ऑनलाईन खरेदी : "अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा " - Adv. ROHIT ERNADE ©
ऑनलाईन खरेदी : "अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा "
ॲड. रोहित एरंडे.©
प्रॉपर्टी /मिळकतीचे सामन्यपणे दोन प्रकारात वर्गीकरण होते - स्थावर (Immovable) मिळकत आणि जंगम (Movable ) मिळकत. स्थावर मिळकतीमध्ये आपले घर, फ्लॅट, दुकान जमीन, बंगला इ. चा समावेश होतो., तर जंगम मिळकतीमध्ये आपल्या वस्तू, पैसे, दाग-दागिने , शेअर्स, इन्वेस्ट्मेन्ट्स अश्या गोष्टींचा समावेश होतो. या सर्व गोष्टी घेण्यासाठी काहीतरी किंमत (पैसे) द्यावी लगते आणि त्यामध्ये आपली फसवणूक होऊ नये याची जबाबदारी आपल्यावरच असते.
स्वतःचे घर असावे अशी बहुतेक सगळ्यांचीच कांक्षा आयुष्यात असते आणि या साठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. सध्याच्या काळात वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध जागा ह्यांचे प्रमाण व्यस्त झाले आहे आणि पर्यायाने किंमतीत वाढ झाली आहे. आपल्या कष्टाच्या पैशाने घराचे स्वप्न हे निर्वेधपणे पूर्ण व्हावे आणि आपली फसवणूक होऊ नये ह्या साठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.कुठलीही जागा विकत घेताना करारनामा करणे गरजेचे असते आणि काही वाद विवाद झाल्यास त्यातील अटी आणि शर्ती खूप महत्वाच्या ठरतात. मिळकत कुठल्याही स्वरूपाची असो "अती लोभ त्या क्षोभ होइल जाणा, अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा " हे समर्थ वाचन कायम लक्षात ठेवा. कुठलीही स्थावर मिळकत घेताना खालील बाबी कायम लक्षात घ्याव्यात.
१) आपली गरज आणि आर्थिक कुवत ओळखा. क्षमतेच्या बाहेर जाऊन खरेदीचा मोह टाळा. . २) जागेची कागदपत्रे, करारनामे उदा. मालकी हक्क, रेरा परवानगी, इतर विविध परवाने, मान्यताप्राप्त नकाशे, पार्किंग आहे का नाही , इ. गोष्टी तज्ञ वकीलांकडून तपासून घेणे याला पर्याय नाही. वकीलांची फी वाचावी म्हणून इंटरनेट वरच्या अर्धवट माहितीच्या आधारे किंवा इतरांचे करारनामे वाचून स्वतःहून काहीतरी करायला गेल्यास नंतर कोर्ट कचेरीसाठी जास्त खर्च येतो आणि भरपूर मनस्ताप होऊ शकतो , हे लक्षात ठेवावे.
आता वळूया दुसऱ्या जंगम (Movable ) मिळकतींच्या खरेदी कडे. काही वर्षांपूर्वी अश्या गोष्टींची खरेदी ही फक्त सणासुदीला , मंगलकार्यांच्यावेळी आणि ते सुध्धा प्रत्यक्ष दुकानांत जाऊन व्हायची. मनात आले तरी खरेदी करण्यासाठी खिशात पैसेच नसायचे.मात्र जागतिकरणानंतर सर्व गोष्टी बददल्या आणि आता मोबाईल -इंटरनेट क्रांतीमुळे तर जग आपल्या तळहातावर - one click away , एवढ्या जवळ आले आहे. आता ऑनलाईन शॉपिंग हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. विक्रेते आणि ग्राहक या दोहांची सोयही झाली आहे. एका आकडेवारीनुसार भारतामध्ये ऑनलाईन व्यापाराची उलाढाल या वर्षी सुमारे १३-१४ लाख कोटी रुपयापर्यन्त होईल असा अंदाज आहे.
मात्र अशी कुठलीही वस्तू घेताना काळजी घेणे तर क्रमप्राप्तच आहे. यासाठी Caveat Emptor' (कॅव्हेट एम्प्टर) म्हणजे 'खरेदीदाराने सावध राहावे' (Let the buyer beware) हे सेल ऑफ गुड्स ऍक्ट, १९३० या कायद्यातील तत्व लक्षात घ्यावे . या तत्त्वानुसार, वस्तू खरेदी करताना गुणवत्ता, योग्यता आणि दोष तपासण्याची जबाबदारी खरेदीदाराची असते,त्यास विक्रेता जबाबदार नसतो. जर खरेदीदाराने तपासणी केली नाही आणि नंतर वस्तूमध्ये दोष आढळला, तर विक्रेता त्याबद्दल जबाबदार नसतो. अर्थात या नियमही अपवाद आहेतच. उदा. जर खरेदीदाराने विक्रेत्याला वस्तूचा विशिष्ट उपयोग सांगितला (उदा. 'हे गहू भेसळ नसलेले हवेत ') आणि विक्रेत्याने होकार देऊन ती दिली, तर विक्रेता जबाबदार राहतो.तसेच जर विक्रेत्याने जाणूनबुजून वस्तूमधला दोष लपवला किंवा चुकीची माहिती दिली, तर 'कॅव्हेट एम्प्टर' चे तत्त्व लागू होत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या विशिष्ट ब्रँड ची वस्तू (Trade Name) विक्रेता विकत असेल आणि त्या वास्तूमधेय काही दोष आढळल्यास वेळी विक्रेता जबाबदार असतो.
