"मृत्यूपत्राने मिळालेली मिळकत स्वकष्टार्जित समजली जाते " - ॲड. रोहित एरंडे. ©
"मृत्यूपत्राने मिळालेली मिळकत स्वकष्टार्जित समजली जाते "
मला माझ्या वडिलांकडून मृत्युपत्राने एक फ्लॅट मिळाला आहे. माझ्या हयातीमध्ये या फ्लॅटमध्ये माझ्या बायकोचा आणि मुलांचा हक्क येतो का ? तसेच सोसायटी मध्ये वडिलांच्या संपूर्ण मृत्युपत्राची प्रत देणे गरजेचे आहे का ? का फक्त त्या फ्लॅटचा उल्लेख असलेले मृत्युपत्रामधील पान दिले तरी चालेल, कारण इतर मजकुराशी सोसायटीचा संबंध येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
एक वाचक, पुणे.
मृत्युपत्राइतकी भिती, गैरसमज इतर कोणत्याही कायदेशीर दस्ताबद्दल दिसून येत नाहीत. आधी हे लक्षात घ्यावे कि एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा कुठल्याही दोन किंवा अधिक व्यक्तींच्या हयातीमध्ये नोंदणीकृत - खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या दस्ताने तबदील केला जाऊ शकतो. तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने तबदील होऊ शकतो. मृत्यूपत्राप्रमाणे मालकी हक्क हा मात्र मृत्यूपत्र करणारी व्यक्ती (टेस्टेटर) मयत झाल्यावरच प्राप्त होतो आणि मृत्युपत्राने मिळालेली मिळकत हि स्वकष्टार्जित समजली जाते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वडिलांच्या मृत्यूपत्राने मिळालेला फ्लॅट हा तुमची स्वकष्टार्जित मिळकत समजली जाईल. त्यामुळे तुमचा स्वकष्टार्जित फ्लॅट असल्यामुळे तुमच्या हयातीमध्ये तुमच्या बायकोला, मुलांना कोणताही मालकी हक्क-अधिकार येत नाही. तुमच्या हयातीमध्ये फ्लॅटचे काय करायचे हे ठरविण्याचा तुमचा पूर्ण अधिकार आहे. तुमच्या मृत्यूनंतर फ्लॅट कोणाला मिळावा यासाठी तुम्ही देखील मृत्यूपत्र करून ठेवणे इष्ट. पण तुम्ही मृत्युपत्र न करता मरण पावल्यास तुमचे क्लास-१ वारस , ज्यामध्ये प्रामुख्याने तुमची बायको, मुले, पूर्वमृत मुलांची मुले (नातवंडे) आणि आई यांचा समावेश होतो, त्यांना फ्लॅटमध्ये समान हक्क मिळेल.
तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळण्याआधी मृत्युपत्र या मोठ्या विषयाची थोडक्यात का होईना माहिती सांगणे गरजेचे वाटते.
भारतीय वारसा कायद्याप्रमाणे कोणत्याही सज्ञान आणि ज्याची मानसिक स्थिती सुदृढ आहे अश्या व्यक्तीस स्वतः च्या स्वकष्टार्जित मिळकती संदर्भात मृत्युपत्र / इच्छापत्र म्हणजेच WILL करता येते. तर वडिलोपार्जित मालमत्ते मधील आपला अविभक्त हिस्सा देखील मृत्युपत्र द्वारे देता येतो. मृत्यूपत्रास स्टॅम्प-ड्युटी लागत नाही, मृत्युपत्राची नोंदणी करणेही कायद्याने बंधनकारक नाही. त्यामुळे खरेदी खत, बक्षीस पत्र इ. दस्तांच्या तुलनेत मृत्यूपत्र तुलनेने कमी खर्चाचा दस्त ठरतो. मृत्यूपत्र कायदेशीर ठरण्यासाठी मृत्यूपत्रावर टेस्टेटरने आणि दोन सज्ञान साक्षीदारांनी (जे लाभार्थी नसतील ) एकमेकांसमक्ष मृत्यूपत्रावर सही करणे गरजेचे आहे. पण दोन्ही साक्षीदारांनी एकाचवेळी सही करणे आणि साक्षीदारांना मृत्युपत्रात काय लिहिले आहे हे माहिती असणे, गरजेचे नाही. शक्यतो साक्षीदार हे आपल्यापेक्षा कमी वयाचे असल्यास अधिक उत्तम. फक्त मेट्रोपॉलिटिन शहरे वगळता इतरत्र प्रोबेट घेणे अनिवार्य नाही.
मृत्यूपत्राशेवटी मृत्युपत्रकारणाऱ्याची शारीरिक -मानसिक स्थिती चांगली आहे असे प्रमाणित करणारे डॉक्टर सर्टिफिकेट असणे कायद्याने सक्तीचे नसले तरी पुढील आरोप-वाद टाळण्यासाठी असे सर्टिफिकेट असणे केव्हाही चांगलेच . मृत्यूपत्र हे कितीही वेळा बदलता येते आणि सर्वात शेवटचेच मृत्यूपत्र ग्राह्य धरले जाते. मृत्युपत्र हे नॉमिनेशन किंवा वारसा कायदा ह्यांच्यापेक्षा वरचढ असते.
आता पुढचा प्रश्न. सोसायटीला तुमचे नाव सभासद म्हणून लावण्यासाठी मृत्युपत्राची संपूर्ण प्रत देणे गरजेचे आहे कारण एकतर कोर्टात देखील मृत्युपत्र हे अखंडपणे (read as a whole ) वाचले जाते. अर्थात प्रत्येक केसच्या फॅक्टस महत्वाच्या असतात हेही आवर्जून सांगावेसे वाटते. त्यामुळे नुसते 'एक पान' हे त्याच मृत्युपत्रातील आहे याची ग्वाही कोण देणार ? त्यामुळे सोसायटीच्या रेकॉर्डसाठी तुम्हाला मृत्युपत्राची संपूर्ण प्रत देणे गरजेचे आहे. अर्थात त्याचा गैरवापर होणार नाही हि जबाबदारी सोसायटीची आहे.
ॲड. रोहित एरंडे. ©
Very good and necessary information.
ReplyDeleteThanks 🙏
Delete