट्यांमध्ये आपल्यासारखे प्रश्न निर्माण होताना दिसतात. आपल्या केसमध्ये एवढी थकबाकी होईस्तोपर्यंत सोसायटीने वसुली कारवाई का केली नाही हा प्रश्न कमिटीला विचारला जाऊ शकतो. असो. आपल्या प्रश्नात दोन भाग आहेत. सोसायटीची एन. ओ . सी. आणि सोसायटीची थकबाकी न दिल्यास होणारे परिणाम. यासाठी सोसायटी आदर्श उपविधी आणि सो...