आता ऑनलाईन खरेदीच्या जमान्यात लोभाला बाली न पडत डोळसपणे खरेदी करणे गरजेचे आहे त्यासाठी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.
१. शकत्यो माहिती असलेल्या विक्रेत्याकडूनच माल खरेदी करा. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उत्पादन विकणाऱ्या विक्रेत्याचे नाव, पत्ता, ग्राहक सेवा क्रमांक (customer care number), आणि इतर संपर्क तपशील तपासा. वस्तू आयात केलेली असल्यास आयातदाराचे तपशील देखील उपलब्ध असणे आवश्यक आहे. सुरक्षित वेबसाइट वापरा. ऑनलाइन पेमेंटसाठी सुरक्षित पद्धती (उदा. क्रेडिट कार्ड, UPI) वापरा. डेबिट कार्ड किंवा बँक खाते तपशील /OTP अज्ञात किंवा संशयास्पद वेबसाइटवर थेट देणे टाळा.
कॅश ऑन डिलिव्हरी (COD) पर्याय: जर तुम्ही नवीन किंवा कमी ज्ञात विक्रेत्याकडून पहिल्यांदाच खरेदी करत असाल, तर 'कॅश ऑन डिलिव्हरी' (COD) पर्याय निवडणे अधिक सुरक्षित ठरू शकते.
२. परतावा आणि रिफंड धोरण (Return & Refund Policy): उत्पादनाची डिलिव्हरी मिळाल्यानंतर किती दिवसांत तुम्ही ते परत करू शकता आणि रिफंडची प्रक्रिया कशी आहे, हे स्पष्टपणे समजून घ्या. सदोष (defective) किंवा चुकीच्या उत्पादनाच्या बाबतीत विक्रेते परतावा नाकारू शकत नाहीत. मात्र या वस्तू परत करत असताना बऱ्याचदा मुद्दामहून आधी चुकीच्या वस्तू द्यायच्या आणि वस्तू परत करताना ग्राहकला गंडवायचे किंवा तिथे ऑनलाईन फ्रॉड करायचे असे झाल्याचे दिसून येईल. ऑनलाईन फ्रॉड झाल्याचे लक्षात आल्यास आर.बी.आय. च्या दिनांक ६ जुलै २०१७ रोजीच्या zero liability या परिपत्रकाप्रमाणे "जेव्हा एखादा अनधिकृत व्यवहार होतो आणि त्यामध्ये बँकेचा सहभाग / निष्काळजीपणा / कमतरता असेल किंवा जेव्हा बँकेची किंवा खातेदाराची चूक नसेल पण एखाद्या त्रयस्थ व्यक्तीमुळे - थर्ड पार्टीमुळे फ्रॉड होतो आणि खातेदाराने लगेचच कामकाजाच्या ३ दिवसांमध्ये बँकेला अश्या फ्रॉडची कल्पना दिल्यास खातेदाराला अश्या फ्रॉडसाठी जबाबदार धरले जाऊ शकत नाही (zero liability )आणि बँकेला अश्या व्यवहारांची कल्पना मिळाल्यापासून १० दिवसांच्या आत पैसे खातेदाराच्या खात्यात वर्ग (shadow credit ) करावेत. त्याचप्रमाणे अश्या ऑनलाईन फ्रॉड मध्ये खातेदाराच्या सहभाग आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी बँकेवर राहील". या बाबत न्याय निर्णय देखील ग्राहकांच्या बाजूनेच आहेत.
३. वॉरंटी आणि गॅरंटी : या दोहोंमधील फरक लक्षात घ्या. वॉरंटी म्हणजे सोप्या भाषेत विक्रेत्याने लेखी स्वरूपात दिलेली हमी कि विशिष्ट कालावधीमध्ये वस्तूमध्ये काहीही कमतरता किंवा दोष असेल तर ग्राहकाला त्या वस्तूची दुरुस्ती मोफत मिळते. मात्र, याचा लाभ घेण्यासाठी, तुमच्याकडे त्या वस्तूचे बिल असणे आवश्यक आहे. उदा. टी. व्ही. खरेदी केलात ज्यामध्ये १ वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे म्हणेजच १ वर्षाच्या टी. व्ही. मध्ये काही दोष निघाल्यास कोणतेही पैसे न भरता तुम्ही तो दुरुस्त करून घेऊ शकता.
