सशस्त्र चंदन चोरीचा जीवघेणा थरार.. ॲड. रोहित एरंडे ©

सशस्त्र चंदन चोरीचा जीवघेणा थरार...... 

काही दिवस आपल्या आयुष्यात "कायमचे' लक्षात राहण्यासारखे येतात आणि असा दिवस जर आपल्या जीवावर बेतलेला असेल आणि आपण किती हतबल आहोत याची जाणीव करून देणारा असेल तर तो तर कायमचाच लक्षात राहतो.. 


असा दिवस आमच्या आयुष्यात १० ऑगस्ट २०२४ रोजी येणार आहे, याची आम्हाला स्वप्नात सुध्दा कल्पना नव्हती. आमच्या भारती निवास कॉलनी, प्रभात रोड , पुणे येथील घरात  घरात सुमारे ७० वर्षे जुने असे चंदनाचे झाड होते (अत्यंत दुःखाने आता "होते" असे लिहावे लागत आहे).. सुमारे १८ वर्षांपूर्वी झाड कापण्याचा २ वेळा  प्रयत्न झाला होता, परंतु शीलाताईंनी तो परतवून लावला होता  आणि म्हणून   त्या झाडाला मजबूत (!!) असा ६ फुटी उंच चौथरा बांधून घेतला होता आणि त्यावर ५ फुट लोखंडी ग्रील करून घेतले होते आणि त्यामुळे आम्ही निश्चिन्त  होतो. असो. 


१० ऑगस्टला पहाटे सुमारे ३.१५-३०. चे दरम्यान मी आणि बायको अनघा असे एकदम दचकून जागे झालो कारण बोअर-वेल खणताना  जसा प्रचंड आवाज होतो तसा एकदम ऐकू यायला लागला किंवा कोणी तर मोठी बाईक जोरात "रेज " करताना कसा आवाज येईल तसाच पण खूप जास्त पटीने यायला लागला . .एकतर  झोपेच्या अश्या वेळी आपल्याला पटकन लक्षातच येत नाही कि काय चाललंय, त्यामुळे  मी आणि अनघा लगेच खाली आलो. बाहेर अंधार होता आणि नुसता आवाज  येत होता. अनघा खिडकीत बघायला गेली आणि त्याचवेळी मी लाईट लावून दरवाजा उघडला. तेवढ्यात अचानक माझ्या समोर ५-७ लोक आमचे चंदनाचे झाड कापताना  दिसले आणि त्याचवेळी अनघाचा आवाज आला , "रोहित ताबडतोब आत ये !!" आणि तेवढ्यात  २ लोक माझ्या अंगावर हत्यार घेऊन  धावून आले  आणि मी  अत्यंत चपळाईने आत आलो आणि दार लावून घेतले. नंतर सीसीटीव्ही मध्ये दिसले कि एका माणसाने दार ओढून बघितले आणि विचार आला या गडबडीत मला दार लावायला  जमलेच नसते तर ? हे लिहितानाही शहारा येतोय.... 


एव्हाना आम्हाला सर्व प्रकार लक्षात आला. कि आमचे चंदनाचे झाड चोरायला ७-८ लोक आली आहेत, आणि त्यांनी एक  मोठाले  कटर / इलेक्ट्रिक सॉ आणली होती   आणि त्याचाच  हा आवाज येत होता. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूकडून कोणी येऊ नये म्हणून आमच्याच दुचाकी पूर्ण रस्ताभर आडव्या लावून ठेवल्या होत्या. त्या कटरच्या वापर करून त्यांनी तो मजबूत सिमेंटचा चौथरा फोडून, चंदनाच्या झाडाचा जो महत्वाचा मधला भाग असतो - तो कापून टाकला. याचबरोबर आजूबाजूची पावडर पफ आणि शंकासुराची २ झाडे  पण त्यांनी कापून टाकली.  अक्षरशः हिंदी चित्रपटात दाखवतात तसे थरारक दृश्य होते. अनघा खिडकीतून बघायला गेली तर एका माणसाने तिलासुद्धा शस्त्र   दाखवून आत बसायला सांगितले..


आम्हाला सर्वांना प्रचंड धक्का  बसला होता आणि आमच्या डोळ्यासमोर ते झाड कापून नेत  होते, पण आम्ही काहीही करू शकत नव्हतो, हि हतबलता जास्त क्लेषदायक होती आणि आहे  !!. आमची मुलगी रडायला लागली, सासू-सासरे -घराचे मालक -ऍड. शीला आणि ऍड. प्रभाकर परळीकर  जे ७५ वर्षांचे आहेत, त्यांना प्रचंड धक्का  बसला होता आणि शीलाताई, ज्यांनी घरातील झाडे, बाग आजपर्यंत निगुतीने जतन केले आहे , त्यांना अश्रू आवरेनात .. पण   त्यांना आम्ही आत बसवले आणि काही झाले तरी बाहेर जायचे नाही असे निक्षून सांगितले, कारण चंदनचोर किती निष्ठुर असतात याची अनेक उदाहरणे आपण पेपरमध्ये वाचत असतो.     या दरम्यान आम्ही   ११२ नंबरला फोन लावला,त्या आवाजात पोलीस काय विचारत आहेत हेही ऐकू येत  नव्हते.त्यांना सांगितले कि ७-८ सशस्त्र लोक चंदनाचे  झाड चोरत आहेत तर ताबडतोब कुमक पाठवा !! सुमारे १५-२०  मिनिटांनी २ बिट मार्शल आले, परंतु तो पर्यंत चोर कार्यभाग उरकून त्यांच्या गाडीतून पसार  झाले होते. हे सर्व त्यांनी फक्त २०-२५ मिनिटांमध्ये केले आणि नंतरची उस्तवार करायला आम्ही आज २४ तास झाले तरी करत आहोत !



