स्वतः चे घर असले म्हणून गोंगाट करून दुसऱ्यांना त्रास देण्याचा अधिकार सभासदाला नाही . - ऍड. रोहित एरंडे ©

सर नमस्कार, आमच्या शेजारच्या फ्लॅट मधील रहिवासी दिवसाच्या कुठल्याही वेळी खूप मोठ्या आवाजात गाणी लावतात.  ह्या प्रकाराचा त्रास आमच्या बिल्डिंगमधल्या अनेकांना होतो, परंतु संबंधित सभासद राजकिय पार्श्वभूमीचे असल्यामुळे कोणी उघडपणे  तक्रार करायला धजावत नाही. आवाज  कमी करा असे सांगितले तर 'आमचे घर आहे आम्ही काहीही करू' असे म्हणून आम्हालाच दमदाटी करतात. तरी ह्याबाबत मार्गदर्शन करावे. 

त्रस्त सभासद, मुंबई. 

आपल्या वागणुकीमुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये, हे नागरिकशास्त्रामधील मूलभूत तत्व आहे. परंतु दुर्दैवाने आपल्याकडे नागरिकशास्त्राचे महत्व हे १०-१५ मार्कांपुरतेच सिमीत झाल्यामुळे असे प्रकार सर्रास घडतात  कि काय असे खेदाने नमूद करावेसे वाटते.  आपल्याला होणारा त्रास हा नक्कीच गंभीर असून कायदेशीरदृष्ट्या तो ध्वनिप्रदूषण म्हणून गणला जाऊ शकतो आणि एकंदरीतच ध्वनिप्रदूषणाच्या , ज्याचा आपल्या  रोजच्या जीवनात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असतो , त्याच्या कायदेशीर तरतुदींबद्दल आपल्याकडे अज्ञान दिसून येते आणि कायद्याचे अज्ञान हा कधीही बचाव होऊ शकत नाही.   सर्वप्रथम आधी ह्या 'गोंगाटाचे' रेकॉर्डिंग करून ठेवावे, ज्याचा पुढे पुराव्याकामी  उपयोग होऊ शकतो.  


  "जर एखाद्याला आवाज करण्याचा  अधिकार असेल, तर दुसऱ्या व्यक्तीला तो न ऐकण्याचाहि अधिकार आहे.  प्रत्येकाला सन्मानाने , स्वखुशीने  आणि शांत वातावरणात जगण्याचा घटनात्मक अधिकार आहे आणि  ह्या अधिकारात किडा - मुंगी सारखे जगणे त्यामुळेच अभिप्रेत नाही" असे मा. सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीच सांगितले आहे. "एखाद्याचा आवाज हा दुसऱ्यासाठी गोंगाट ठरू शकतो" असेहि न्यायालयाने पुढे म्हटले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे निकाल सार्वजनिक अथवा खासगी अश्या कुठल्याही ठिकाणी होणाऱ्या 'ध्वनी प्रदूषणाला' लागू होतात. 


जिग्नेश ठाकोर विरुद्ध दिलीप शहा या केस  मध्ये  २०१६ मा. मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले आहे कि  "कोणीही आपल्या जागेचा वापर हा दुसऱ्यांना त्रास होईल अश्या पद्धतीने करू शकत नाही". त्यामुळे माझ्या घरात मी काहिही करू शकतो, हा समजच चुकीचा आहे.  ह्याच तत्वावर आधारित असलेल्या  आदर्श उपविधी ४८(अ) अन्वये आपण  सोसायटीकडे लेखी  तक्रार करू शकता.   सोसायटी समितीने सांगून देखील संबंधित सभासदाचे उपद्रवी वर्तन  न थांबल्यास उपविधी ४९(ड)  आणि सहकार कायदा कलम ३५ अन्वये प्रक्रिया पार पडून आरोप सिध्द झाल्यास  सदरील सभासदाचे सदस्यत्व देखील रद्द होऊ शकते. त्याचप्रमाणे कोर्टात दावा लावून मनाई हुकूम देखील मिळवता येईल,  परंतु "केल्याने होत आहे रे"  हे लक्षात ठेवावे.  त्याही आधी  तुम्ही १०० नंबर वर फोन करून पोलिसांना कळवावे कारण म्हणजे त्याची लगेच दाखल घेतली जाईल.  सर्वात महत्वाचे म्हणजे ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियम २००० अन्वये खूप कठोर नियम केले आहेत आणि ध्वनिप्रदूषणाची व्याख्या देखील मोठी आहे ज्यामध्ये ध्वनी पातळीच्या वर हॉर्न वाजविणे, फटाके फोडणे, लाऊडस्पिकर वापरणे, कुठल्याही  प्रकारच्या वाद्यांनी / साधनांनी होणारे आवाज ह्यांचा समावेश होतो. ह्या अन्वये देखील तुम्ही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करू शकता. महत्वाचे म्हणजे ध्वनिप्रदूषणाचे हे नियम सर्व जाती धर्मांच्या लोकांना किंवा तुमच्या केसमधील राजकिय पार्श्वभूमी असलेल्या माननीय सभासद विभूतींना  देखील   सारखेच लागू आहेत. 


ध्वनिप्रदूषणाला 'सायलेंट किलर' म्हणतात कारण त्यामुळे  शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते, आणि हो, प्रदूषण करणाऱ्याचेही बिघडते. "शेजाऱ्यांनी मोठ्यांदा लावलेला रेडिओ हा आपल्यासाठीच लावला आहे असा समज करून घेतला कि आपला  त्रास कमी होतो" असे पु. ल. देशपांडे म्हणून गेले आहेत. ह्यातील गंमतीचा भाग सोडला तरी  त्यांच्या वेळचा तो  काळ आणि तो ऐकावा वाटणारा रेडिओ कधीच लुप्त झाले आहेत. असो.  


ऍड. रोहित एरंडे ©


Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©