लिव्ह-इन रिलेशनशिप आणि मिळकतीमधील हक्क : ॲड. रोहित एरंडे ©

 लिव्ह-इन रिलेशनशिप आणि मिळकतीमधील हक्क :

मी आणि माझी मैत्रीण लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये गेले १-२ वर्षे  माझ्या मालकीच्या फ्लॅटमध्ये राहत आहोत. आता आमची बिल्डिंग  रिडेव्हलपमेंटला  जाण्यासंबंधी बोलणी चालू आहेत. तर या जुन्या किंवा नवीन मिळणाऱ्या  फ्लॅट मध्ये तिला मालकी हक्क राहील काय ?

एक वाचक, पुणे. 

आपला प्रश्न हा असाधारण - युनिक असा आहे. रिडेव्हलपमेंट करताना किती वेगवेगळे प्रश्न निर्माण होऊ शकतात याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. लिव्ह-इन रिलेशनशिप हा प्रकार आता आपल्याकडे काही नवीन नाही आणि एखादी गोष्ट कोणाला अनैतिक वाटली तरी ती बेकायदेशीर असलेच असेही नाही. दोन सज्ञान  भिन्नलिंगी पण अविवाहित व्यक्तींनी लग्नासारखे एकत्र राहणे म्हणजे लिव्ह-इन-रिलेशन असे व्याख्या हा विषय माहिती नसणाऱ्यांसाठी करता येईल. आता सध्याचा फ्लॅट तुमच्या नावावर असल्यामुळे जो नवीन फ्लॅट  रिडेव्हलपमेंट नंतर मिळेल तो सुध्दा तुम्हा एकट्याच्याच नावावर होईल. हा खूप महत्वाचा प्रश्न अनेक वाचकांना पडतो. बऱ्याच जणांना असे वाटत असते कि नवीन फ्लॅटवर मुला-मुलीचे किंवा वैवाहिक जोडीदाराचे नाव घालावे. पण कायद्याने ज्यांच्या नावावर जुना फ्लॅट असेल त्यांच्याच नावावर  नवीन फ्लॅट देखील होईल. 

त्यामुळे तुमच्या केसमध्ये तर तुमच्या मध्ये कायदेशीर नवरा -बायको असे नाते  नाही त्यामुळे तुमच्या पार्टनरला आताच्या फ्लॅटमध्येही कोणताही मालकी हक्क नाही आणि त्यामुळे नवीन फ्लॅटमध्येही तो मिळणार नाही. 

मात्र या संदर्भात  सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा  शर्मा वि. व्ही.के. शर्मा या केसमध्ये २०१४ मध्ये एखादे नाते लिव्ह-इन आहे का लग्नासारखे हे ठरविण्यासाठी ८ कलमी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या निकालातील महत्वाचा भाग म्हणजे  " लिव्ह-इन- मध्ये राहणाऱ्या महिलेला कौटुंबिक हिंसाचार कायद्याचे संरक्षण मिळू शकते आणि त्यायोगे घरात राहण्याचा अधिकार मिळू शकतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एखाद्या सज्ञान व्यक्तीने  लग्न करायचे का अविवाहित  राहायचे का लिव्ह-इन- मध्ये राहायचे हा सर्वस्वी त्या व्यक्तीचा अधिकार असेल". 


आपल्या प्रश्नामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अजून एका महत्वाच्या निकालाची थोडक्यात माहिती करून देणे गरजेचे आहे. धनुलाल वि. गणेशराम या २०१५ मधील निकालात सर्वोच्च न्यायालयाने १९२७ सालच्या प्रिव्ही कौन्सिल - म्हणजेच ब्रिटिशकालीन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन नमूद केले कि "(संबंधित जोडपे ) २० वर्षांहून अधिक काळ एखादी स्त्री आणि पुरुष एकत्र राहत असतील आणि त्यातून त्यांना मुले-बाळे झाली असतील आणि त्या सर्वांसाठी त्या पुरुषाने आर्थिक तरतूद केली असेल आणि सर्वानी विविध कौटुंबिक सण -समारंभात सहभाग घेतला असेल तर अशा जोडप्याला नवरा -बायकोच समजले जाईल कारण Law  presumes  in  favur  of marraige  & against  concubiange" असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.  अर्थात यासाठी प्रत्येक केसच्या फॅक्टस खूप महत्वाच्या राहतील. असो. तुमच्या केसमध्ये तुम्ही मृत्युपत्र करून ठेवणे अधिक श्रेयस्कर राहील. 

ॲड. रोहित एरंडे ©


Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©