या दरम्यान आम्हाला समोरच्या लोकांचेही फोन आले होते, पण त्यांनाही आम्ही जिवाच्या भितीने खाली येऊ नका असे बजावले. अखेर  चोर गेल्याची खात्री पटल्यावर आम्ही खाली आलो तेव्हाचे दृष्य मन विदिर्ण करणारे होते.. अवघीय काही मिनिटांमध्ये त्यांनी सिमेंटचा चौथरा फोडून त्यातील झाड कापून निघून पण गेले,, जाताना नंबरप्लेट ला चिखल लावायचा पण प्रयत्न केला.. .. या दरम्यान आजूबाजूचे लोक सुध्दा  प्रचंड आवाजाने जागे झाले होते, पण कोणालाच काही कळत नव्हते. त्यातील १-२ जे लांबून बघत  होते त्यांनासुध्दा त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून आत पाठविले.. 


यात अजून एक दुर्दैवाची बाब म्हणजे पोलिसांकडून आम्हाला असे समजले कि गल्लीच्या दुसऱ्या टोकाला जे सीसीटीव्ही महानगरपालिकेने लावले होते, ते म्हणे कॉन्ट्रॅक्टरचे पैसे त्याला न मिळाल्याने त्याने ते १-२ दिवस अगोदरच काढून नेले होते, खरे खोटे देवाला माहिती  !! 


नंतर पोलीस आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी आले त्यांनी आम्हाला आश्वस्त केले कि लवकरच आम्ही चोर पकडू कारण हे प्रकरण जरा वेगळे आहे. बघुयात. Hope for  the  best  ! 


या सगळ्यात झाड गेले ते गेलं,. म्हणतात ना म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो, तसे आहे.. उद्या अशी लोकं आपल्या कोणाच्याही घरात घुसू शकतात आणि आपण काहीही करू शकणार नाही, या कटू वास्तवाची जाणीव झाली !! हि हतबलता अजूनही अस्वस्थ करते.. एवढे जुने झाड गेल्यामुळे आम्हाला घरातील एक मोठाले  माणूस गेल्यावर कसे वाटते तसेच काहीसे  वाटत होते आणि या प्रसंगात आमच्या आप्त-स्वकीयांनी भेटून आम्हाला धीर दिला.. वाईट म्हणजे त्या झाडावरील पक्षी सुध्दा जोरात किलबिलाट करत होते, कारण त्यांच्या घरट्यांचे काय झाले याची त्यांना कल्पनाच नव्हती आणि एवढा ऑक्सिजन विनामोबदला देणारे, सावली देणारे झाड काही क्षणात "आहे" चे "होते" झाले.. .. 


अजून एक महत्वाचे : आजूबाजूचे सिसिटीव्ही फुटेज मागताना काही गोष्टी लक्षात आल्या की  सिसिटीव्ही पासवर्ड नीट माहिती करून ठेवा आणि त्याचे रेकॉर्डिंग कसे बघायचे हेही शिकून घ्या , त्यातील वेळ आणि तारीख बरोबर आहे ना याची खात्री करून घ्या, कारण बरेच ठिकाणी चालू वेळ आणि तारीख आणि सिसिटीव्ही यामध्ये तफावत आढळली, त्यामुळे वेळ मागे पुढे मोजून रेकॉर्डिंग बघावे लागले  आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे फक्त आपल्या इमारतीमध्ये नाही, तर बाहेर रास्त सुध्दा नीट कव्हर होईल असा कॅमेरा जरूर बसवून घ्या.. वेळ कोणावरही येऊ शकते... असो. 

 

आमच्या या प्रसंगामुळे आम्हाला असे सुचवावेसे वाटते    ज्यांच्या घरात चंदनाचे झाड असेल  ते त्यांनी आधीच कापून टाकावे आणि यासाठी उद्यान विभागाने त्यांना सहकार्य करावे .. किंवा जर चोरी होत असेल तर 'उघड्या डोळ्याने' बघावे, कारण जान सलामत तो चंदन हजार... आम्ही वाचलो, देवाला दया !!



धन्यवाद  ,


ऍड. रोहित एरंडे, ऍड. अनघा परळीकर

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©