इच्छापत्र आणि वैद्यकीय इच्छापत्र -वेगवेगळे, पण महत्वाचे.. ॲड. रोहित एरंडे ©
इच्छापत्र आणि वैद्यकीय इच्छापत्र -वेगवेगळे, पण महत्वाचे.. ॲड. रोहित एरंडे © इच्छापत्र (will ) करायची इच्छा हळू हळू लोकांमध्ये वाढीस लागल्याची दिसून येत आहे. त्याचबरोबर सध्या वैद्यकीय इच्छापत्राबद्दल पण "बेबी स्टेप्स" म्हणतो तसे लोकं विचारायला लागली आहेत. दोन्ही इच्छापत्रे ही एकच असतात का वेगवेगळी असतात, ती कधी करायची ? या बाबत लोकांच्या मनात संभ्रम दिसून येतो. तरी या लेखाच्या माध्यमातून आपण या दोन्ही इच्छापत्रांबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. " जिवासवे जन्मे मृत्यु जोड जन्मजात, दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत ". गदिमांनी अतिशय सोप्या आणि भावपूर्ण शब्दांत मृत्यु निश्चित असतो, परंतु त्याची वेळ सर्वात अनिश्चित असते हे सांगितले आहे. आपले आयुष्य एवढे अनिश्चित असताना आपल्या माघारी आपल्या कष्टाने मिळविलेल्या मिळकतीचे विभाजन आपल्या वारसांमध्ये सुकर आणि विना तंटा व्हावे म्हणून मृत्यूपत्रासारखा ज्यालाच इच्छापत्र - Will असेही म्हणतात, दुसरा सोपा आणि सोयीस्कर दस्त नाही. ...