गॅरंटी म्हणजे वस्तू अपेक्षेप्रमाणे काम करेल अशी मोठी, विश्वासाची विक्रेत्याने दिलेली हमी. अशी हमी ठराविक कालावधीसाठी असते.
वॉरंटी असो वा गॅरंटी, वस्तूचे बिल, वॉरंटी आणि गॅरंटी कार्ड जपू नुठेवणे गरजेचे असते आणि याबाबतीत अनेक लोकं उदासीन असतात.
४. डिलिव्हरी आणि शिपमेंट (Delivery & Shipment): डिलिव्हरीची अपेक्षित वेळ आणि संबंधित शुल्क (charges) तपासा. अनावश्यक किंवा छुपे शुल्क असल्यास सावधगिरी बाळगा.
५. डेटा गोपनीयता धोरण (Data Privacy Policy) समजून घ्या: वेबसाइट किंवा ॲप तुमची वैयक्तिक माहिती (personal data) कशी वापरणार आहे, हे समजून घ्या. तुमची संमती (explicit consent) घेतल्याशिवाय ते तुमचा डेटा वापरू शकत नाहीत.
६. सार्वजनिक वाय-फाय (Public Wi-Fi) टाळा: फुकट ते पौष्टीक हा विचार सोडा. सार्वजनिक / फ्री वाय-फाय धोकादायक ठरू शकते. ऑनलाइन व्यवहार करताना सार्वजनिक, असुरक्षित वाय-फाय नेटवर्क वापरणे टाळा. त्याऐवजी सुरक्षित वैयक्तिक नेटवर्क वापरा.
फसवणूक झाल्यास काय करता येईल ?
a. ग्राहक संरक्षण कायदा हा यासाठी खूप महत्वाचा आहे. या कायद्याखाली सेवेतील त्रुटी किंवा अनुचित व्यापार पद्धतींविरूद्ध ग्राहकाला संबंधित विक्रेत्याविरुद्ध ग्राहक न्यायालयात दाद मागता येते. २०२० साली झालेल्या दुरुस्तीप्रमाणे आता इ -कॉमर्स कंपन्या /व्यक्ती जे ऑनलाईन / डिजिटल प्रकाराने वस्तु /सेवा पुरवितात, त्यांच्याविरुद्ध देखील ह्या कायद्यान्वये आता दाद मागता येणार आहे. उदा. ऑनलाईन खरेदी करताना दाखवलेली वस्तु आणि प्रत्यक्षात हातात आलेली वस्तु ह्या सारख्याच असणे गरजेचे आहे, तसेच पैसे घेवून पावती न देणे हे आता अनुचित व्यापार पद्धत म्हणून गणले जाईल. इ -कॉमर्स विषयीच्या तक्रारींसाठी वेगळी नियमावली देखील लागू केली आहे उदा. इ -कॉमर्स कंपन्यांना ग्राहकांच्या तक्रार निवारण्यासाठी वेगळा अधिकारी नेमणे बंधनकारक केले आहे आणि त्याची माहिती ग्राहकांना देणे क्रमप्राप्त आहे.
b. फसव्या जाहिरातींपासून सुरक्षा,
हे जाहिरातींचे युग आहे. आपली वस्तू /सेवा खपण्यासाठी जाहिरातींचा आधार घेतला जातो. मात्र बऱ्याचवेळा वस्तुस्थिती वेगळी असते आणि ग्राहकांची फसवणूक होते. अश्या फसव्या जाहिरातींविरुद्ध ग्राहक कायद्याच्या कलम ८९ मध्ये कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. पहिल्या गुन्ह्याला २ वर्षे तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंड तर दुसऱ्यावेळी ५ वर्षे तुरूंगवास आणि ५० लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. वस्तुमुळे झालेले नुकसान :
c. एखादी वस्तु /सेवा विकत घेतल्यानंतर ती सदोष असेल आणि त्यामुळे ग्राहकाचे काही नुकसान झाल्यास, काही अपवाद वगळता, त्या विरुद्ध नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार ग्राहकाला आता मिळाला आहे. तसेच भेसळ युक्त किंवा बनावट माल विकल्यामुळे ग्राहकाला नुकसान किंवा इजा झाल्यास तसेच ग्राहकाचा मृत्यु झाल्यास १ लाख ते १० लाख पर्यंत दंड आणि ६ महिने ते ७ वर्षांपर्यंत कैद होवू शकते. ही पुर्णपणे नवीन तरतूद आहे
शेवटी हेच संगणगावेसे वाटते की सोयी तितक्या गैरसोयी असतात. ऑनलाईन किंवा कुठलीही वस्तू विकत घेताना तारतम्य आणि खबरदारी बाळगणे आणि मोहास बळी न पडणे हे आपल्याच हातात आहे.
ऍड. रोहित एरंडे
Comments
Post a Comment